वसतिगृहात नव्याने रहायला लागल्यावर..

"सर, आमची प्रणिता( नाव बदललं आहे.) अकरावीला नापास झाली.एवढी हुशार मुलगी नापास कशी झाली"...पालक

" मी आता माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात आहे. नंतर बोलूया."... मी
१४ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे.
वसतिगृहात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलेमुली ११ वी, महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यासाठी प्रवेश घेतात. ११ वी चं वय तर अधलंमधल , पौगंडास्थेतील असत. छोट्या गावातून ,शहरातून आलेल्या अनेक मुलांवर पुण्यासारख्या मोठ्या शहराचे दडपण येतं. महाविद्यालयातील शिकवण्याची पद्धत वेगळी असते. मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलामुलींना इंग्रजी भाषेचे दडपण जाणवत असते. गेल्या काही वर्षांत ज्यांनी खाजगी शिकवणी वर्ग प्रवेश घेतला आहे अशा बहुतेकांचे शिकवणी वर्गाला तिथल्या अभ्यासाला जास्त प्राधान्य असतं. आणि महत्त्वाचे म्हणजे घर सोडून पहिल्यांदाच बाहेर राहणाऱ्यांना घरची सारखी आठवण येत असते. अशाच आणखी काही चिंता असतात.
मी दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वसतिगृहात राहायला आलो. पहिले दीड दोन महिने मला रोज पाचच्या सुमारास असं वाटायचं की भरावी बॅग, स्वारगेटला जाऊन पकडावी सहाची स्वारगेट-साखरवाडी गाडी. मग काय, तीन तासात घरी! पण निश्चयाने हे विचार मी मनातच ठेवले. नवीन मित्र, गप्पाटप्पा, आजूबाजूला थोड फिरणं यामुळे हळूहळू मी वसतिगृहात रुळलो.
आमच्या महाविद्यालयीन वसतिगृहात प्रा. र.वि. कुलकर्णी सर अनेक वर्ष नवीन मुलामुलींसाठी वर्षाच्या सुरुवातीला बैठक घेऊन मार्गदर्शन करत असत.२००५ पासून वसतिगृहातील नवीन मुलांच्या सभेत मी दरवर्षी माझा हा अनुभव सांगत आलो आहे. इतरही मुद्दे सांगत असतो.
पण तरीही मुले-मुली घरच्या आठवणीने व्याकूळ होत असतात. हे व्याकूळ होणे अतिशय स्वाभाविक आहे. घरी जाण्यासाठी परवानगी मागताना मुलामुलींबरोबर कधी कधी पालकांचेदेखील डोळे पाणावलेले मी बघितले आहेत. साधारणपणे गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धा, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून होणारी गणेश स्थापना, माहितीपर व्याख्यान, विविधगुणदर्शन कार्यक्रम, गणेश विसर्जन अशा उत्साही आणि जल्लोषपूर्ण कार्यक्रमानंतर मुले-मुली मोकळेपणाने रुळतात आणि वातावरणाला सरावतात. पण काहीजण महाविद्यालयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम वार्षिक परीक्षेत बघायला मिळतो. अशाच मुला-मुलींपैकी प्रणिता ही एक होती. दहावीला तिच्या शाळेत प्रथम आलेली प्रणिता अकरावीला अनुत्तीर्ण झाली याचा प्रचंड धक्का तिच्या पालकांना बसला होता. घरगुती कार्यक्रम आटोपल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात अशा प्रकारचे अनुभव येत असतात. साधारणपणे सहा महिन्यानंतर अंदाज घेऊन मुला-मुलींशी, पालकांशी संवाद साधण्याचादेखील मी काही प्रयत्न करतो. गेली चार वर्षे वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन मुलामुलींसाठी तज्ञ समुपदेशकांचे "गट समुपदेशन" आयोजित करण्याची पद्धत चालू केली आहे. त्यानंतर मुलेमुली आवश्यकतेप्रमाणे समुपदेशकांच्या संपर्कात राहतात आणि त्यांच्या चिंतांवर मात करण्यासाठी मदत घेतात. या प्रयत्नांचा चांगला फायदा होतो आहे असे लक्षात आले आहे.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची