स्वामी विवेकानंद प्रेरणादायक प्रसंग
भारतभूमीचे थोर सुपुत्र विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायक आहे. त्यातील दोन प्रसंग
स्वामीजी शिकागोला सर्व धर्म परिषदेसाठी जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांचे शिष्य खेतडी संस्थानचे अधिपती महाराज अजित सिंह यांनी आपल्या जयपूर येथील वाड्यात स्वामीजींच्या मनोरंजनासाठी दरबारातील गायिकेचे गायन ठेवले. पूर्ण स्वामीजींच्या मनात आले की आपण तर सर्वसंग परित्यागी संन्यासी आहोत. आपण पोटासाठी गाणे म्हणणाऱ्या गायिकेचे गाणे का ऐकायचे? त्यामुळे ते गाण्याच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. स्वामीजींसारख्या महापुरुषाची सेवा म्हणून गाणे म्हणू इच्छिणाऱ्या गायिकेला खूप वाईट वाटले. तिने भावपूर्ण स्वरात संत सूरदास यांचे पद म्हटले "प्रभु मोरे अवगुण चित ना धरो समदरसी है नाम तीहारो चाहे तो पार करो". गायिकेचे हे आर्त स्वरातील गाणे ऐकल्यानंतर स्वामीजींना आपली चूक कळून आली आणि त्यांनी लगेच जाऊन हात जोडून तिची क्षमा मागितली. प्रत्येकातील परमेश्वर बघायला शिकले पाहिजे ही गुरूंची शिकवण त्यांनी आता पूर्णपणे आत्मसात केली. नंतर आपल्या शिष्यांना स्वामीजी हा प्रसंग वारंवार सांगत.
कदा चूक कार्यात हातून झाली
अशी बांधवाने तुला दाखविली
तरी ती चुकी मान्य आहे म्हणावे
न हेका धरोनी कधीही बसावे
झालेल्या चुका मान्य करून स्वत:मध्ये योग्य तो बदल करत राहिल्याने नरेंद्राचे विवेकानंद झाले.
रामकृष्ण परमहंस यांचे एक शिष्य गिरीश चन्द्र उर्फ जीसीबाबू हे तत्कालीन बंगाली रंगभूमीवर एक प्रसिद्ध नट होते. जीसीबाबू स्वामीजींना नरेंद्र म्हणत. स्वामीजी त्यांच्या पहिल्या विदेश प्रवासानंतर कोलकात्यामध्ये आल्यावर एके दिवशी जीसीबाबू मठात आल्यानंतर त्यांनी पाहिले की स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांसोबत चर्चा करताहेत. स्वामीजींनी गमतीने विचारले , "जीसीबाबू तुम्ही वेद, वेदांत इत्यादीचे काही अध्ययन केले आहे का?" जीसीबाबू उत्तरले, " नरेंद्रा, मी तुझ्या इतका बुद्धिमान नाही. रामकृष्णांचे नाव घेऊनच माझे काम काम होते. मला ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. पण तू मला सांग, एका प्रतिष्ठित घरातील महिला अत्याचाराला सामोरी जात आहे, दुसऱ्या एका घरात आजवर अनेकांना भोजन देऊन तृप्त करणारी महिला उपाशी आहे. या सगळ्यांसाठी तुझ्या वेद वेदांत इत्यादी ग्रंथात काय लिहिले आहे. "
जीसीबाबूंचे हे उद्गार ऐकताच स्वामीजी भावविवश झाले. त्यांचे कमलनयन भरून आले आणि त्या खोलीतून ते दुसरीकडे निघून गेले.
जीसीबाबू स्वामीजींच्या शिष्यांना म्हणाले, " तुमच्या गुरूला मी मानतो ते केवळ तो बुद्धिमान, विद्वान, प्रभावी वक्ता आहे म्हणून नाही. तर तो सहृदय, संवेदनशील माणूस आहे म्हणून मी त्याला मानतो."
थोड्यावेळाने स्वामीजी शांत होऊन परत आले आणि जीसीबाबूंनी बघितले की स्वामीजी आपल्या शिष्यांना म्हणताहेत आपण समाजाच्या सेवेसाठी सेवाश्रम सुरू करायचे ठरवले आहे ते कार्य आपल्याला लवकरात लवकर सुरू केले पाहिजे.
स्वामीजींनी रामकृष्ण मठाचे बोधवाक्य "आत्मनो मोक्षार्थम् जगत हिताय च" असे ठेवले ते त्यांनी प्रत्यक्षात जगून दाखवले.
या महापुरूषाला विनम्र अभिवादन!
सुधीर गाडे,पुणे
Comments
Post a Comment