खान्देशी शब्द - अहिराणी भाषा
" मऽग" समोरचा माणूस मोठ्यानं म्हणायचा. मला सुरुवातीला लक्षात यायचं नाही की "जेवण झालं का?" या साध्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं न येता 'मग' असं का मिळतं.
१९८८-१९९० दोन वर्षे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वसतिगृहात आमच्याबरोबर काही खानदेशी विद्यार्थी होते. त्यांची अहिराणी भाषा त्यावेळेला बरीचशी समजायची नाही. त्यावेळेला मला हे माहीत नव्हतं की भविष्यात खान्देशात राहूनच ही भाषा मला थोडीफार शिकता येणार आहे.
मराठवाड्यानंतर संघाच्या कामासाठी दोन वर्षे खानदेशात धुळे जिल्ह्यात (जूून१९९९- जून२००१) राहण्याचा योग मला आला. या काळात अहिराणी भाषा सतत कानावर पडायची आणि मीदेखील ती शिकण्याचा प्रयत्न करीत असे. त्यामुळे अहिराणी मला बऱ्यापैकी समजू लागली होती. काही वाक्यंंदेखील मी बोलू लागलो होतो.
धुळ्यात सुरुवातीला गेल्यावर सुरूवातीला काही दिवस 'मग' म्हणजे 'होय' हे मला लक्षात येत नसे. काही दिवसांनी मला ते समजू लागले. त्यामुळे "जेवण झालं का?" या प्रश्नाला उत्तर "मऽग" असे आले याचा अर्थ "होय, जेवण झाले" हे मला समजू लागले आणि घोटाळा दूर झाला. कारण हा उलगडा होण्याआधी मला असं वाटायचं की एवढ्या साध्या प्रश्नाला असं मोठ्यानं 'मग' हे उत्तर देण्याचं कारण काय?
धुळ्यात गेल्यानंतर काही दिवसांनी मी शिरपूर रस्त्यावरील सोनगीर या गावी प्रथमच गेलो. तेथे स्वयंसेवक नरेंद्र पवार यांच्याकडे दुपारी जेवण झाले. त्यानंतर ते म्हणाले ," सुधीरजी लोळणार का थोडं?" मी चमकलोच. कारण यापूर्वी लोळणे हे क्रियापद मला गाढव किंवा डुक्कर यांच्याशी संबंधित वाक्यातच ऐकायला मिळत असे. पण खुलासा झाला की 'लोळणे' म्हणजे दुपारी जेवणानंतर 'थोडी विश्रांती घेणे'.
या सुरुवातीच्या दिवसात तेथील एक कार्यकर्ते हेमंत (भरत) देवळे यांच्या घरी मी गेलो होतो. त्यांच्याकडून प्रथम 'शालक' हा शब्द ऐकल्याचे आठवते. 'शालक' म्हणजे 'मेव्हणा' (हिंदीतील 'साला'). भरत देवळे एकदा बोलताना म्हणाले, "आज समितीच्या बाया घरी आल्या होत्या." 'बाया' याला पश्चिम महाराष्ट्रात एक विशेष अर्थ आहे. तिथेही तोच अर्थ असेल असं समजून मला वाटलं की हे उघडपणे 'बाया आल्या होत्या' असं कसं काय सांगतात. मी बुचकळ्यात पडलो. नंतर खुलासा झाला की खानदेशात 'बाई' याला 'सभ्य स्त्री' असा अर्थ आहे. नंतर केव्हातरी धुळ्यातील कार्यकर्ते नानाभाऊ जोशी यांनी एक गंमतशीर प्रसंग मला सांगितला. ते रेल्वे पोस्ट खात्यात नोकरीला होते. ते मूळचे खानदेशातील तसेच त्यांच्या पत्नीदेखील खानदेशातील. काही काळ त्यांची बदली मराठवाड्यात नांदेड येथे झाली होती. एके दिवशी ते घरी आल्यावर पत्नीचे शेजाऱ्यांशी भांडण चालू आहे असे त्यांना दिसले. त्यांनी विचारपूस केल्यावर त्यांच्या पत्नीने शेजाऱ्याला, "तुमची बाई काय म्हणते?" असे विचारले होते तिथून भांडण सुरू झाले हे त्यांच्या लक्षात आले. नानाभाऊ हसू लागले. कारण काय घोटाळा झाला ते त्यांच्या लक्षात आले. मराठवाड्यात 'बाई' या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. आपल्या पत्नीला 'बाई' म्हटल्यामुळे शेजारील गृहस्थ चिडला होता. नानाभाऊंनी कशीबशी त्याची समजूत घातली.
खान्देशातील भाषा अहिराणीवर मराठी, हिंदी आणि गुजराथी या भाषांचा प्रभाव आहे असे मला वाटते.
काही काळानंतर मला अहिराणी भाषा समजू लागली. पहिली गोष्ट म्हणजे अनेकजण, विशेषतः ग्रामीण भागातील, धुळे याचा उच्चार 'धुडे' असा करीत असत. त्यामुळे " धुड्याला जाई राहिनू" म्हणजे धुळ्याला जात आहे
हे मला समजू लागले. तसेच "कसं काय शेत?" म्हणजे "कसे आहात?", " घरमा शेत का?" म्हणजे "घरी आहात का?",
" काय करी राहिनात?" म्हणजे "काय करत आहात?", "ली ल्या" म्हणजे "घ्या"
" जी घ्या" म्हणजे "जेवून घ्या",
जेवताना "बागी बागी चाल दे" असे म्हणतात म्हणजे "सावकाश होऊ द्या", एखाद्याकडे तो जेवत असताना आपण गेलो तर तो म्हणे "या जेवायला" मग आपण उत्तर द्यायचे "ल्या देवनं नाव" म्हणजे "घ्या देवाचं नाव". ' मना/मनं' म्हणजे 'माझे', 'तुमनाकडे' म्हणजे 'तुमच्याकडे' असे अनेक शब्दप्रयोग मला लक्षात येऊ लागले आणि थोडे थोडे मी शिकण्याचादेखील प्रयत्न करत असे. त्यामुळे ऐकणाऱ्याला आनंद होत असे आणि आपुलकी वाढे.
संघ प्रचारक श्री.नंदूभाऊ गिर्जे यांच्या तोंडून "ओ झिंग्यानी माय, हाऊ झिंग्याना बाप" हे अहिराणी गीत ऐकल्याचं देखील आठवतं.
बोलण्याची भाषा अहिराणी असली तरी औपचारिक भाषा मराठीच आहे. त्यामुळे औपचारिक ठिकाणी मराठीच बोलली जाते. बोलीभाषेत जास्त जवळीक होऊ शकते हे लक्षात घेऊन तळोदा, जि.नंदूरबार येथील प्राथमिक वर्गात अहिराणीतून एक बौद्धिक वर्गा व्हावा अशी योजना मी केली. त्यावेळचे विभाग कार्यवाह श्री. बाळासाहेब चौधरी यांनी अहिराणीतून 'बौद्धिक वर्ग' दिला. त्या दिवशी वर्गातील सर्व स्वयंसेवक अगदी खुशीत होते. कारण त्यांनी पहिल्यांदाच 'बौद्धिक वर्ग' अहिराणीत ऐकला होता. बाळासाहेब देखील म्हणाले त्यांच्या दीर्घ संघजीवनात अहिराणीतून 'बौध्दिक वर्ग' देण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
आता अहिराणी बोलण्याचा कमी प्रसंग येतो. मधून मधून त्याला उजाळा देण्याचा मी प्रयत्न करत असतो.
सुधीर गाडे, पुणे
😃😃👌👌
ReplyDelete🙏🙏
Deleteवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात असताना आमच्याही बरोबर खानदेशातील अहिराणी भाषा बोलणारे सुमारे तीस चाळीस जण होते.अनेक वेळा त्यांच्या बरोबरच्या संभाषणांमध्ये आमचेही गैरसमज होत असत. गाडे सरांचा लेख वाचून भूतकाळात जाऊन आठवणी ताज्या झाल्या व त्या सर्व खानदेशी मित्रांची आठवण झाली. धन्यवाद सर.
ReplyDeleteतुमच्या ब्लॉग वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्या लेखनाच्या शैली विषयी कौतुक करावे तेवढे थोडेच.
धन्यवाद डॉक्टर
Deleteतुम्हना लेख वाचा. मस्त लिखेल शे. अहिराणी बोलता येस हाई आमण भाग्य. तुमना ब्लॉग ले शुभेच्छा.
ReplyDeleteधन्यवाद
Delete🙏🙏
Delete