संचित पुढच्या पिढ्यांकडे सोपवण्याचं आव्हान
"अरे तुझं एक्सपरिमेंट शीट अगदी चांगदेवाच्या पत्रासारखं कोरं आहे!"... मी
" सर, चांगदेव कोण?"... विद्यार्थी
गेल्या काही दशकांमध्ये भारतात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ही वाढ केवळ महाराष्ट्रातच आहे असे नाही ही तर देशातील बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये आहे. इंग्रजी ही घरातील अथवा समाजातील भाषा नसल्यामुळे मुले मुली इंग्रजीतून शिकताना अनेक अडचणींना तोंड देतात. हे तर आहेच. परंतु मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा या भारतीय संस्कृती, परंपरा यापासून दूर गेलेल्या आढळतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना भारताची परंपरा ,संस्कृती, इतिहास यांची माहिती फारशी असत नाही. भारताचे सांस्कृतिक संचित त्यांच्यापर्यंत पोचत नाही. यातूनच मी वर दिलेल्या संवादासारखे संवाद घडतात.
काही वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याशी झालेला संवाद वर दिला आहे. नंतर त्या विद्यार्थ्याला मी थोडक्यात चांगदेव यांच्याबद्दलची माहिती सांगितली. पण असे प्रसंग अनेकवेळा घडतात. आमच्या एका विद्यार्थ्याचे नाव अनिरुद्ध होते. मी त्याला विचारले की तुला अनिरुद्ध आणि उषा यांची गोष्ट माहिती आहे का? त्यालाही प्रश्न पडला हा अनिरुद्ध कोण? हा अनिरुद्ध म्हणजे श्रीकृष्णांचा नातू हे सांगितल्यावरही त्याला उलगडा झाला नाही. मग थोडक्यात त्याला त्या कथेची माहिती सांगितली.
२०१२ मध्ये आमच्या महाविद्यालयाच्या मैदानावर स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम महाविद्यालयीन मुले मुली यांच्या मोठ्या उपस्थित साजरा करण्याचे ठरले. या कार्यक्रमात आमच्या महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी असलेल्या मुलीने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना चांगल्या आचरणाची प्रतिज्ञा द्यायची असे ठरले. मी तिला विचारले," तुला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल काय माहिती आहे?". ही मुलगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणारी , नाटकात काम करणारी होती. ती म्हणाली "सर, ते नाही का त्यांचे भाषण माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो.." मी विचारले,"बंधूंनो आणि भगिनींनो याच्या पुढे काय?". ती म्हणाली," सर मला एवढंच माहिती आहे". नंतर तिला स्वामीजींचे चरित्र मी वाचायला दिले.
हा प्रसंग विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांना मी सांगितला. त्यावेळी ते म्हणाले, "सुधीर ,यात चूक कोणाची? मुलीची ,पालकांची ,शिक्षकांची की समाजाची? आपल्याला शक्य ते आपण करत राहिले पाहिजे." विश्वासरावांचे बोलणे लक्षात घेऊन आम्ही पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी मिळून त्या वर्षभरात ५० पेक्षा जास्त ठिकाणी हजारो मुला-मुलींना स्वामीजींचे चरित्र सांगितले. अजूनही हा उपक्रम आम्ही चालू ठेवला आहे.
यासंदर्भात पालकांची भूमिका देखील महत्वाची आहे. माझा मित्र पंकज बढे याचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे. परंतु त्याच्या आई-बाबांनी त्याला भारतीय परंपरेशी जोडून ठेवण्याचे डोळस प्रयत्न केले. असे जागरूक पालक असणे महत्त्वाचे आहे. सणवार, प्रसंग या निमित्ताने मुला-मुलींना माहिती देत राहणे हे सहजपणे होऊ शकतो.
भारताला आपल्या स्वत्वासह जगामध्ये महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. त्यासाठी पुढील पिढीकडे आपले सांस्कृतिक संचित पोचवणे ही फार मोठी जबाबदारी आपल्यासमोर आव्हान म्हणून उभी आहे. आपण यासंदर्भात सतत काम करत राहिले पाहिजे.
सुधीर गाडे, पुणे
हजारो वर्षाच्या परकीय आक्रमणामुळे सुद्धा नष्ट न झालेला आपला सांस्कृतिक वारसा केवळ इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे नष्ट होऊ घातला आहे. केव्हा केव्हा असे वाटते जे परकियांना सुद्धा शक्य झाले नाही ते स्वकियांच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे साध्य होण्याची शक्यता आहे.
ReplyDeleteहोय.म्हणून समाजाने जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
Delete