छ.शिवराय : हिंदुंवरील आक्रमणाचा प्रतिकार

  मध्ययुगीन काळातील मुस्लिम व ख्रिश्चन शासकांचा हेतू केवळ राज्य जिंकणे व संपत्तीची लूट करणे एवढेच होते असे मानणे भाबडेपणा ठरेल. धर्मप्रसार हा या राज्यकर्त्यांचा एक हेतू होताच. यासाठी अनेक क्रूर प्रकार केले जात. याची काही मोजकी उदाहरणे पाहूया.

 फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये लिहितो,  " कालाबाग हे एक मोठे गाव आहे आणि येथे पुर्वी मुघल बादशहाला खंडणी देणारा एक मोठा राजा रहात असे. येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून तो मोठ्या प्रमाणावर लूट गोळा करीत असे, परंतु औरंगजेब राज्यावर आल्यानंतर त्याने या राजाचा आणि त्याच्या बऱ्याचशा प्रजेचाही शिरच्छेद केला. गावातील मुख्य रस्त्यांच्या नजीक असंख्य खिडक्यांचे मनोरे बांधून प्रत्येक खिडकीवर ठार मारलेल्या माणसाचे डोके ठेवले आहे. प्रत्येक दोन फुटांवर एक-एक डोके याप्रमाणे ही डोकी सर्व मनोऱ्यावर लावून ठेवण्यात आली आहेत. माझ्या मागच्या प्रवासाच्या वेळेस म्हणजेच सन १६६५ रोजी मी कालाबागवरून गेलो तेव्हा हे हत्याकांड होऊन फार दिवस झाले नसावेत , कारण त्यावेळेस ही डोकी शाबूत होती आणि त्यातून अत्यंत घाणेरडा दर्प येत होता."

       सन १५८६ चे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात  लिहिले आहे की " हे अल्लाह, हे मुह्म्मदा, हे अली , हे मीर मुहम्मद झमान याने जेव्हा ऐश्वर्याचे दार आपल्या हाताने आपल्या बाजूस उघडावे (अशी) हिम्मत धरली (तेव्हा) अल्लाहच्या कृपेसाठी तीस व तीन देवळे मोडली (व) या खराबाबादेत इमारतीचा पाया घातला."

     "अगर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी असे कवि भूषण यांनी लिहून ठेवले आहे. ही कदाचित काही जणांना अतिशयोक्ती वाटते. पण त्याची पार्श्वभूमी म्हणून मध्ययुगीन मुस्लिम व ख्रिश्चन सत्ताधीशांचा धर्मवेडेपणा लक्षात घेतला पाहिजे.

        गोव्यात पोर्तुगीज सत्ता स्थिरपद झाली आणि त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराला सुरूवात केली. हिंदुधर्मियांवर अत्याचारांना सुरूवात केली. १६६७  मध्ये गोव्याच्या व्हॉईसरॉयने गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे असा हुकूम काढला. शिवरायांना हे कळताच त्यांनी ताबडतोब बारदेश म्हणजे गोव्याच्या उत्तर भागावर स्वारी केली. आपल्या भवानी तलवारीचे पाणी पोर्तुगीजांना दाखवले. मावळ्यांनी चार ख्रिस्ती धर्मगुरूंना पकडून आणले. त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगितले. त्याला नकार दिल्याने चारही जणांची मुंडकी महाराजांच्या आज्ञेने छाटली गेली. हे सर्व समजल्यानंतरच व्हॉईसरॉयने त्याचा हुकूम मागे घेतला. हा सर्व प्रकार तत्कालीन इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये नमूद केला गेला आहे.


( छायाचित्र फेसबुकवरून साभार )

        मुस्लिम राज्यकर्त्यांनी विजय मिळाल्यावर त्या प्रदेशातील मंदिरे पाडून त्याची मशीद केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात पहायला मिळतात. शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयासाठी गेले तेव्हा तिरुवन्नमलाई येथील मंदिरे पाडून मशिदी करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्या मशिदी पाडून तेथे त्यांनी मंदिरांची पुनर्स्थापना केली. असेच आपल्याला गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराबाबतदेखील पहायला मिळते. महाराजांनी तेथेही पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिराची पुनर्स्थापना केली.

       मध्ययुगीन मुस्लिम आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांनी जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याची उदाहरणेदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या काळात मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्मात गेलेल्या व्यक्तिंना परत आणल्याचे उदाहरण अपवादानेच मिळते. महाराजांपूर्वी अनेक शतके देवल ऋषींनी आपल्या स्मृतीत हिंदू धर्मात परत आणण्याचा विधी सांगितला होता पण तो आचरणात आणला जात नव्हता. शिवराय आग्र्यातील औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातून सुखरूप निसटले. त्याने संतापलेल्या औरंगजेबाने नेतोजी पालकर यांना पकडले आणि जबरदस्तीने मुसलमान केले. शिवरायांनी जबरदस्तीने मुसलमान केल्या गेलेल्या नेतोजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले. 

        महाराजांच्या आज्ञेने कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवभारत ग्रंथ लिहिला आहे. यात अजून वेगळी नोंद सापडते. कल्याण भिवंडी महाराजांनी जिंकली. तेथील अत्याचारी मुस्लिम शासकांना धाक बसावा म्हणून याठिकाणी असलेल्या मशिदी महाराजांनी पाडल्या. तर जॉन फ्रायर हा महाराजांचा समकालीन माणूस लिहितो की जुन्नरमध्ये शिवरायांनी मशिदींची धान्याची कोठारे केली. 

      औरंगजेबाने हिंदुंवर जिझिया कर लावला. मध्ययुगीन काळात मुस्लिम सत्ताधीश असलेल्या प्रदेशात गैरमुस्लिमांना राहायचे असेल तर हा जिझिया कर द्यावा लागत असे. जेव्हा शिवरायांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहून हा कर रद्द करण्यास सांगितले. धर्माच्या आधारावर असा भेदभाव करणे चुकीचे आहे असे लिहिले. 

      ही वेगवेगळी उदाहरणे बघितली की छ. शिवाजी महाराजांनी हिंदु धर्मियांवरील होणाऱ्या अत्याचारांना चोख प्रत्युत्तर दिले हे लक्षात येते‌.  यामुळे कवि भूषणाने आपल्या काव्यात महाराजांचा उल्लेख 'हिंदुपतिपातशाह' असा केला आहे असे म्हणता येते.


सुधीर गाडे पुणे 


संदर्भ:- निनाद बेडेकर यांची भाषणे

'शककर्ते शिवराय' लेखक विजय देशमुख

श्री.जयसिंगराव पवार यांची मुलाखत 

श्री. सत्येन वेलणकर यांचा फेसबुकवरील लेख

Comments

  1. "अगर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी असे कवि भूषण यांनी लिहून ठेवले आहे. ही कदाचित काही जणांना अतिशयोक्ती वाटते. पण त्याची पार्श्वभूमी म्हणून मध्ययुगीन मुस्लिम व ख्रिश्चन सत्ताधीशांचा धर्मवेडेपणा लक्षात घेतला पाहिजे... अगदी बरोबर.... सुरेख सादरीकरण🙏

    ReplyDelete
  2. आज आम्ही जे काही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई ,कर्तृत्व आणि दूरदृष्टी मुळेच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख