भावनांचा बडेजाव कशाला?
( काल्पनिक कथा )
निहारने आजूबाजूला नजर टाकली. विमानतळावर निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. अनेकजण आपले प्रियजन, नातेवाईक, स्नेही यांना निरोप देण्यासाठी आलेले होते. कुणी पर्यटनासाठी तर कुणी कामासाठी तर काही तरुण शिकण्यासाठी परदेशी निघालेले होते. जाणाऱ्या एका माणसाला निरोप द्यायला दोनतीन जणांपासून आठदहाजणांपर्यंत लोक आलेले दिसत होते. कुणाचे चेहरे वियोगाच्या दु:खाने मलूल झालेले होते तर काही चेहरे आनंदाने फुलले होते. जिकडेतिकडे भावभावनांचा मळा बहरलेला दिसत होता. या सगळ्या वातावरणात निहारला जणुकाही गुदमरल्यासारखं होत होतं.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
निहारचे वडील शास्त्रज्ञ होते तर आई डॉक्टर होती. लहानपणापासूनच आई-बाबांनी निहारला भावनेपेक्षा आवश्यकतेवर भर द्यायला वारंवार सांगितले होते. आयुष्यातील सगळे निर्णय हे तर्काच्या कसोटीवर घासून घेण्याची शिकवण त्याला लहानपणापासूनच मिळाली होती. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणून करायची हे चूक आहे तर ती आवश्यक आहे का याचा विचार करून आवश्यक असेल तर करायची हीच त्यांच्या घरची पद्धत होती.
निहार जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याला आपल्या घरचे वेगळेपण लक्षात येऊ लागले. शाळा कॉलेजमध्ये असताना बरोबरच्या मुला मुलींच्या आई-वडिलांच्या वागण्याबोलण्यातील आणि आपल्या आई बाबांच्या वागण्याबोलण्यातील फरक हळूहळू निहारला जाणवत गेला. इतर मुला मुलींचे आई वडील या ना त्या निमित्ताने शाळेत येत असत. शाळेतील शिक्षक शिक्षिकांना आपल्या मुलामुलींच्या वागण्याबाबत वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. हे का होते ते निहारला समजत नसे.
त्यावेळी निहार सहावीच्या वर्गात होता त्यांच्या वर्गाची सहल जाणार होती. दिवसभराची सहल होती. शाळेने सांगितलेल्या वेळेवर निहार डबा बाटली असे सगळे साहित्य घेऊन शाळेत पोचला तर शाळेत त्याच्या वर्गातील मुला-मुलींच्या आई वडिलांची गर्दी झालेली होती. शाळा जवळच होती म्हणून निहार एकटाच चालत शाळेत आला होता. शाळेतले दृश्य पाहून त्याला आपल्या घरातील एक दोन दिवस आधी झालेली चर्चा आठवली. 'सहल दिवसभराची तर आहे. शाळेने दरवर्षीप्रमाणे सहलीचे नियोजन व्यवस्थितपणे केलेले आहे. मग वेगळे काय आहे? त्यामुळे निहार एकटाच चालत जाईल. रात्रीदेखील परत चालत येईल. शाळेपासून घरी येणारा रस्ता सुरक्षित आहे त्यामुळे निहारला सोडायला किंवा आणायला जाण्याची आवश्यकता नाही.' या चर्चेनुसार निहार एकटाच चालत सहलीच्या ठिकाणी आला होता. शाळेतून बस निघताना त्याच्या वर्गातील एका मुलाच्या आईच्या डोळ्यात आलेले पाणी निहारला बुचकळ्यात टाकून गेले होते. सहलीवरून परतल्यावर त्याने आई बाबांना याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले, " साधारणपणे बरीच माणसे भावनाशील असतात म्हणून ते बुद्धिपेक्षा भावनेच्या आहारी जास्त जातात." त्या वयात या बोलण्याचा फारसा अर्थ निहारला समजला नव्हता. परंतु हे वाक्य मात्र त्याच्या चांगलेच लक्षात राहिले होते.
घरातल्या वातावरणाचा परिणाम निहारच्या वागण्यावर झाला होता. तर्कानेच विचार करणाऱ्या आई-बाबांच्या गुणांचा वारसा त्याच्यातदेखील उतरला होता. त्यामुळे निहारची प्रतिक्रिया नेहमीच तर्कशुद्ध असे. छोट्या मोठ्या प्रसंगात विचारपूर्वक त्याची प्रतिक्रिया होत असे. आजूबाजूला असलेल्या भावनाप्रधान लोकांचे त्याला नेहमीच आश्चर्य वाटत असे. तर स्वभाविक मानल्या जाणाऱ्या भावना व्यक्त करणाऱ्यांबद्दलदेखील त्याच्या मनात कुतूहल होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक भावना कशासाठी व्यक्त करतात असा प्रश्न त्याच्या मनात वारंवार येत असे. वर्गातील बरोबरच्या अनेक मुलामुलींशी काही वेळा त्याने याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण या सगळ्यातून त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. उलट असे बोलणे संपल्यावर त्याच्या मनात येऊन जाई की आपण वेळ उगीचच वाया घालवला.
उच्च शिक्षणासाठी निहार परदेशी निघाला होता. त्यासाठी तो विमानतळावर पोचला त्यावेळी आजूबाजूचे निरीक्षण करताना त्याच्या मनात हे विचार तरंग आपोआप उमटत गेले. तो विचार करू लागला. जाणाऱ्या एका माणसासाठी निरोप द्यायला सरासरी तीन लोक आले आहेत असे गृहीत धरले तर निरोप देण्यासाठी यायचे आणि परत जायचे याच्यासाठी सगळ्यांचा मिळून किती वेळ, पैसा इंधन या गोष्टी खर्च होत असतील. निरोपाच्या वेळी जे बोलायचे ते आपापल्या घरी देखील बोलता आले असते. बर, विमानतळापासून जाणाऱ्याचे घर जेवढे लांब आहे तेवढ्या अंतराच्या हिशोबात हा संवाद, काही मिनिटे, तास किंवा एखादा दुसरा दिवस आधी झाला असता. बोलण्याची आता तर मोबाईलच सोय आहे. त्यातून अजून एक म्हणजे विमानतळावर पोचल्यावर सोबतच्या माणसांना आतमध्ये तर प्रवेश नसतोच. त्यामुळे बस, रेल्वे यामध्ये जाणाऱ्या माणसाबरोबर जसं गाडी सुटेपर्यंत सोबत राहता येतं तसं अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत सोबत राहता येत नाही. मग हा सगळा खटाटोप कशाला? भावनांचा बडेजावा कशाला? असा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा एकदा उमटला आणि क्षणभर थांबलेला निहार आपली ट्रॉली ढकलत पुढे निघाला.
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
मोजक्या शब्दात भावनांचा बडेगाव कशाला ??याची सुंदर मांडणी केली... 🙏
ReplyDeleteआभार सर🙏
Delete