मनाचं आजारपण स्वीकारूया..
"सर, मी कुठे आहे ते मला समजत नाही." पार्थ (नाव बदललं आहे.) म्हणाला. "जवळपास कोणत्या पाट्या दिसत आहेत ते मला सांग. असं कर, तू रिक्षा करून होस्टेलला ये." मी म्हणालो.
मनाचं आजारपण असलं की माणूस शरीराने धडधाकट असूनदेखील व्यवस्थित राहू शकत नाही. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या आजारपणाचे अजून दोन अनुभव मला आले.
पार्थ हा पुण्याजवळच्या एका गावातील हुशार मुलगा. त्याचे काका डॉक्टर होते. त्यांच्याकडे बघून यानंदेखील डॉक्टरच व्हायचं असं घरच्यांनी ठरवून टाकलं आणि आमच्या महाविद्यालयात त्याला अकरावीला प्रवेश घेऊन दिला. परंतु इथल्या अभ्यासक्रमाशी, परिस्थितीशी जुळवून घेताना त्याला खूप अडचणी येऊ लागल्या. पहिले सहा महिने व्यवस्थित गेले. परंतु दुसऱ्या सत्रात अचानक एके दिवशी घरच्यांना लक्षात आलं की पार्थ फोन उचलत नाही आणि त्याच्या जोडीदाराला तो कुठे गेला आहे हे पार्थने सांगितलं नाही. पालकांनी मला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. मी पार्थला फोन केला. चांगली गोष्ट झाली म्हणजे त्यानं माझा फोन घेतला. मी त्याला सांगितलं की, " तू मला भेटायला लगेच ये. तू कुठे आहेस?" असं विचारल्यानंतर त्यानं उत्तर दिलं की", तो कुठे आहे ते त्याला समजत नव्हतं. मी त्याला रिक्षा करून वसतिगृहात यायला सांगितलेे". "जवळ पैसे नाहीत", असं तो म्हणाला, कारण तो विचारमग्न होऊन अचानक चालत बाहेर पडून दूर कुठेतरी चालत गेला होता. मी त्याला सांगितलेे, "तू रिक्षा घेऊन ये. इथं आल्यावर पैसे देण्याची व्यवस्था मी करतो." त्याप्रमाणे तो रिक्षा करून परत आला. त्याला पाणी चहा दिला. नंतर मी त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला अभ्यासाचा प्रचंड ताण आहेे, कुटुंबियांच्या अपेक्षांचंं दडपण त्याच्या मनावर आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पार्थला थोडं समजावून सांगितलं. नंतर पालकांना बोलावून घेतलं त्यांच्याशीदेखील संवाद केला. त्यांना देखील समजावून सांगितले. पुढे बारावीला पार्थने आमच्या महाविद्यालयातील प्रवेश सोडून दिला आणि गावाकडे प्रवेश घेतला. पुढे काय झालं हे मला समजलं नाही.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षभरात काहीवेळा अपरात्री मला फोन येत असतात. पाच-सहा वर्षांपूर्वी रात्री दीडच्या सुमाराला वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा मला फोन आला आणि त्यानं सांगितलं की त्याचा जोडीदार सुजन (नाव बदललं आहे ) यानं त्याला खूप मारलं. अजूनही सुजन रागावलेलाच आहे. मी लगेच वसतिगृहात गेलो. दोघांनाही बोलावून घेतले चौकशी केली. लक्षात आलं की सुजनला मानसिक आजारपणासाठी काही गोळ्या चालू आहेत. दोघांशीही जवळपास तासभर बोलून त्यांना शांत केलं. पुण्याजवळच्या जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या सुजनच्या वडिलांना बोलून घेतलं. पण आपल्या मुलाला असा काही त्रास असल्याचं त्यांनी सुुुुरूवातीला नाकारलं. चर्चा संवाद करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी केला. वसतिगृह सोडेपर्यंत पुढचे काही महिने सुजन व्यवस्थित राहिला.
शरीराचं आजारपण आपण स्वीकारतो तसं मनाचं आजारपण स्वीकारण्याची समाजाची वृत्ती वाढण्याची आवश्यकता वाटते.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment