बोलतो तसे लिहावे

 काही महिन्यांपूर्वी एका कार्यकर्त्याचा फोन आला. मी म्हणालो "बोला." ( वेळ आहे का ,बोलता येईल का असे काही न विचारता थेट) तो म्हणाला, " हिंदू मधील दू पहिला की दुसरा?"

" दुसरा", मी.
"आणि हिंदुस्थानमधील" तो .
"पहिला"मी.
"अरे बापरे", तो. " बरं झालं सांगितलं." तो म्हणाला.

त्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या एका कार्यकर्त्यांनी एक टिपण वाचण्यासाठी आणि शुद्धलेखन दुरुस्तीसाठी पाठवले. बऱ्याच ठिकाणी 'आणी' असे लिहिले होते.अजूनही काही दुरुस्त्या होत्या. त्या करून दिल्या.

अनेक जण दूसरा, तूटते, परिक्षा असं सर्रास लिहितात. फलक लिहिणारे ,सजावट करणारे हटकून 'आशिर्वाद' ,'आर्शिवाद' असे लिहतात. अनेक प्रतिष्ठानांच्या नावामध्ये 'प्रतिष्ठाण' असे ठाण मांडून बसले आहे. यादी अशीच वाढू शकते.
शुद्धलेखन ही अनेक जणांना डोकेदुखी वाटते. तर तज्ञ व्यक्तींपैकी ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ डिंबळे यांची वेगळीच प्रतिक्रिया. ते म्हणतात, " शुद्धलेखनाच्या चुका शोधत राहणे म्हणजे ढेकूण मारण्यासारखे आहे. कितीही वेळा मारले तरी नवीन होत राहतातच." रामभाऊंची प्रतिक्रिया लक्षात घेण्यासारखी आहे.

एक सोपा नियम आपण जर पाळला तर बऱ्याच चुका कमी होऊ शकतात. तो नियम पाळू या शुद्ध लिहूया. तो नियम म्हणजे 'बोलतो तसे लिहावे'. जिथे उच्चार दीर्घ तेथे दुसरा ऊकार किंवा दुसरी वेलांटी. जेथे उच्चार पटकन किंवा ऱ्हस्व तेथे पहिला उकार किंवा पहिली वेलांटी. चला तर मग 'बोलतो तसे लिहूया'.

"बोलतो तसे लिहूया" हा नियम पाळताना एक काळजी घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे मूळ शब्दाचा योग्य उच्चार करणे आवश्यक आहे. कारण अनसूया, प्रियंवदा हे शब्द बरेच जण अनुसूया, प्रियवंदा असे म्हणतात.

त्यामुळे मूळ शब्द योग्य उच्चारूया आणि "बोलतो तसे लिहूया".

( सोबत चि.शंतनू याच्या ५ व्या वाढदिवसाचे ०७/०५/२००९ चे  छायाचित्र, सजावटकाराला सांगूनही त्याने आशीर्वाद शब्द आशिर्वाद असा लिहिला.🙂)




सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. खरंय सर. तसं केलं तरच भाषेचे सौंदर्य दिसून येईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची