भाषा - शब्द शिकण्याचे माझे प्रयत्न..

"તને ગુજરાતી આવડે છે?"(तने गुजराती आवडे छे के?) असं समोरच्याने विचारले. मी विचार करू लागलो की गुजराती भाषा अजून आपल्याला येत नाही मग ती आवडणार कशी?

मला लहानपणापासून वेगवेगळ्या भाषा , शब्द शिकायला आवडते. माझ्या आठवणीप्रमाणे आमचा शाळेतील मित्र शेखर जगताप याच्याकडे मी शाळेत असताना भाषांचं एक पुस्तक बघितलं होतं. त्यात अनेक भारतीय भाषांमधील सोपी छोटी वाक्ये दिली होती. ते पुस्तक वाचून मला काही वाक्ये लक्षात राहिल्याचं आठवतं. कन्नड भाषेतील ' येनु' म्हणजे ' काय रे?' , 'येन री ?' म्हणजे ' काय हो?' ही वाक्ये लक्षात राहिली. नंतर १९९०-९४ या वर्षात साताऱ्यात शिकायला होतो. तेव्हा शूर्पाली काकू यांच्याकडे काही महिने जेवायला आम्ही काही मित्र जात असू. तेव्हा आणखी काही कानडी शब्द शिकायला मिळाले. "नीर बेकु" म्हणजे पाणी हवं आहे, "मजगी हाकरी" "ताक वाढा" . माझी सासुरवाडी सोलापूर. त्यामुळे लग्नानंतर, 'बर्री' म्हणजे 'या' , ' बर्तिनी' म्हणजे 'येतो' या शब्दांची उजळणी झाली.
साताऱ्यात असतानाच मी काही महिने साल्वेशन आर्मी हॉस्टेलवर राहिला होतो. तेव्हा आमच्या बरोबर आंध्रमधील मस्तान शेख हा मित्र होता. त्याच्याकडून काही तेलुगू शब्द शिकल्याचे आठवतं. आता त्यातील फक्त एकच शब्द आठवतो तो म्हणजे 'आडा गुड्डा' म्हणजे लुुंगी. गेल्या वर्षभरात या तेलुुुुगू शब्दांमध्ये 'सरे' म्हणजे 'ठीक आहे', 'चेप्पू' म्हणजे 'मला सांग', 'माटलाडू' म्हणजे 'बोला' या काही शब्दांची भर पडली आहे.
फेब्रुवारी १९९५ ते एप्रिल १९९५ असे साधारण तीन महिने मी एका खाजगी कंपनीत दमण येथे नोकरीला होतो. तिथली स्थानिक भाषा गुजराती. आता इथे राहायचं म्हणजे भाषा शिकण्याची संधी आहे असं लक्षात घेऊन मी लिपी देखील शिकायचं ठरवलं. त्यासाठी एक गुजराती अंकलीपी विकत घेतली होती. ती वाचून मी अक्षरे वाचायला शिकलो. त्यावेळी मला हळूहळू बऱ्यापैकी वाचायला येउ लागले होते. आतादेखील गुजराती मी थोडं वाचू शकतो. काही अक्षरं अडतात. दमणमध्ये आजूबाजूच्या लोकांचे ऐकून मला गुजराती समजू लागले. छोटी काही वाक्ये बोलता येऊ लागली. गुजरातीमध्ये 'आवडे ते?' म्हणजे 'येतं का?' हे समजल्यानंतर आवडे गुजराती आवडे के म्हणजे गुजराती येतं का हि मला समजू लागलं. मग मी उत्तर देत असे 'आवडे छे पण सारू नथी आवडे' म्हणजे 'समजतं पण चांगलं समजत नाही'. ' केम छो?' म्हणजे 'कसे आहात?', ' मजामां' म्हणजे 'मजेत' , 'बद्धा' म्हणजे 'सगळे लोक' 'सरस' म्हणजे छान 'ठंडू' म्हणजे 'थंड', 'मीठू' म्हणजे 'गोड', ' थई जशे' 'होऊन जाईल' असे काही शब्द छोटी वाक्य समजु लागली .बोलता येऊ लागली. नंतर ऑक्टोबर १९९५ ते मे १९९७ या काळात एका गुजराती खाजगी कंपनीत मी नोकरी केली. तेव्हा आणखी काही वाक्यं शिकायला मिळाली उजळणी झाली. 'मोकलावी दू' म्हणजे 'पाठवून द्या/देतो ' वगैरे.
१९९७ - १९९९ या वर्षांत मी संभाजीनगरमध्ये असं असताना रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने मेघालयातील शाळकरी मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू झाले होते. तेथील खासी जनजातीय मुले-मुली हसून "खुब्लै" म्हणजे "नमस्कार" म्हणायची. तो शब्द मी शिकलो.
लग्नानंतर सोलापूरचे काही खास शब्द खोडपत्री(खोडकर), पेंड पाला (डाळ कांदा), नुशा (किडे), का बे(काय रे), कढीपाला(कढीपत्ता), यायलीस ना(येतेयस ना?) , " काय करायली?(काय करते आहेस?), जेवायले(जेवते आहे), त्यानं सांगितला(त्यांने सांगितले) या शब्दप्रयोगांची ओळख झाली आहे.
पिढी प्रमाणे भाषा बदलते असं म्हणतात. काही वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयात प्रात्यक्षिक घेत असताना मल्टीमीटर(एक इलेक्ट्रॉनिक उपकरण) बंद पडला. पटकन एक विद्यार्थिनी म्हणाली "मीटर गंडलाय". 'गंडणे' म्हणजे 'बिघडणे' ही माझ्या शब्दकोशात भर पडली.
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' मुळे आता विद्यार्थ्यांना एकावेळी अनेक भारतीय भाषांची ओळख होईल. त्यातून भारताच्या विविधतेची आणि त्यातील एकतेची ओळख होईल अशी मला खात्री वाटते.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची