लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचे मार्गदर्शक जीवन
एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि कार्य शेकडो वर्षे समाजजीवनाला प्रेरणा देत राहते. समाजावर त्याचा प्रभाव पडतो. अशा व्यक्तिंच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे लोकमाता अहिल्यामाई होळकर. त्यांच्या जन्माला तीनशे वर्षे होऊन गेली तरी त्यांचा प्रभाव आजही समाजजीवनावर आहे. तसेच त्यांच्या कृती आजदेखील मार्गदर्शक आहेत. या दीर्घ लेखात ह्या लोकविलक्षण जीवनाच्या प्रभावाच्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करण्यात आली आहे.
ही चर्चा सुरू करण्यापूर्वी तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. अहिल्यामाईंच्या १७२५ ते १७९५ या जीवनकाळात देशभर राजेशाही पद्धत होती. छोटेमोठे राजे देशभर होते. मराठी साम्राज्याचा विस्तार देशभर झाला होता. मराठी साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते.ऐ आक्रमक इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यपाराला सुरुवात करून भारतात राज्यकारभार बळकवायला सुरुवात केली होती. प्रथम बंगाल नंतर अन्य भागात इंग्रजी सत्ता स्थिरस्थावर होत होती. भारतीयांवर चालीरीती, रुढी यांचा विलक्षण पगडा होता. अस्पृश्यतेसारखी माणुसकीला कलंक असलेली गोष्ट ही आमची धार्मिक पवित्र रूढी आहे असे समजून हिंदू त्याचे आचरण काटेकोरपणे करत होते. जातीपातींचा समाजावर प्रचंड पगडा होता. 'रोटी बंदी,बेटी बंदी' यांसारख्या बंदी हिंदू आग्रहाने पाळत होते. स्त्रिया बंधनांमध्ये जखडून गेल्या होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला विशेष वाव नव्हता. 'चूल आणि मूल ' हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. 'रांधा,वाढा , उष्टी काढा' यातच स्त्री जन्म संपून जात होता. इंग्रज आणि इतर युरोपियन लोकांनी केलेली विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती समाजाला दिसत होती पण राज्यकर्ते अथवा समाजधुरीण त्याप्रकारची प्रगती आपल्या राज्यात व्हावी यासाठी कोणतीही खटपट करत नव्हते. या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेली सामुग्री विकत घेण्यापलीकडे कोणाची दृष्टी जात नव्हती. इंग्रज आणि इतर युरोपियन लोकांचा विस्तारवाद कोणाला विशेषपणे समजत नव्हता. अशा इतरही अनेक गोष्टी सांगता येतील.
या पार्श्वभूमीवर आजच्या काळाचा विचार करताना हे लक्षात येते की यातील अनेक बाबतीत आपण समाज म्हणून पुष्कळ प्रगती केली आहे. पण तरीही अजून काही टप्पा गाठायचा बाकी आहे. त्याचबरोबर काही नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला फाळणी होऊन मिळालेले स्वातंत्र्य आणि भारतात असणारी लोकशाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे या काळात आहेत.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनाचा विचार करताना त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांची आठवण होते. त्यांची असणारी ईश्वरावरील दृढ श्रद्धा, स्वतःवर आलेली राज्यकारभाराची जबाबदारी पार पाडण्याची तयारी, त्यासाठी सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यातील हुशारी, आप्तांच्या चुकीच्या वर्तनाबाबत प्रसंगी घेतलेली ठाम भूमिका, प्रजाहितदक्षता, त्यासाठी घेतलेले अनेक निर्णय, पतीच्या निधनानंतर तत्कालीन समजुतीनुसार सती जाऊन पुण्य मिळवण्याच्या इच्छेला कर्तबगार सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विनंतीवजा आज्ञेनुसार घातलेली मुरड, स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्यांना दिलेले आव्हान, लढाईत घेतलेला सहभाग , वैयक्तिक आयुष्यातील दुःखाचा परिणाम राज्यकारभारावर होऊ न देण्याची स्थितप्रज्ञता, इंग्रजांच्या विस्तारवादी वृत्तीचा घेतलेला अचूक वेध अशा अनेक गुणांची यादी न संपणारी आहे. परंतु मला सर्वात जास्त महत्वाची वाटते ती त्यांची अखिल भारतीय स्वरुपाचा विचार करणारी दृष्टी. अशा वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या प्रसिद्ध उक्तीची आठवण होते ती म्हणजे, "प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे." या दृष्टिकोनातून अहिल्यामाईंनी उत्तरेला हिमालयातील बद्रीनाथपासून ते दक्षिणेला रामेश्वरपर्यंत आणि पश्चिमेला सोमनाथपासून ते पूर्वेला जगन्नाथ पुरीपर्यंत देशभर पसरलेल्या शेकडो मंदिरांचे जीर्णोद्धार व इतर बांधकामे, यात्रेकरूंच्या सोयी, वाटसरूंसाठीच्या सुविधा निर्माण केल्या. हे करताना त्यांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागाचाच विचार न करता सर्व भारताचा विचार केला. त्यासाठीचा सर्व खर्च स्वतःच्या खाजगी संपत्तीतून केला. ही त्यांची कृती समजून घेत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंदवलेले निरीक्षण आठवते ते म्हणजे, "भारतासारखी सांस्कृतिक एकात्मता क्वचितच कोणत्या देशात आहे."
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या या वृत्तीची आजदेखील आवश्यकता प्रकर्षाने जाणवते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होत आली परंतु अजूनही देशात संपूर्णपणे अखिल भारतीय वृत्ती निर्माण झाली नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. काही राज्यांत नद्यांच्या पाणीवाटपावरून असणारे संघर्ष, राज्यांच्या सीमांबद्दल, राजधानीबद्दल काही ठिकाणी होणारा उद्रेक, राज्यामध्ये राहणाऱ्या दुसऱ्या राज्यातील भारतीय बांधवांबद्दल घेतलेली आक्रमक भूमिका, ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या भाषेविषयी असलेली अनास्था वा तुच्छता अशा अनेक गोष्टी आज आपल्याला बघायला मिळतात. यात मूळ मुद्दा आहे तो अखिल भारतीय वृत्ती असण्याचा. शाळा , महाविद्यालयात म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेतील 'सारे भारतीय माझे बांधव आहेत.' हे वाक्य आचरणात आणण्याची अतिशय आवश्यकता आहे. ही अहिल्यामाई यांच्या जीवनाची सर्वात मोठी शिकवण आहे असे वाटते.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या मार्गदर्शक गुणांचा विचार करताना दुसरा गुण प्रकर्षाने वर्णावा वाटतो तो म्हणजे त्यांची ईश्वरावर असलेली दृढ श्रद्धा. वैयक्तिक जीवनात दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्यांची ईश्वरावरील श्रद्धा डळमळीत झाली नाही. आपले आराध्य दैवत श्री शंकर यांची उपासना त्यांनी चालूच ठेवली. त्यात खंड पडू दिला नाही. ही उपासना म्हणजे त्यांची आध्यात्मिक साधना होती. याचा परिणाम म्हणून त्यांच्या हाती राज्यकारभार आल्यावर त्यांनी हे राज्य शिवशंकरला अर्पण केले. स्वतः विश्वस्त भूमिकेतून कारभार केला. याचबरोबर सगुण उपासनेचा मार्ग म्हणून कोटी लिंगार्चन विधी केला. आजदेखील देवी अहिल्या ट्रस्टच्या वतीने हा विधी काही प्रमाणात चालू आहे. आध्यात्मिकतेच्या गुणाचा विचार करताना या उपासनेबरोबरच त्यांचे चारित्र्य शुभ्र धवल होते ही महत्त्वाची गोष्ट आहे.
आज आजूबाजूला बघताना लक्षात असे येते की समाजामध्ये काही स्तरात ईश्वरावरील श्रद्धा आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. भारतात ईश्वराची उपासना याचा अर्थ विशिष्ट प्रकारची पूजा असा घेताच येणार नाही. याचे कारण भारतामध्ये प्राचीन काळापासून उपासनेच्या विविध पद्धती चालत आलेल्या आहेत. तसेच या उपासना पद्धती एकाच अंतिम सत्य असे दर्शन घडवतात ही श्रद्धा आहे. 'एकम् सत् विप्रा: बहुधा: वदन्ति|' ही प्राचीन भारतीय श्रद्धाच स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ११ सप्टेंबर १८९३ च्या भाषणात जगाच्या व्यासपीठावर मांडली आहे. त्या भाषणात स्वामीजी म्हणाले, " सर्व धर्म सत्य आहेत ही हिंदूंची श्रद्धा आहे." तसेच स्वामीजींनी इतर अनेक ठिकाणी म्हटले आहे की "आध्यात्मिकता हा भारताचा प्राण आहे." हेदेखील महत्त्वाचे आहे. पण सध्या आध्यात्मिकतेचे आचरण कमी आहे असे वाटते. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढल्यामुळे धार्मिक स्थळांच्या यात्रा गर्दीने ओसंडून वाहत आहेत असेही चित्र दिसते. परंतु आध्यात्मिकता याचा अर्थ केवळ उपासना असा न घेता, उपासना करण्याबरोबरच वैयक्तिक चारित्र्याची शुद्धता असा घेतला तर मात्र याबाबतीतील आव्हान सहजपणे लक्षात येते. तसेच काही प्रमाणात आध्यात्मिकतेचे अवडंबर माजवल्याची उदाहरणेदेखील बघायला मिळतात. अशा वेळी अहिल्यामाईंचे चरित्र मार्गदर्शक आहे हे लक्षात येते.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनात त्या महिला आहेत म्हणून त्यांना कमी लेखण्याचे प्रसंग घडल्याचे वाचायला मिळते. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची जहागिरी बळकावण्याचा प्रयत्न राघोबा पेशवे यांनी होळकर संस्थानाचे त्यावेळचे दिवाण गंगाधर चंद्रचूड यांच्या सांगण्यावरून केल्याचे दिसते. आपल्या चतुराईने आणि बाणेदारपणाने अहिल्यामाई यांनी राघोबाची फजिती केली. तसेच एका प्रसंगी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी देखील अहिल्याबाई यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या प्रसंगी "तर हिंमत धरून महादजी, तुम्ही आणि तुकोजी फौजेसुद्धा इंदूरवर चालून या. हत्तीच्या पायातील साखळदंड तेच दिवशी तुमच्या पायात न अडकवले तर सुभेदारांची सून म्हणवणार नाही ." असे उत्तर अहिल्यामाई यांनी बाणेदारपणे दिले. या कडाडणाऱ्या विजेचे दर्शन घडल्यामुळे महादजींना आपली चूक कळून आली.
आज महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आपण मोठा टप्पा गाठला आहे हे मान्य करावे लागेल. परंतु तरीदेखील काही प्रमाणात महिलांना कमी लेखण्याच्या घटना आजूबाजूला घडत आहेत हे नाकारता येणार नाही. अशा अनुभवांना ज्यांना सामोरे जावे लागते त्या सर्व स्त्रियांसाठी अहिल्याबाई यांचे उदाहरण आदर्श आहे. अहिल्यामाई यांनी बळकट आत्मविश्वास, योग्य शिक्षण प्रशिक्षण, परिस्थितीचे अचूक आकलन,दृढ निश्चय या गुणांच्या आधारे स्वतःचे स्थान अढळ राखले. तसाच प्रयत्न स्त्रियांनीदेखील केला पाहिजे. यातीलच दुसरा मुद्दा म्हणजे ' स्वतः पुरुष आहोत म्हणून श्रेष्ठ आहोत ' असा विचार करणाऱ्या पुरुषांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे विचार करून त्यांनी याबाबत कृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांना सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आयुष्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहता येईल. मल्हाररावांनी अहिल्यामाई यांची क्षमता ओळखून त्यांच्यावर विश्वास टाकला. राज्यकारभाराची सूत्रे यांच्या समर्थ हातांमध्ये सोपवली. त्या काळात हे घडले तर आताही घडू शकते हे सहज समजता येते.
जगभरात माणसाच्या वसाहती स्थिर होत गेल्या तसतशा आलेल्या अनुभवांच्या आधारावर काही पद्धती रूढ होत गेल्या. यातूनच प्रथा परंपरा यांचा जन्म झाला. अनेक प्रथा परंपरा यांच्यामुळे त्या त्या ठिकाणचा मानव समूह एकजिनसी बनला. परंतु जसा काळ पुढे सरकत गेला तसतशा काही प्रथा अन्यायकारक होत गेल्या. त्यातून काही समाज घटकांवर अन्याय होत गेले. हा अन्याय दूर करण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. काही प्रयत्न यशस्वी ठरले. हे चित्र जगभरात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात दिसते. यातील ज्या समाज घटकावर सर्वत्र अन्याय झाला असे म्हणता येईल तो समाज घटक म्हणजे महिलांचा वर्ग. भारतात मध्ययुगीन काळात स्त्रीला दुय्यम लेखण्यात आले आणि अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार स्त्रियांवर होत राहिले. यातील एक अन्याय हा विवाहाच्या निमित्ताने होत असे. तो म्हणजे विवाह होण्यासाठी मुलीच्या वडिलांना मुलाला हुंडा द्यावा लागत असे. समाज स्थिर होण्यामध्ये विवाह संस्थेने महत्त्वाची भूमिका सदैव बजावली आहे. त्यामुळे विवाह ही आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मुलीचे वडील नाईलाजाने हुंडा देत असत. गरीबांची यात फार मोठी अडचण होत असे. लोकमाता अहिल्यामाई होळकर एकेदिवशी त्यांच्या दरबारात असताना काही ब्राह्मण मंडळी त्यांना भेटायला आली. गरीबीमुळे हुंडा देणे शक्य होत नाही म्हणून आमच्या मुलींचे विवाह होत नाहीत हा प्रश्न त्यांनी अहिल्यामाईंच्या कानावर घातला. अहिल्यामाई या जशा लोकमाता होत्या तशाच त्या एका मुलीच्या म्हणजे मुक्ताबाईच्या मातादेखील होत्या. त्यामुळे हा प्रश्न त्यांच्या संवेदनशील मनाला भिडला. लगेच त्यांनी कारभाऱ्यांना सांगून आपल्या संस्थानासाठीचा हुंडाबंदीचा हुकूम काढला. अर्थातच अहिल्यामाईंचा विचार हा जातीपातीपलीकडे जाणारा असल्याने हा हुकूम केवळ ब्राह्मण समाजासाठी नव्हता तर सर्व जनतेसाठी होता.
लोकमाता अहिल्यामाई यांची ही कृती आजदेखील किती आवश्यक आहे हे पिंपरीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा लक्षात येते. या घटनेची चर्चा सर्व स्तरावर झाली. अशा घटना कमीअधिक प्रमाणात सगळीकडे बघायला मिळतात. ते बघून आजदेखील काही स्त्रियांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागते हे समजले की दु:ख होते. हुंडाबंदीचा कायदा किंवा घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा होऊन अनेक वर्षे झाली असली तरी हा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. हा प्रश्न सुटण्यासाठी कायद्याच्या कठोर, निष्पक्ष अंमलबजावणीबरोबरच लोकशिक्षणाची खटपट करावी लागेल. ही खटपट करण्याची प्रेरणा अहिल्यामाई यांच्या जीवनातून निश्चितपणे मिळते आहे. यापुढेही ती मिळत राहील.
याच मुद्द्याचा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. देशभरात नोंदवलेल्या गेलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो यांच्या वतीने प्रसिद्ध होत असते. सध्या २०२२ पर्यंतची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचारांचे एकूण ४,४५,२५६ गुन्हे देशभरात नोंदवण्यात आले. याचे विश्लेषण पाहिले असता सर्वाधिक म्हणजे ३१.४% गुन्हे नवरा अथवा सासरच्या लोकांनी केलेल्या अत्याचारांचे आहेत. त्याखालोखाल १९.२% अपहरण, १८.७% विनयभंग, ७.१% बलात्कार आणि २३.७% अन्य प्रकारचे गुन्हे आहेत. अजून एक मुद्दा म्हणजे २०१८ च्या अहवालानुसार प्रत्येक १००००० महिलांपैकी ५८.८ महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागले होते तर २०२२ च्या अहवालानुसार हेच प्रमाण दर १००००० महिलांपैकी ६६.४ महिला इथपर्यंत वाढलेले आहे. एकूण गुन्ह्यांच्या संख्येत झालेली वाढ, गुन्हे नोंदविण्याच्या यंत्रणेतील सुधारणा, महिलांनी पुढे येऊन गुन्हे नोंदविण्याचे धाडस दाखविण्यात झालेली वाढ यांसारख्या कारणांमुळे ही वाढ झाली असल्याचे नोंदवले गेले आहे. ही सर्व आकडेवारी कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवाहन करणारी आहे. अहिल्यामाई यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण समाज म्हणून आपल्या नियंत्रणात असलेल्या परिस्थितीत बदल करण्याची शिकवण आचरणात आणू शकतो. यासाठी मनमोकळा संवाद, चांगल्या सवयी या गोष्टी आपण करू शकतो.
सर्वच महान व्यक्तिंनी समाज बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील बहुतेक प्रयत्न सफल झाले. पण काही प्रयत्न असफल ठरले. या असफल प्रयत्नातील एक दु:खद प्रयत्न लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनातील आहे हे खेदाने सांगावेसे वाटते. अहिल्यामाईंचे चिरंजीव मालेराव, जावई यशवंतराव, नातू नाथ्याबा हे त्यांच्या डोळ्यासमोर अकाली मरण पावले. प्रत्येक वेळी अहिल्यामाई यांनी आपल्या सुना, मुलगी , नातसुना यांनी सती जाऊ नये यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. पण दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. डोळ्यांदेखत या सगळ्याजणी सती जाताना बघण्याचे काळीज पिळवटून टाकणारे दु:ख अहिल्यामाईंना सहन करावे लागले. हे सगळे वाचताना या महान माऊलीलादेखील अपयश आले हा विचार उद्विग्न करून सोडतो. पण जीवनाचा प्रवाह थांबवता येत नाही हे अटळ सत्य लक्षात घेऊन पुढे जावेच लागते. खचून जाता येत नाही. थांबता येत नाही.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या कुशल राज्यकारभाराचे कौतुक सर्वांनीच केले आहे. राज्यकारभार करताना त्यांनी आपले कुटुंब आणि प्रजा यांच्यात फरक केला नाही हे निश्चितपणे म्हणता येते. होळकर संस्थानातून प्रवास करणाऱ्यांना निमाड भागात जंगलातून जाणे हे क्रमप्राप्तच होते. पण या जंगलातच भिल्ल समाजातील काही मंडळी वाटसरुंवर हल्ला करून त्यांना लुबाडायची. मिळालेल्या लुटीतून ते आपली उपजीविका चालवायचे. या प्रश्नाचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्यामाई यांनी अनेक प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यावेळी त्यांनी एक विलक्षण गोष्ट केली. "जो कुणी या उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करील त्याची जातपात न पाहता त्याच्याशी आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करण्यात येईल." अशी दवंडी पिटवली. या दवंडीनुसार यशवंतराव फाणसे या वीराने या उपद्रवी लोकांचा बीमोड केला. अहिल्यामाईंनी आपला शब्द अर्थातच पाळला. त्यांनी थाटामाटात हा विवाह लावून दिला.
या घटनेत लोकमाता अहिल्यामाई होळकर यांची संवेदनशीलता जशी दिसून येते तसा त्यांची प्रजेविषयीची आपुलकी दिसून येते. ज्या राज्यकर्त्यांच्या मनात ही आपुलकी असते त्यांनी काळावर आपला ठसा उमटवला आहे हे सगळीकडे दिसून येते. राज्य यंत्रणेचा अधिकार ज्यांच्याकडे आहे अशा सर्व व्यक्तिंसाठी सर्वकाळ मार्गदर्शक अशीच ही भूमिका आहे. त्या अर्थाने ही भूमिका कालातीत आहे.
या प्रसंगाचा अजून एक पैलू म्हणजे विवाह हा जात बघून न करता कर्तृत्व बघून केला पाहिजे ही लोकमाता अहिल्यामाई यांची शिकवण. भारताच्या जन्मजात जाती व्यवस्थेमुळे ' श्रमांची विभागणी तर झाली आहे पण श्रमिकांचीही विभागणी झाली आहे.' हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मत दु:खद वस्तुस्थिती दाखवणारे आहे. या विभागणीत उच्चनीचतादेखील समाविष्ट झाली आणि जातीपातींची उतरंड तयार झाली. ही उतरंड अबाधित ठेवण्यासाठी 'बेटी बंदी' म्हणजे आंतरजातीय विवाहाला बंदी झाली. यातून एक कप्पेबंद व्यवस्था तयार झाली. माणसांच्या अंगभूत क्षमतांवर अन्याय करणारी ही व्यवस्था मोडण्यासाठी अनेक महान व्यक्तिंनी 'आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत' असा विचार मांडला. तसा आग्रह धरला. त्यासाठी प्रयत्न केले. याच मालिकेतील हा पूर्वी घडलेला प्रसंग आहे असे म्हणता येईल. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ५.८% होते. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. सामाजिक अभिसरण होऊन समतायुक्त समाज निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आजदेखील उपयुक्त आणि आवश्यक आहे हे लक्षात घेतले म्हणजे अहिल्यामाईंच्या या प्रयत्नाचे मोल समजते.
याच प्रसंगाचा आणखी एक पैलू लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचे राज्यव्यवहाराचे कौशल्य दाखवून देतो. ज्यावेळी या उपद्रवी मंडळींना पकडून अहिल्यामाई यांच्यासमोर हजर करण्यात आले त्यावेळी त्यांनी त्यांच्या या उपद्रवी वृत्तीमागचे कारण जाणून घेतले. रोजगाराची इतर कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने ही माणसे या मार्गाला लागली आहेत हे त्यांनी समजून घेतले. हेदेखील आपले प्रजाजन आहेत त्यांची समस्या सोडवणे हादेखील कारभाराचा भाग आहे हे त्यांच्या सहजच लक्षात आले. या विचारांमुळेच त्यांनी या उपद्रवी लोकांना ठार मारण्याची अथवा कारावासाची शिक्षा दिली नाही. तर वेगळा विचार करून याच मंडळीकडे वाटसरुंच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवली. या कामासाठी मोबदला म्हणून 'भिलकवडी' नावाच्या कराला मान्यता दिली. त्याच्या आकारणीत एकसूत्रता आणली. म्हणजे त्रास ज्यांना होतोय ते आणि जे त्रास देत आहेत ते असे दोन्ही बाजूकडचे लोक यांच्या समस्येचे समाधान केले. हा विचार आदर्श असाच आहे. ह्या विचारात दुष्ट माणसांना ठार न मारता त्यांचा दुष्टपणा संपावा ही भूमिका दिसते. ही भूमिका संत ज्ञानेश्वर यांच्या 'जे खळांची व्यंकटी सांडो' या भूमिकेशी नाते सांगणारी आहे हे सहज समजते.
कोणत्याही राज्यकर्त्याला एखाद्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार कसा करावा आणि सर्वांचे समाधान होईल असा उपाय कसा शोधावा याची शिकवण देणारे हे उदाहरण आहे. काळ जसा बदलत जातो तसतशा समस्या बदलत जातात पण त्या सोडवण्यासाठीचा एक सार्वकालिक दृष्टीकोन लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या या प्रसंगतील भूमिकेतून दिसून येतो. हा दृष्टिकोन योग्य दिशा दाखवणारा आहे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनकाळातील अजून एक प्रसंग लक्षणीय आहे. होळकर संस्थानातील जंगलभागातून जाताना संगमनेरनिवासी शाहीर अनंत फंदी यांना भिल्लांनी पकडले. शाहिरांनी कवने गाऊन स्वतःला अहिल्यामाईंकडे नेण्यास भिल्लांना भाग पाडले. अहिल्यामाई यांनी आपल्या वाड्यावर या शाहिराच्या कवनांचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमात शृंगारिक कवनांचा भरणा होता. अहिल्यामाई यांनी शाहिरांचे कौतुक केले. बिदागी दिली. दुसऱ्या दिवशी बोलवून सल्ला दिला " अंगातील कलेचा उपयोग ईश्वरभक्ती वाढावी यासाठी करा." शाहिरांनी तो सल्ला मानला आणि आचरणात आणला. यातून अहिल्यामाई यांनी दिलेली 'मानवी जीवनाचे ध्येय उच्च असावे' ही शिकवण आजही आचरणीय आहे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या काळात प्रजेच्या उदरनिर्वाहासाठीची साधने मर्यादित होती. गतानुतिक पद्धतीने व्यवसाय सुरू होते. 'शास्त्रात् रूढीर्बलियसि' असे असल्याने जन्मामुळे ठरणारी जात व्यवसायदेखील ठरवत होती. त्यामुळे नवीन काही उद्योग किंवा उद्योगातील प्रयोग करायला फारसा वाव नव्हता. पण जेव्हा अहिल्यामाई यांनी आपले निवासस्थान नर्मदाकिनारी महेश्वर येथे हलवले तेव्हा त्यांनी विचार करून स्थानिक विणकरांना त्या काळाच्या दृष्टीने नवीन प्रकारच्या साड्या तयार करायला मार्गदर्शन केले. सर्व प्रकारची मदत केली. त्यातून 'माहेश्वरी साडी' तयार झाली. गुणवत्ता चांगली असल्याने याचा व्यापार वाढत गेला. विणकरांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आली. तसेच महेश्वरचे नाव यासाठी देशभरात प्रसिद्ध झाले.
प्रजेच्या सुखासाठी राज्यकर्त्यांना नवनवीन विचार करावा लागतो. नवनवे प्रयोग करावे लागतात. प्रजेचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्व प्रकारची खटपट करावी लागते. यासाठी हे अतिशय उपयुक्त उदाहरण आहे. त्या काळाच्या तुलनेने जाती व्यवस्थेमुळे असलेला व्यवसायांचा बंदिस्तपणा आता मोठ्या प्रमाणावर मोडून पडला आहे. लोकशाही यंत्रणेमुळे आपली क्षमता, कौशल्य, इच्छा या आधारावर नागरिकांना कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा फायदा अनेक समाजघटकांना झाल्याचे दिसून येते. याबाबतीत अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे भारतात सध्या असलेली तरूणांची मोठी संख्या आणि जागतिक पातळीवर उपलब्ध असलेली संधी. याचा फायदा घेऊन नवनव्या प्रकारचे उद्योग सुरू होताना दिसत आहेत. याबाबत स्टार्ट अपची गेल्या काही वर्षांतील आकडेवारी लक्षणीय आहे. २०१६ ते जानेवारी २०२५ या काळात स्टार्ट अपची संख्या ५०० पासून १,५९,१५७ पर्यंत वाढली. ३१ ऑक्टोबर २०२४ च्या आकडेवारीनुसार एकूण स्टार्ट अप पैकी ७३१५१ स्टार्ट अपमध्ये किमान एक तरी महिला संचालक आहे. या स्टार्ट अपमुळे १६,६०,००० नवीन रोजगारांची निर्मिती झाली. ही आकडेवारी आनंद देणारी असली तरी समाधान देणारी नाही कारण भारतात बेरोजगारीचे प्रमाण एप्रिल २०२५ मध्ये ५.१% होते. त्यामुळे उद्यमशीलतेचा वेग आणि विस्तार अजून वाढविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न झाले पाहिजेत. या प्रकारच्या उद्योगांतून मिळणारी आर्थिक सुबत्ता संबंधितांचा आर्थिक स्तर तर उंचावेलच पण त्यातून देशाच्या विकासालाही मोठा हातभार लागेल.
लोकमाता अहिल्याबाई होळकर या जरी संस्थानिक असल्या तरी त्या पुण्यातील पेशव्यांच्या अंकित होत्या. सत्तास्थानांभोवती सत्ता संघर्ष नेहमीच होत आला आहे. अहिल्यामाई यांनादेखील त्याचा सामना करावा लागला. त्यांनी देशभर जी धार्मिक व सामाजिक बांधकामे केली त्याचा खर्च त्यांनी पेशव्यांना देय असलेल्या महसुलातून केला अशी तक्रार पुण्याला पेशव्यांच्याकडे करण्यात आली. " या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आपण पुण्यावरून माणसे पाठवावी. जर पेशव्यांच्या रकमेतून खर्च केला गेला असेल तर आपण तिप्पट रकमेचा दंड भरू." असे पत्र अहिल्यामाई यांनी पेशव्यांना पाठवले. पुण्यावरून आलेल्या माणसांनी सर्व तपासणी केली. परंतु कुठेही सरकारी पैशाचा खर्च या कामासाठी करण्यात आल्याचे आढळून आले नाही. सर्व खर्च अहिल्याबाई यांनी आपल्या खाजगी मिळकतीतून केला होता. टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली.
राज्यकर्त्या व्यक्तिने खर्च आणि कारभार याबाबत पारदर्शकता ठेवली पाहिजे. राज्य महसुलातून लोकोपयोगी कामेच करण्यात आली पाहिजेत. जर राज्यकर्त्या व्यक्तिला काही वैयक्तिक कारणांसाठी खर्च करायचा असेल तर तो स्वतःच्या संपत्तीतून करावा ही शिकवण आजदेखील लागू पडते. दुर्दैवाने सध्याच्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या बाबतीत लक्षात येते की सरकारी पैशाचा खर्च त्या लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक गरजा पुरवणे अथवा सोयी करण्यासाठी झाला आहे. यादृष्टीने पाहता अहिल्यामाई यांचा आदर्श आजच्या काळातही गिरवण्यासारखा आहे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या संस्थानाची हद्द काही ठिकाणी शिंदेंच्या ग्वाल्हेर संस्थानाला लागून होती. यातील एका ठिकाणी हद्दीचा वाद निर्माण झाला. या वादात कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न निर्माण झाल्यावर दोन्ही बाजूंनी अहिल्यामाई यांच्याकडे धाव घेतली. अहिल्यामाई यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन हद्दीची निश्चिती केली. काही जमीन सामायिक ठरवून तिला गायरान म्हणून घोषित केले. दोन्ही बाजूंना हा तोडगा मान्य झाला आणि वाद निकाली निघाला.
ठिकठिकाणी हद्दीबाबत वाद होत असतात. परंतु दुसऱ्या प्रदेशाच्या राज्यकर्त्यावर या वादाचा निकाल लावण्यासाठी विश्वास ठेवला गेल्याची ही घटना जेवढी विरळा आहे तेवढीच दीपस्तंभासारखी मार्गदर्शकदेखील आहे. अहिल्यामाई यांच्यावर ग्वाल्हेर संस्थानाच्या प्रजेने विश्वास दाखवला कारण अहिल्यामाई यांचे चारित्र्य उज्ज्वल होते. त्यांच्या मनात कोणतीही वैयक्तिक अभिलाषा नव्हती. हा गुण राज्यकर्त्यांना आजही मार्गदर्शन करणारा आहे.
मध्ययुगीन काळात युरोपात विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झाली. त्याचा वापर युरोपियन राष्ट्रांनी राज्यविस्तार करण्यासाठी केला. लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनकाळात युरोपियन सत्तांचा विस्तार भारतात होत होता. पण इंग्रजांकडून सर्वात जास्त धोका आहे हे अहिल्यामाई यांनी अचूक ओळखले होते. " एखादे अस्वल जसे माणसाला मिठीत घेऊन गुदगुल्या करून मारते तसेच इंग्रज धोकादायक आहेत." असे त्यांचे निरीक्षण होते. हा धोका ओळखून त्यांनी आपल्या पदरी तैनाती फौज उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकन सेनाधिकारी कर्नल जे.पी. बॉयड याची मदत घेतली. इंग्रज आणि अमेरिकन यांचा आपापसात संघर्ष आहे. राजकारणात 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे सूत्र असते याचे ज्ञान त्यांना होते. त्यातून त्यांनी अमेरिकन सेनाधिकाऱ्याची मदत घेतली असावी असे म्हणता येते.
जगाच्या इतिहासात देशादेशातील सीमासंघर्ष आक्रमणे सतत झाल्याचे बघायला मिळते. भारताने दीर्घकाळच्या पारतंत्र्यामुळे अगणित लोकांचे प्राण गमावले आहेत. तसेच अपरिमित संपत्तीदेखील गमावली आहे. आजच्या काळात लष्करी आक्रमणाचा धोका तुलनेने कमी आहेत. परंतु इतर प्रकारची आक्रमणे ही सुरू आहेत. अशा काळात एक समाज म्हणून आपण सर्व आणि विशेषतः राज्यकर्त्या व्यक्तिंनी सदैव जागरूक राहिले पाहिजे. त्यासाठी अहिल्यामाई यांचे अनुकरणीय उदाहरण आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचा नातू नाथ्याबा हा लहान वयातच आजारी पडला. तो बरा होण्यासाठी उपचार सुरू झाले. परंतु वैद्यांच्या उपचारांनी गुण येईना. मग अहिल्यामाई यांनी युरोपियन डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू केले. हा आजार गंभीर स्वरूपाचा आणि प्राणघातक असल्याचे निदान झाले. शक्य ते सर्व उपचार सुरू झाले. अहिल्यामाई यांनी या आजारावर नवीन उपचार शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू करायला सांगितले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. दुर्दैवाने नाथ्याबाचे या आजारपणामुळे अकाली निधन झाले. जवळच्या माणसाच्या मृत्युच्या दुःखाचा पुन्हा एकदा अनुभव अहिल्यामाई यांना आला.
या प्रसंगातून अहिल्यामाई यांची दूरदृष्टी दिसते. आजारावर उपलब्ध असणारे उपाय योजणे हे स्वाभाविक आहे. परंतु अशा आजारपणावरील उपचारासाठी संशोधनाला चालना देणे हे द्रष्ट्या व्यक्तिचे लक्षण आहे. विशेषतः राज्यकर्ते, अधिकारी यांनी हे ध्यानात ठेवून आचरणात आणले पाहिजे. जसजसा काळ पुढे जातो आहे तसतशी संशोधनातून नवनवीन उपचारपद्धती पुढे येते आहे. रुग्णांना त्याचा फायदा होतो आहे. दुसऱ्या बाजूला नवनव्या प्रकारचे रोग , आजार देखील उद्भवत आहेत. यासाठी ह्या प्रकारच्या संशोधक वृत्तीची जोपासना करणे आवश्यक आहे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या गुणांची चर्चा करत असताना त्यांचे काही गुण राज्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहेत तर काही गुण सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. यात सर्वांसाठी अनुकरणीय असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्या ठायी असणारी कर्तव्य बुद्धी! अहिल्यामाई या संस्थानिक होत्या. अमाप संपत्ती होती. सुखोपभोगाची सर्व साधने त्यांना उपलब्ध होती. दुसरीकडे आयुष्यात एकामागून एका प्रियजनांचा वियोग त्यांना सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सदैव आपल्या कर्तव्याचे आचरण जागरूकपणे केले. कधीही त्यात कसूर केली नाही. कर्तव्यशील आचरणामुळे त्या सदैव जागरूक, कार्यरत राहिल्या. कर्तव्य आचरत राहण्याचा हा आदर्श सर्व कालासाठी मार्गदर्शक आहे.
लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनकाळात त्यांच्या ठिकाणी असलेल्या ममतेचा, कळकळीचा अनुभव प्रजाजनांना सदैव येत राहिला. त्यामुळे त्या लोकमाता झाल्या. आज त्या हयात नाहीत पण त्यांच्या ठायी असणारी मातृत्वाची वृत्ती आणि कर्तव्याचरणाचा गुण सर्वांना सदैव मार्गदर्शक आहे.
कर्तव्य, करूणा , सदाचाराची ती मूर्ती
सर्वकाली देत राहील ती आपणा स्फूर्ती
सुधीर गाडे पुणे
नितांत उत्कृष्ट लेख. सध्याच्या आपल्या भारत देशाची सामाजिक ,धार्मिक व आर्थिक अवस्था व पुण्यश्लोक वेळची सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेची तंतोतंत तुलना करून आणि त्याची पुण्यश्लोक अहिल्याबाईं च्या कार्याशी व कर्तुत्वाशी गाडे सरांनी या लेखाद्वारे व्यवस्थित सांगड घातली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईं सारख्या कर्तबगार व दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची आज सुद्धा भारताला असणारी गरज सरांच्या लेखातून स्पष्टपणे जाणवते.
ReplyDeleteसुधीर गाडे सरांचे लेख हे कायम समाजाला विशेषत: सध्याच्या व आगामी पिढंयासाठी मार्गदर्शक असतात.
सुधीर गाडे सरांना विनंती आहे की सरांनी त्यांच्या आठ ते दहा लेखांच्या छोट्या छोट्या पुस्तिका इंग्रजी व हिंदी अनुवादासहित प्रसिद्ध कराव्या.
अभिनंदन गाडे सर आणि खूप खूप धन्यवाद.
डॉक्टर नमस्कार.
Deleteतुमच्या सूचनेचा विचार करतो. 🙏
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची उत्कृष्ट माहितीपर लेख.. नेहमीप्रमाणे मुद्दे सोड लेखन धन्यवाद🙏
ReplyDeleteसर नमस्कार 🙏
Deleteलोकमाता अहिल्यामाई होळकर यांचा जीवनपट व त्यांचे सर्व गुण या लेखनातून दिसत आहेत व मार्गदर्शक आहेत.....खूपच सुंदर लेखन केले आहे सर तुम्ही.....🙏🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete