केसांची कहाणी
" ही पुढे आलेली बट फार कापायला नको." काही दिवसांपूर्वी केस कापायला गेलो असताना केशकर्तनकार गृहस्थ म्हणाले. " हो , ना! " मी म्हटलं. कारण पडलेलं टक्कल थोडं झाकायचं काम ही बट करते आहे हे त्यांना म्हणायचं होतं. थोडंसं हसू आलं. ( गेल्या वर्षीच्या एका कार्यक्रमातील छायाचित्र) एखादा माणूस पहिल्यांदा भेटला की सुरूवातीला नजरेत भरते त्याची उंची,आकारमान आणि असेल तर केशसंभार किंवा टक्कल! त्यामुळे पुरूषमंडळीदेखील स्वतःच्या केसांबाबत बऱ्यापैकी जागरूक असतात. वय वाढत जाते तसे केस हळूहळू पांढरे होत जातात. असे पांढरे होणारे केस काहीजणांना नको वाटतात. मग मेंदी लावणे, केसांना रंग लावणे असे प्रकार सुरू होतात. नियमितपणे रंग लावणारा एखादा माणूस एखाद्यावेळी रंग लावायला उशीर करतो. मग काही केस स्वतःचा नैसर्गिक रंग दाखवतात आणि बाकीच्यांना लक्षात येतं की त्या माणसाचे केस पांढरे झाले आहेत. काही जण फक्त डोक्यावरील केसांना रंग लावतात आणि मिशांना रंग लावत नाही किंवा लावायचे विसरतात. अशावेळी डोक्यावरील केस काळे आणि मिशा काळ्यापांढऱ्या असं थोडं गंमतीदार दिसतं. ...