वसतिगृहातील मुलींच्यासाठी वेगळा कार्यक्रम

 २०/०३/२०२० या दिवशी दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर दिल्लीमधील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात आले. डिसेंबर २०१२ मध्ये तो घृणास्पद , पाशवी अत्याचार घडला.


                                                        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

त्यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली.भारतातील अन्य ठिकाणांप्रमाणेच आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन वसतिगृहातील मुला-मुलींच्यात देखील दुःखाचे ,संतापाचे वातावरण होते. सायली जोशी, अभिषेक भोसले,प्रणव कुलकर्णी (सांगलीचा ) , ओंकार देशमुख या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मुलींच्या मनोरंजनगृहात ( कॉमनरूम )मध्ये एक शोकसभा उस्फूर्तपणे आयोजित केली. मुलांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मी देखील मुलांशी संवाद साधला.
हे सगळं चालू असताना वसतिगृहातील मुलींच्यासाठी काही वेगळा कार्यक्रम करावा असं मनात येत होतं. वसतिगृह प्रमुख आणि प्राचार्य असलेले डॉ. एन. एस. उमराणी यांच्याशी बोलून श्री.संदीप खर्डेकर यांच्या प्रतिष्ठानच्यावतीने एक कार्यक्रम ४/०१/१३ रोजी आयोजित केला. पोलिस अधिकारी श्री.भानुप्रताप बर्गे हे खर्डेकर पती-पत्नींच्या सोबत कार्यक्रमास उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या दरम्यान मुलींनी आपले मन मोकळे केले. दैनंदिन आयुष्यात वावरताना आलेले वाईट अनुभव त्यांनी सांगितले. ते ऐकत असताना प्रचंड अस्वस्थता निर्माण होत होती.
भानुप्रताप बर्गे यांनी मुलींना वेगवेगळे उपाय सांगितले. त्यात एक उपाय त्यांनी सांगितला की जर दुर्दैवी प्रसंग आलाच तर १०० क्रमांकावर फोन करा काही मिनिटात पोलिस तुमच्या मदतीसाठी येतील. त्यांचं बोलणं झाल्यावर विद्यार्थिनींनी काही प्रश्न विचारले. प्रज्ञा देवळेकर ही विद्यार्थिनी इयत्ता बारावी मध्ये होती. ती म्हणाली," सॉरी सर! पण पोलिसांची मदत वेळेवर मिळेल असं मला वाटत नाही. " हे ऐकल्यानंतर बर्गे यांनी लगेच तिला तिच्या मोबाईल वरून मदतीसाठी फोन करायला सांगितला. सोबतच्या पोलीस हवालदाराकडून वॉकी टॉकी मागवून घेतली आणि सर्वांना तिचा कॉल गेल्यानंतर पुढे कशा पद्धतीने पोलिस यंत्रणा काम करते हे वॉकी-टॉकी वरच्या संदेशातून प्रत्यक्ष ऐकवण्यास सुरूवात केली. ते म्हणाले की " उशीरात उशीरा दहा मिनिटात या भागातील गस्त घालणारे पोलिस येतील." हा सर्व प्रकार चालू असताना उपस्थित सर्व मुली आणि आम्ही उत्सुकतेने ऐकत होतो. संध्याकाळी सहाच्या सुमाराची वेळ होती. गरवारे महाविद्यालयात समोरील कर्वे रस्त्यावर रहदारी जोरात होती. रस्ता वाहनांनी गच्च भरला होता.पण बरोबर आठव्या मिनिटाला गस्तीवरील पोलीस हजर झाले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आलेल्या पोलिसांना काय चालले आहे तेच कळेना. तेव्हा श्री. बर्गे यांनी सर्व प्रकार सांगितला. त्या दोन्ही पोलिसांचे गुलाब पुष्प देऊन आम्ही अभिनंदन केले. धन्यवाद दिले. पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा हा प्रसंग सर्व मुलींना वेगळा आत्मविश्वास देऊन गेला. मला आयुष्यात भावुक करून गेलेल्या अनेक अनुभवांपैकी एक असा तो अनुभव होता.
स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याची मानसिकता जाऊन तिला एक व्यक्ती म्हणून वागणूक , प्रतिष्ठा मिळू लागली की हा प्रश्न सुटेल. पण तोपर्यंत कार्यक्षम यंत्रणा, सतर्कता, आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

सुधीर गाडे, पुणे


Like
Comment
Share

2

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची