विजयाचा क्षण
काही दिवसांपूर्वीच पॅरिस येथे ऑलिंपिकच्या स्पर्धा पार पडल्या. दर चार वर्षांनी हा खेळांचा जागतिक महाकुंभ भरत असतो. यामध्ये अनेक खेळ खेळले जातात. अनेक घटना घडत असतात. काही जण विजयी होतात तर काहीजण पराभूत होतात. यानिमित्ताने काही विचार डोक्यात आले. ( छायाचित्र यूट्यूबरून साभार ) बऱ्याच वर्षांनी मी टेनिसचा सामना बघत होतो. नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यातील सामना अतिशय चुरशीने चालू होता. दोघांनाही एकमेकांची सर्विस काही भेदता आली नाही. त्यामुळे प्रत्येक सेट हा टायब्रेकरमध्ये गेला. जोकोविचला अल्कारेज याने हैराण करून सोडले होते. आता जोकोविचची सर्व्हिस भेदली जाईल असे वाटता वाटता जोकोविचने नाही बाजी पलटवली आणि गुण मिळवला. असे बऱ्याच वेळा होत होते. शेवटी नवागत तारुण्याचा उर्जेवर अनुभवी विजेत्याने मात केली आणि हा सामना जोकोविचने जिंकला. सामना जिंकल्यानंतर लगेचच तो आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्याला रडू फुटले. आपल्या डोक्यावर टॉवेल घेऊन त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली. आत्तापर्यंत जोकोविचने अनेक विक्रमांन...