चौकटीबाहेरचे उपाय

       माणसांना आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे उपाय योजावे लागतात. हे उपाय योजताना साधारणपणे बऱ्याचवेळा उत्स्फूर्तपणे जे‌ उपाय सुचतात किंवा ज्या भावना स्वाभाविकपणे निर्माण होतात त्यांच्या आधारावर सुचलेल्या गोष्टी अमलात आणल्या जातात. काहीवेळा आधी ऐकलेले , माहिती असलेले उपाय अमलात आणले जातात.


   असे सर्व उपाय साधारणपणे ठराविक प्रकारचे असतात. संबंधित व्यक्ती आपल्याशी नातेसंबंध किंवा मैत्रीने निगडित असेल तर समजावून सांगणे, रागावणे, लहान वयाच्या मुले मुली असतील तर त्यांना फटके देणे किंवा शिक्षा करणे असे उपाय असतात. आर्थिक गरज असेल तर उसने मागणे, आपली गरज समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे अशा गोष्टी घडतात. संबंधित व्यक्ती विरोधक, शत्रू किंवा अपरिचित असेल तर शाब्दिक देवाणघेवाण, शिवीगाळ, मारामारी, प्रसंगी प्रभावी मध्यस्थ किंवा पोलिसांची मदत घेणे अशा गोष्टी होतात. आर्थिक विषय असेल तर बळजबरीने पैसे उकळणे, फसवणूक करणे अशा उपायांचा वापर होतो.

      पण साधारणपणे असे सर्व उपाय पठडीतील किंवा ठराविक चौकटीतील असतात. बऱ्याचदा अशा उपायांनी प्रश्न सुटतात किंवा त्यांची तीव्रता कमी होते. काही वेळा ठराविक उपायांनी प्रश्न सुटला नाही तर काय ही एक अवघड बाब होऊन बसते. अशा परिस्थितीत काहीजण चौकटीबाहेरचे उपाय करतात. अशा चौकटीबाहेरच्या उपायांनी प्रश्न सोडवल्याची पुढील काही उदाहरणे.
  ( नीलिमा मिश्रा यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )


       जळगाव जिल्ह्यातील बहादूरपूर या गावात राहणाऱ्या श्रीमती नीलिमा मिश्रा या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अगदी लहानपणी त्यांनी आपल्या गावातील गरीबीच्या प्रश्नावर उपाय शोधण्याचे ध्येय निश्चित केले. तरुणपणी त्यांनी या कामाला सुरुवात केली. महिलांचे बचतगट स्थापन करणे, लघुउद्योग सुरू करणे, साक्षरतेचे प्रमाण वाढवणे असे अनेक प्रकल्प त्यांनी हाती गेले. चिकाटीने दीर्घकाळ प्रयत्न केल्याने त्यांना त्यात यश मिळत गेले. हळूहळू कामाला उभारी येत गेली आणि समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून मदत मिळू लागली. काम पुढे जाऊ लागले. गावात एक प्रश्न होता स्वच्छतेचा. त्यासाठी त्यांनी मदत मिळवून गावात स्वच्छतागृहे बांधली. चांगली व्यवस्था उभी केली. पण महिला या स्वच्छतागृहांचा वापर करत नाहीत हे लक्षात आले. नीलिमाताईंनी महिलांशी संवाद साधला. त्यातून त्यांच्या लक्षात आले की बाहेर शौचासाठी जाणे यातून या महिलांना घरातील सुखदु:ख मोकळेपणाने बोलता येते, सासुरवास होणाऱ्या सुनांना आपले मन मोकळे करता येते. बंदिस्त स्वच्छतागृहांमध्ये असा संवाद शक्य नव्हता. यातून मार्ग कसा काढायचा हा विचार नीलिमाताईंनी केला. त्यातून त्यांनी गोल आकारात स्वच्छतागृहांची उभारणी करून घेतली. याचा वापर अपेक्षित पद्धतीने सुरू झाला स्वच्छतेचा प्रश्नही सुटला आणि महिलांना याठिकाणी मोकळा संवाद‌ करता येऊ लागला.



( एच.सी.वर्मा यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

         दुसरे उदाहरण आहे एच.सी.वर्मा ह्या भारतात प्रसिद्ध असलेले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे. हे मूळचे बिहारचे. त्यांच्या वडिलांनी उशीराच्या वयात आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते शिक्षक झाले. त्यांचे बंधू हेदेखील अभ्यासाची आवड असलेले, हुशार विद्यार्थी होते. पण एच.सी.वर्मा यांना मात्र अभ्यासाची आवड नव्हती. वडील, मोठे भाऊ यांनी त्यांना अनेकवेळा समजावून सांगितले. रागावून सांगितले. शिक्षादेखील केली. पण एच.सी.वर्मा यांचे काही अभ्यासाकडे लक्ष लागेना. त्यांची आई अशिक्षित होती. तिलाही आपल्या या मुलाने शिकावे असे वाटत होते. बिहारमध्ये दिवाळीनंतर छटपूजा हा एक महत्त्वाचा सण साजरा केला जातो. त्यासाठी विशिष्ट प्रकारची मिठाई घरात करतात. ही मिठाई एच.सी.वर्मा यांना खूप आवडत असे. त्यांच्या आईने त्यांना सांगितले, " तू जर दररोज एक तास एकटा आमच्या खोलीत थांबलास तर तुला दररोज ती मिठाई मी करून देईन." लहानग्या एच.सी. वर्मांना हा प्रस्ताव खूपच आवडला आणि तसे वागायचे त्यांनी मान्य केले. आपण सहजच एकतास घालवू असे त्यांना वाटले. पण एकट्याने वेळ घालवणे किती कठीण आहे हे त्यांना हळूहळू लक्षात आले. मग ते अभ्यासाच्या पुस्तकांकडे वळले. हळूहळू त्यांना अभ्यासाची गोडी लागली. त्यांची शैक्षणिक कारकीर्द देदीप्यमान आहे. पण त्याचा पाया आईच्या चौकटीबाहेरच्या उपायात आहे हे त्यांचे मत आहे.

        चौकटीबाहेरचे उपाय शोधण्याची ही दोन उदाहरणे. एक उदाहरण सार्वजनिक समस्येवर उपाय शोधल्याचे आहे तर दुसरे उदाहरण वैयक्तिक समस्येवर उपाय शोधल्याचे आहे. दोन्ही उदाहरणे प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहेत.

सुधीर गाडे पुणे 
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments

  1. चौकटी बाहेरचे उपाय उत्तम लेखन केले सर दोन्ही उदाहरणे प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहेत🙏

    ReplyDelete
  2. खुप छान विषय व प्रेरणादायी उदाहरणं....

    ReplyDelete
  3. दोन्ही उदाहरणे प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहेत... सर , सुंदर लेखन🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची