आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते?
आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते असा विचार केला की अनेक गोष्टी लक्षात येतात. शाळा आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम, सततची मेहनत करत राहिलो तरच यशाची नवनवीन शिखरे आपण गाठत राहू. ही यशाची शिखरे गाठत असताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवत आपण स्वतःवर विश्वास ठेवू. आधुनिक जगात बाह्य स्पर्धा कितीही वाढली असली किंवा तसे वाटत असले तरी खरी स्पर्धा स्वतःशीच असते. कारण स्वतःच स्वतःला नवनवीन आव्हानांसाठी तयार करायचे असते. हे करत असताना स्वतःची काही तत्वे, मूल्ये निश्चित करत ती सदैव स्वतःकडून पाळली जातील याची काळजी घ्यायची असते.वेळोवेळी या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात कोणतीही कुचराई करायची नसते. कोणतेही यश मिळवणे आणि ते खूप काळ टिकवून ठेवणे यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासू सोबत्यांची, सहकाऱ्यांची आवश्यकता असते. या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वतः एकसंघ भावनेने काम करण्याची आवश्यकता असते.
शाळेतील वर्षे ही हसण्याची, खेळण्याची , नवनवीन गोष्टी शिकण्याची आहेत. आपल्या संस्थेच्या शाळेत शिकत असताना संस्थेच्या आणि शाळेच्या प्रदीर्घ इतिहासाची आपल्याला ओळख होते. या वारशाची जाणीव होते. जसे आपण या शाळेचे विद्यार्थी आहोत तसे आपण प्राचीन अशा भारताचे वारसदार आहोत. भारतीय विचाराचा,ज्ञानाचा, तत्वज्ञानाचा वारसा आपण पुढे नेणार आहोत याची जाणीव आपल्याला सदैव असली पाहिजे. ही जाणीव असली म्हणजे यापुढील वाटचालीत आपण अधिक जबाबदारीने वागू. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतःला अधिकाधिक कार्यक्षम आणि पात्र बनवू. वाटेत येणाऱ्या मोहांना आपण बळी पडणार नाही. सर्व प्रकारच्या वाईट सवयी, व्यसने इत्यादीपासून आपण दूर राहू.नवनवीन माहिती, तंत्रज्ञान यांचा आपण अभ्यास करत राहू. त्यांचा योग्य वापर करतात राहू. आयुष्याला वळण देणारी ही वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत हे लक्षात घेऊन आपण आणि आपले सवंगडी हे योग्य मार्गावर चालण्याची काळजी घेऊ.
आपल्यातील चांगले गुण अधिक चांगले करत आणि दुर्गुणांवर ताबा ठेवत आपण आपल्या प्राचीन देशाच्या प्रगतीच्या दिशेने ध्येयावर दृष्टी ठेवून कार्यरत राहिलो तर लवकरात लवकर " समर्थ भारत " साकार झाल्याचे आपल्याला निश्चितपणे बघता येईल.चला तर मग अधिक उत्साहाने पुढे जाऊया.
सुधीर गाडे
खरंय सर म्हणूनच प्रत्येकाच्या मनी "*माझी* शाळा " ही भावना असते.
ReplyDeleteहोय
Delete👌
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete