इकडे द्विधा मनस्थिती आणि तिकडे हुरहूर

                ( काल्पनिक कथा )

        "अरे निखिल, कधी येतोस गावी?" अण्णांनी फोनवरून विचारले. " अण्णा, इथं माझं काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का?" निखिल थोडं मोठ्यानेच बोलला. " ते काही सांगायचं नाही. ताबडतोब ये." तिकडून अण्णांनीही मोठ्यानेच सांगितले आणि फोन बंद केला.

    ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

      छोट्या गावातून निखिल शिक्षणासाठी शहरात येऊन दोन तीन वर्षे झाली होती. गावाकडे अण्णांची शेतीवाडी, खतांचं दुकान असा मोठा व्याप होता. अनेक वर्षे कष्ट करून त्यांनी चांगला जम बसवला होता. निखिललाही कौतुकाने शहरात शिकायला ठेवलं होतं. 

       शहरात आल्यावर रुळताना निखिलला नाही म्हटलं तरी जरा अडचण आलीच होती. शहरात नवा असताना त्याला सारखंसारखं गावाकडं जावंसं वाटे. गावी गेलं की मित्रांबरोबर गप्पा टप्पा मारत गावभर आणि गावाबाहेर भटकायचं. मधेच शेतावर चक्कर मारायची. अधूनमधून दुकानावर बसायचं. आईकडून,‌आजीकडून लाडकोड करून घ्यायचं हे सारखं हवंहवंसं वाटायचं. मग तो निमित्त शोधून गावी जायचा. दोन चार दिवस रहायचा आणि परत पाय ओढत शहरात परतायचा. असे जवळपास  सहा महिने वर्ष गेलं. 

        हळूहळू शहरातल्या वातावरणाला निखिल सरावला. त्याला नवनवीन शहरी सवयी लागल्या. नवे मित्र मैत्रिणी मिळाले. परीक्षा जवळ आली की त्यांच्याबरोबर अभ्यास करायचा. कॉलेजमधल्या उपक्रमात भाग घ्यायचा. मधेच संधी साधून इकडे तिकडे मुक्तपणे भटकायचं. चेष्टा, विनोद वाद विवाद, कधीतरी सिनेमा असं सर्व चालायचं. 'जहां चार यार मिल जाए तो रात हो गुलजार' याचा‌ पुरेपूर अनुभव त्याला येऊ लागला.

         त्यामुळे निखिलच्या गावी जाण्याच्या दिवसांमधील अंतर वाढू लागले. तसेच गावी राहण्याचे दिवस कमी कमी होऊ लागले. सुरुवातीला गावी गेल्यावर चार पाच दिवस तिकडेच राहणारा निखिल जेमतेम एखादा दिवस राहून लगेच शहराकडे परतू लागला. 

        अजून एक गोष्ट हळूहळू होत गेली. निखिलचे गावातील मित्र एक एक करून कोणत्या ना कोणत्या कारणाने गाव सोडून दुसरीकडे गेले. ते पण कधीमधी गावी येत असत. पण निखिल गावी गेला की त्याचवेळी ते गावी असतील असं मात्र होत नव्हतं. केव्हातरी एखाद्या सणवारी निखिलचे मित्र आणि निखिल एकाच वेळी गावी येण्याचा प्रसंग घडत असे. त्यावेळी मात्र निखिलला गावी राहावेसे वाटत असे. हे मित्र गावात नसतील त्यावेळी गावी राहून काय करायचे असा मोठा प्रश्न निखिलला पडत असे. एकटाच शेताकडे किती वेळ चक्कर मारणार? दुकानात किती वेळ लक्ष देणार? असे त्याला वाटत असे. त्यामुळे गावी पोचला ना पोचला की लगेच माघारी निघावे असे त्याच्या मनात येत असे.  काही ना काही सबब सांगून तो परत शहरात येत असे. 

     अण्णा, आई ,आजी यांना निखिलच्या या बदललेल्या वागण्याचा अर्थ लागत नव्हता. गावामध्ये रमणारा निखिल आता आल्यासरशी फार दिवस गावात राहत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. पण आपल्या मुलाचा, नातवाचा सहवास जास्त दिवस लाभावा हे त्यांना मनापासून वाटत असे. त्यामुळे ते परत परत गावी येण्यासाठी निखिलकडे टुमणं लावत असत. 

        आतादेखील तसंच घडलं होतं. शेतातील काम हातघाईवर आलं होतं आणि दुकानात देखील गर्दी वाढू लागली होती. अशावेळी निखिलची मदत अण्णांना हवीच होती. त्यामुळे त्यांनी निखिलला ताबडतोब निघून ये हे सांगण्यासाठी फोन केला होता. 

         इकडे निखिलच्या मित्रमैत्रिणींच्या गडबडीत त्याचं कॉलेजचं सबमिशन मागे पडलं होतं आणि ते करण्याची शेवटची तारीख जवळ आली होती. त्यामुळे गप्पा टप्पा, हिंडणं फिरणं हे सगळं सोडून निखिल सबमिशनच्या मागे लागला होता. रात्री उशिरापर्यंत जागून सर्व लिखाण पूर्ण करत होता. अशा गडबडीच्या वेळी अण्णांचा तगादा त्याला नकोसा वाटला आणि त्रासून तो थोडा ओरडून बोलला. 

         फोन बंद झाला आणि निखिल विचार करू लागला की, " खरंच आपल्याला गावी जाणार अशक्य आहे का? आपण कशामुळे नेमके चिडलो? ओरडून बोलण्याची गरज होती का ?" अशा एक ना अनेक प्रश्नांनी निखिलच्या मनात गर्दी केली. मग तो विचार करू लागला की , "अण्णा आता थोडे थकल्यासारखे वाटतात. पूर्वीसारखी धावपळ त्यांच्याच्याने  होत नाही. अशावेळी ते मदतीला हाक मारणार ती मलाच ना! माझ्या गडबडीमुळे मी वेळ घालवला. म्हणून आता जाऊ शकत नाही याचा राग आपण ओरडण्यातून बाहेर काढला का?"

       तिकडे अण्णा विचार करू लागले, " निखिलला थोडा जगाचा अनुभव यावा म्हणून आपणच शहरात पाठवले. त्याला शहरात पाठवतानाच आता तो सारखा सारखा आपल्यासोबत नसेल हे आपण मनोमन मान्य केले होते ना? मग आता आपलंच काम करण्यासाठी त्याला ताबडतोब का बोलवायचे? त्याच्यादेखील काहीतरी अडचणी असू शकतील ना? हाताशी आलेला मुलगा अशा कारणाने नाराज होऊन अजून काहीतरी करून बसणार नाही ना ?" असे विचार त्यांच्या मनात पिंगा घालू लागले.

    इअडं शहरात निखिल ताबडतोब घरी जावं की नाही या द्विधा मनस्थितीत सबमिशनच्या कामाला पुन्हा एकदा लागला. तर तिकडे अण्णा निखिल गावी यायला हवा आहे पण तो येऊ शकत नाही म्हणून जीवाला लागलेली हुरहूर अनुभवत पुढच्या कामाला लागले.


सुधीर गाडे पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. अतिशय चांगली कथा आणि चांगला विषय. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली पुंजी आपल्या मुलांच्या उज्वल भविष्या साठी पणाला लावून त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवणाऱ्या व नंतर मायदेशी परत न येता तेथेच स्थायिक होणाऱ्या मुलांच्या पालकांची मनस्थिती तंतोतंत अशीच असते हे सध्याच्या काळात आपण अनुभवतो आहोत. काळाशी सुसंगत अशी हताश पालकांची मनस्थिती गाडे सरांनी या कथेद्वारे खूपच सुंदर रित्या मांडलेली आहे. धन्यवाद सर

    ReplyDelete
    Replies
    1. डॉक्टर नमस्कार आणि धन्यवाद

      Delete
  2. आजच्या समाजातील हे वास्तव्य आहे. आई-वडिलांच्या कष्टाची मुलांना जाणीव नाही हे दुर्भाग्य. कुठे गणित चुकले हे समजत नाही🙏

    ReplyDelete
    Replies
    1. काही प्रमाणात हे खरं आहे.🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची