कर्म हीच पूजा
"गोपाला गोपाला! देवकीनंदन गोपाला!" संत गाडगे महाराजांचे कीर्तन कोकणातल्या एका गावात रंगात आले होते. गाडगे बाबा नेहमीप्रमाणे समाजप्रबोधन करीत होते. तेवढ्यात पुण्याहून आलेली तार घेऊन एक जण धावत धावत गाडगेबाबांच्याकडे आला. त्याचा चेहरा उतरला होता. चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसत होते. बाबांनी विचारले "काय लिहिले आहेत तारेत?". " बाबा तुमचा मुलगा कुत्रा चावल्याचे निमित्त होऊन पुण्यामध्ये मरण पावला." तारेतला मजकूर बाबांना संगीत लागेल. आता बाबा काय करणार सर्व जण पाहू लागले. बाबा म्हणाले," असे गेले कोट्यानुकोटी, तेथे काय रडू एकट्यासाठी" बाबांचे कीर्तन तसेच पुढे चालू राहिले.
आपल्या देशात कर्म हाच ईश्वर ही समजूत पूर्वापार चालत आली आहे. मध्ययुगीन संतांच्या अभंगातला देखील हा उल्लेख आपल्याला ठीकठिकाणी आढळतो. उदाहरणार्थ श्रेष्ठ संत सावता माळी यांच्या अभंगात
"कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी"
असे आपल्याला वाचायला मिळते.
इंग्रजीमध्ये "शो मस्ट गो ऑन " असे म्हटले जाते. संकल्पनेत थोडा फरक असला तरी कार्यरत राहणे याला महत्त्व दिल्याचे आपल्या लक्षात येते.
काही दशकांपूर्वी फलटण जवळ शिखर शिंगणापूर येथे यात्रा भरली होती. त्या काळात तमाशा हे मनोरंजनाचे मोठे साधन होते. प्रसिद्ध तमासगीर विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा अगदी रंगात आला होता. विठाबाईदेखील पायात काही किलोचे घुंगरू बांधून नाचत होत्या. पण आज त्यांचे पाय जडावले होते. प्रेक्षकांनी त्यांच्या नावाचा पुकारा केल्यामुळे त्या बोर्डावर नाचत होत्या. पण त्यावेळी त्यांचे दिवस अगदी भरत आले होते. आता मूल जन्माला येणार हे लक्षात आल्यानंतर त्या मागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या. दगडाने नाळ ठेचून मुलगा वेगळा केला. तासाभराने परत बोर्डावर येऊन प्रेक्षकांनी विनंती केली
आणि प्रेक्षक पांगले. बाळंतपण हा स्त्रीचा जणू पुनर्जन्मच असे म्हटले जाते. अशा वेळी देखील आपल्या कामाचा निष्ठेमुळे विठाबाई कार्यरत होत्या.
कोरोनाच्या सध्याचा संकटकाळात देखील पुण्यात याचा पुन्हा एकदा अनुभव आला तो प्रसिद्ध डॉ. मुकुंद पेनुरकर यांच्या रूपाने. स्वतःच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार केल्यावर स्वतःचे दुःख आवरून ते पुन्हा रुग्णसेवेसाठी रुजू झाले. अपत्यजन्म ही माणसाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग आहे तर जिवलगांचा मृत्यू ही सर्वात दुःखदायक घटना आहे.अशा प्रसंगातही जे कार्यरत राहतात अशी उदाहरणे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी लक्षात येते की "कर्म हीच पूजा".
(छायाचित्र विकिपीडिया)
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment