सहज, सोपं बोलणे लिहिणे
"जीवनातील व्यामिश्रतेचे व्यापक परिप्रेक्षातून अवलोकन केले तर परस्परसंबंधांची जटिलता अनिवार्य पद्धतीने समाजाच्या आंतरप्रवाहांवर अपरिवर्तनीय परिणाम करते आहे." हे वाक्य मी गंमत म्हणून सांगितल्यावर सोबतचे म्हणाले, "गाडे सर, याचा नेमका अर्थ काय?" संवादामध्ये सोपपणा असायला हवा ह्याबद्दल चर्चा सुरू होती. त्या दरम्यान हा संवाद झाला.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
साधारणपणे सहज समजेल असे बोलणे सोपे असते अशी समजूत आहे. पण सहज सोपे बोलणे ही बघायला गेली तर अवघड गोष्ट आहे. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते. ते असेल तरच सोपेपणा शक्य होतो. काहीवेळा हा माणसाचा अंगभूत गुणदेखील असतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे उदाहरण याबाबत आदर्श आहे. रुढार्थाने न शिकलेल्या बहिणाबाईंना आयुष्याची विलक्षण समज होती. त्या शहाणपणातून त्यांच्या काव्यरचना सोप्या परंतु अर्थपूर्ण झाल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर यांसारख्या अनेक काव्यरचना बहिणाबाई यांच्या सोप्या परंतु अर्थपूर्ण मांडणीची उदाहरणे म्हणून सांगता येतील.
याबाबत अजून एका साहित्यिकांचे उदाहरण लक्षात घेता येईल. ते साहित्यिक म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ह्यांचे. सुरुवातीला ते वक्ते म्हणून प्रसिद्ध झाले. नंतर साहित्य आणि इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. आचार्य अत्रे यांचे म्हणणे, " वक्ता म्हणून मी उभा राहिलो की समोर बसलेल्या श्रोत्यांना आपल्या विषयातील काहीच माहिती नाही. त्यांना समजेल असे सांगणे हे मी करू लागलो. त्यामुळे माझी प्रसिद्धी वाढत गेली." लेखन करतानादेखील अत्रे यांनी याच पद्धतीने केले.
ज्यावेळी आपले विचार अथवा म्हणणे जास्तीत जास्त लोकांना समजावे असे वाटत असेल त्यावेळी मांडणी अगदी सोपी असावी लागते . याचे वेगवेगळे नियम वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. अनुभवातून तयार केलेले हे नियम उपयुक्त आहेत हे लक्षात येते.
यातील पहिला नियम मी अनेक वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात वाचल्याचे आठवते तो नियम चित्र पुरस्कार सृष्टीत पाळला जातो असे त्या लेखात लिहिले होते एखादा चित्रपट लोकप्रिय व्हावा असे जर वाटत असेल तर त्या चित्रपटाची कथा इयत्ता नववीतील मुलाला समजेल अशी असली पाहिजे यापेक्षा क्लिष्ट कथा असू नये असा आग्रह चित्रपट सृष्टी त धरला जातो असे त्या लेखात लिहिले होते.
दुसरा नियम एक जणांकडून मी ऐकला त्यांनी असे सांगितले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळी जनतेला उद्देशून भाषण करतात त्यावेळी हा नियम पाळला जातो भाषण तयार झाल्यानंतर याबद्दल इयत्ता सहावीतल्या विद्यार्थ्याला समजणार नाही असा कोणताही शब्द असता कामा नये. हा नियम पाळून तयार झालेले भाषण राष्ट्राध्यक्ष करतात.
स्टीफन हॉकिंग हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले. आपल्या असाध्य आजाराशी झगडत त्यांनी शेवटपर्यंत विज्ञान क्षेत्रात आपले काम चालू ठेवले. 'ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' हे त्यांचे अतिशय गाजलेले पुस्तक आहे. जगभरात या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या आहेत. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की ," जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून मी हे पुस्तक अतिशय सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणपणे माणसांना गणितीय समीकरणे अवघड वाटतात. त्यामुळे या पुस्तकात कोणतेही गणितीय समीकरण लिहायचे नाही असे माझे उद्दिष्ट होते परंतु एक समीकरण मला लिहावेच लागले." हे पुस्तक वाचल्यानंतर विश्वाच्या निर्मिती वेळी झालेला प्रचंड स्फोट त्यानंतर झालेल्या घटना आणि विविध संकल्पना सामान्य माणसांच्या सहजपणे लक्षात येतात. यातूनच हॉकिंग यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे हे लक्षात येते.
काही वेळा त्या त्या क्षेत्राशी संबंधित पारिभाषिक शब्द सामान्य माणसांना माहिती नसतात. पण ते पारिभाषिक शब्द वापरल्याशिवाय माहिती देणे किंवा चर्चा करणे शक्य होत नाही. अशा पारिभाषिक शब्दांच्या वापरामुळे बोलणे अथवा लिहिणे अवघड होत जाते. यासाठी प्रयत्नपूर्वक वेगळे शब्दप्रयोग वापरावे लागतात. याच एक चांगला अनुभव मला आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता वेगवेगळ्या अन्य प्रयोगांतून शिक्षण द्यावे. वही पुस्तक न घेता असे प्रयोग शनिवारी करावेत असे धोरणात म्हटले आहे. या उपक्रमाला 'आनंददायी शनिवार ' असे म्हटले गेले आहे. मध्यंतरी एका उपक्रमासंदर्भात एका व्यावसायिकांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलताना या उपक्रमाला 'गंमतीचा शनिवार ' असे म्हणाले. मला ते खूप आवडले.
असे सहजसोपे शब्द, शब्दप्रयोग मनाला भिडतात. माणसांवर परिणाम करतात.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

दोन्हीही उदाहरणातून सोप्या भाषेत आशय मांडलाय.. भाव अनुभव महत्वाचा आणि तो निर्भयपणे मांडणे महत्त्वाचे 🙏
ReplyDelete