मी शिकलो मराठवाड्यातील शब्द

 " नीट जायचं." समोरचा माणूस म्हणाला आणि बुचकळ्यातच पडलो.

संघाच्या कामासाठी दोन वर्षे (जून१९९७- जून१९९९) मराठवाड्यात राहण्याचा योग आला. या काळात तिथले नवनवीन शब्द मला शिकायला मिळाले.
एकदा एके ठिकाणी मी रस्ता विचारण्यासाठी थांबलो. तर समोरच्या माणसाने उत्तर दिले ,"नीट जायचं." मी सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला. मी विचार केला, अरे मी तर नीटच (व्यवस्थित) चाललोय. वेडावाकडा नाही. नंतर उलगडा झाला नीट जायचं म्हणजे सरळ जायचं.
बरेच वेळा अनेक जण सांगायचे, "इथेच आमचा ठेपा असतो." ठेपा म्हणजे अड्डा हे कळायला मला बरेच दिवस गेले. नंतर मी ही म्हणू लागलो की ,"तुम्ही ठेप्यावर भेटला नाहीत." ठेपा यासारखा मोंढा हा देखील एक शब्द लक्षात राहिला. मोंढा म्हणजे घाऊक खरेदी-विक्री बाजारपेठ.
सातारा जिल्ह्यात सहजपणे म्हटलं जातं ,'काय करतो तुमचा पोरगा". पण मराठवाड्यात 'लेकरू'हा शब्द सहजपणे जास्त वापरला जातो. नंतर लक्षात आलं की समर्थ रामदास हे मराठवाड्यातील त्यामुळे त्यांच्या रचनेत 'लेकरू' शब्द आढळतो ," जननी जनक माया लेकरू काय जाणे?"
'उभे ठाकणे' हा शब्दप्रयोग देखील 'उभे राहणे' यासाठी सर्रास वापरला जातो. त्यामुळे संत एकनाथ यांनी रचलेल्या दत्तगुरूंच्या आरतीमध्ये "दत्त येऊनिया उभा ठाकला" असा उल्लेख आहे.
तसेच लग्नाच्या जेवणात विशेषतः ग्रामीण भागात 'नुक्ती' ही असायचीच. नुक्ती म्हणजे बुंदी ही समोर आली की लक्षात आलेच. तसंच 'आलूबोंडा' म्हणजे अनेकांना प्रिय असलेला 'बटाटेवडा'.
'लहाना भाऊ' हादेखील शब्दप्रयोग मी तेथे शिकलो. 'धाकटा' म्हणजे 'लहाना' हे संदर्भाने लक्षात येऊ लागले.
परेशान झालो(हैराण झालो), वापस आलो(परत आलो), जवाबदारी (जबाबदारी) हे आणखी काही शब्दप्रयोग.असे नवनवीन शब्दप्रयोग शिकणे मला नेहमीच आनंदाची गोष्ट वाटत आली आहे.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची