सहृदय स्वामी विवेकानंद
" संन्याशाला हृदय असू नये का? "
भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर १८९० मध्ये भारतभ्रमणासाठी कोलकाता येथून बाहेर पडले. या प्रवासात असताना ते काशीमध्ये पोहोचले. तेथे प्रमदादास मित्र या विद्वान व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. त्यांच्याशी स्वामीजींच्या दीर्घ चर्चा होत. काशीमध्ये असताना रामकृष्ण परमहंस यांचे गृहस्थ शिष्य बलराम बसू यांच्या निधनाची बातमी स्वामीजींना कळाली. स्वामीजी भावविव्हल झाले. शोक करू लागले. त्यावेळी प्रमदादास मित्र स्वामीजींना म्हणाले , "स्वामीजी , तुम्ही तर संन्याशी आहात . तुम्ही का शोक करता?" त्यावर स्वामीजी उत्तरले , "संन्याशाला हृदय असू नये का?"
दीनदुःखितांचे कष्ट पाहून स्वामीजी नेहमीच भावनाविवश होत. पण दुःख पाहून केवळ भावनाविवश होणे हे स्वामीजींचे वैशिष्ट्य नाही. अमेरिका युरोप येथील पहिल्या दौऱ्यानंतर कोलकाता येथे आले. त्यानंतर १८९८ मध्ये कोलकाता येथे प्लेगची साथ आली. या साथीत स्वामीजींनी आपले गुरुबंधू, शिष्य यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य केले. बेलूर येथे मठासाठी जमीन विकत घेतली होती. ती जमीन देखील प्रसंगी विकण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. पुरेसे धन मिळाल्यामुळे ती विकावी लागली नाही हा भाग वेगळा.
स्वामीजी यांच्या दुसऱ्या अमेरिका दौऱ्यानंतर परत येत असताना त्यावेळच्या प्रसिद्ध गायिका मादाम काल्व्हे स्वामीजींच्या बरोबर प्रवासात होत्या. या प्रवासातील एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले आहे. कैरोमध्ये जहाज थांबल्यानंतर शहरात फेरफटका मारताना स्वामीजी रस्ता चुकून वेश्यावस्तीत जाऊन पोहोचले. वेश्यांनी स्वामीजींना गराडा घातला. त्यांची स्थिती पाहून स्वामीजी गहिवरले. स्वामीजींच्या चेहर्यावरील सात्विक भाव पाहून वेश्यांनी " दैवी पुरुष, दैवी पुरुष " असे उदगार सद्गगदित होऊन काढले.
स्वामीजी केवळ भावनाविवश होणारे नव्हते तर त्यांनी अनेक सेवाउपक्रम प्रत्यक्ष चालवले. आपले गुरूंच्या नावाने सुरू केलेल्या रामकृष्ण मठाचे बोधवाक्य 'आत्मनो मोक्षार्थम् जगत हिताय च" असे ठेवले. हा आदर्श आचरणात आणण्यासाठी स्वामीजींचे जीवन आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.
सोबत https://rkmkanpur.org/ वेबसाईटवरील बोधचिन्ह
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment