तर्काच्या पलिकडले काही...

मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. बुद्धीच्या जोरावर मानवाने आपल्या जीवनात मोठी प्रगती केली आहे. बुद्धी समर्थ असल्याने मानव बुद्धिच्या, तर्काच्या आधारावर विचार करतो असे आढळून येते. परंतु काहीवेळा बुद्धिच्या आधारावर जो तर्क केला जातो त्याच्या पलिकडीचे अनुभव येतात आणि ते विचार करण्यास भाग पाडतात.

श्रेष्ठ महात्मे रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातील प्रसंग प्रसिद्ध आहे. बहुधा त्यांच्या अंतिम काळातील हा प्रसंग आहे. तेव्हा ते कलकत्त्यामध्ये काशीपूर भागात आपल्या शिष्यांसोबत राहत असत. रामकृष्ण हे वारंवार समाधी अवस्थेत जात असत याचा अनुभव त्याच्यांबरोबर असलेल्या अनेक जणांनी अनेक वेळा घेतला आणि काहीजणांनी तो लिहून ठेवला आहे. असेच एके दिवशी ते ध्यानस्थ बसलेले असताना मनाने ते घरासमोरील हिरवळीशी एकरूप झाले. थोड्या वेळात कुठूनतरी एक गाय आली आणि त्या ठिकाणी चरू लागली. रामकृष्णांची समाधी भंगली आणि त्यांनी वेदनेचा उद्गार काढला. काही जणांच्या लक्षात येऊन त्यांनी त्या गाईला दूर घालवून दिले. रामकृष्णांच्या जवळ येऊन बघतात तर त्यांच्या छातीवर गाईच्या खुराचे निशाण उमटले होते. हिरवळीवर असलेल्या गाईच्या खुराचे निशाण रामकृष्णांच्या छातीवर कसे उमटले असेल?
नर्मदा परिक्रमा करण्याची परंपरा अनेक शतके चालत आली आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर भालोद येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.पू. शरदचंद्र प्रतापे महाराज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काही दशकांपूर्वी त्यांना दृष्टांत झाला की बडोदा शहरात काशीबाई निरखे यांच्याकडे मूर्ती आहे. ती घेऊन यावी आणि तिची प्रतिष्ठापना भालोद येथे करावी. याच वेळी वयोवृद्ध असलेल्या काशीबाई निरखे यांनाही स्वप्न पडले की एक तरुण मूर्ती मागण्यास येईल त्याकडे ती मूर्ती सुपूर्त करावी. काशीबाई निरखे यांच्या आजोबांना ही मूर्ती नर्मदेच्या पात्रात आहे असा दृष्टांत झाला होता. त्यानंतर त्यांनी ती नर्मदेच्या पात्रातून आणून तिची उपासना सुरू केली होती. या मूर्तीची उपासना चालत राहावी म्हणून चार बहिणींपैकी काशीबाई निरखे या अविवाहित राहून उपासना करीत असत. ८५ वर्षांच्या वयोवृद्ध झाल्यावर त्यांना उपासना पुढे कशी चालेल याची चिंता वाटू लागली. याच सुमाराला त्यांना हे स्वप्न पडले आणि प्रतापे महाराज येऊन मूर्ती घेऊन गेले. एकाच वेळी दोघांना एकमेकांच्या स्वप्नांना पूरक असे स्वप्न कसे पडले असेल? या प्रसंगाचे वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी त्यांच्या 'नर्मदे हर' या पुस्तकात केले आहे. काही महिन्यांपूर्वी मी माझा स.प. महाविद्यालयातील मित्र संतोष देशपांडे यांच्याकडे गेलो असता गप्पांमध्ये हा प्रसंग मी सांगितला. त्यावेळी संतोष आनंदाने मला म्हणाला की ,"या काशीबाई निरखे म्हणजे त्याच्या आईच्या मावशी". पुस्तकात दिलेल्या प्रसंगाला संतोषकडून दुजोरा मिळाला.
प्रबोधनकार केशवराव ठाकरे हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच निधन पावले. त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. केशवराव ठाकरे यांचे आजोबा देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या घरातील देवीचे ठाणे जागृत आहे अशी सर्वांची श्रद्धा होती. आजोबांनी केशवरावांना शिक्षणासाठी म्हणून बारामतीला पाठवले होते. एके दिवशी पहाटे उठल्यानंतर आजोबा तसेच देवीचा देव्हाऱ्यासमोर बसले. घरातील सर्वांना आश्चर्य वाटले कारण दररोजच्या नियमानुसार नियमानुसार पूजाअर्चा न करता समोर बसून राहिले होते. घरच्यांनी त्यांना विचारले तर ते परतपरत फक्त एकच प्रश्न विचारत "केशवाचे काय झाले?" घरातील लोकांना कळेना की हे असे का विचारतात. त्याच दिवशी इकडे बारामतीला बाल केशव आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी म्हणून कॅनॉलवर गेला होता. पोहताना तो पाण्यात बुडू लागला होता. त्यावेळी कोणीतरी पाण्यात उडी मारून केशवाला बाहेर काढले आणि वाचवले. त्यानंतर बारामतीहून तार करण्यात आली की केशव सुखरूप आहे. ती तार मिळाल्यानंतर मग केशवरावांचे आजोबा उठून देवीच्या पूजा अर्चना लागले. हा प्रसंग प्रबोधनकारांनी त्यांच्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात दिला आहे. आपला नातू आज जिवावरच्या संकटात पडणार आहे हे आजोबांना कसे कळले असेल?
ज्यांची साधना प्रामाणिक आणि उच्च दर्जाची असते, भक्ती निस्सीम असते अशांच्या जीवनात असे प्रसंग घडल्याचे वाचायला मिळते.
सुधीर गाडे , पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची