स्वप्रतिमेचे प्रेम
मध्यंतरी एकदा रस्त्यावरून जाताना एका दुचाकीवरून दोघे जण मोठा आरसा घेऊन जाताना दिसले. मागे बसलेल्या माणसाला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात दिसत होते. मनात सहज विचार आला की आरशात आपण स्वतःचेच प्रतिबिंब किती वेळ बघू शकतो. मग ग्रीक कथा आठवली ती नार्सीससची. अतिशय देखणा असलेला हा तरुण स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात अखंड बुडाला. तासनतास तो नदीकिनारी राहून स्वच्छ पाण्यामध्ये स्वतःचेच प्रतिबिंब बघत राही. शेवटी तिथेच त्याचा मृत्यू झाला. नदीकिनारी सापडणाऱ्या एका फुलाला नार्सिससचे नाव देण्यात आले आहे. तसेच जी व्यक्ती स्वतःच्याच प्रेमात बुडालेली असते. स्वतःचेच मोठेपण जिला अपरंपार वाटते. तिला मानसशास्त्रीय परिभाषेत 'नार्सीसस सिंड्रोम' असे म्हटले जाते. ( छायाचित्रे इंटरनेटवरून साभार) बऱ्याच वर्षांपूर्वी एका विचारवंतांचे वाक्य वाचनात आले होते, " एकाच वेळी तुमच्यासमोर आरसा आणि एखादी सुंदर व्यक्ती आली तर तुमचे पहिले लक्ष आरशाकडेच जाईल." कारण साधारणपणे माणसाचे स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असते. त्यानंतर मग इतरांवर. याबाबतीत माकडीण आणि तिचे पिल्लू यांची गोष्ट प...