अशाच काही आठवणी

      आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग घडतात. घडामोडी होतात. गोष्टी घडतात किंवा बिघडतात. त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्या आठवणी मनावरती कोरल्या जातात. या आठवणींचा काळ हा कमी अधिक असतो. आठवणीच्या प्रसंगाच्या तीव्रतेप्रमाणे या आठवणी थोडा किंवा जास्त वेळ लक्षात राहतात. कमी तीव्रतेच्या प्रसंगांच्या आठवणी काही दिवसानंतर विस्मरणात जातात. म्हटले तर तो प्रसंग किंवा ती घटना तशी फारशी महत्त्वाची नसते. परंतु अशा आठवणींपैकी काही आठवणी प्रसंगानिमित्त पुन्हा वर येतात. एका अर्थाने ते काही क्षण अनुभवण्याची पुन्हा संधी देतात. या लेखाच्या निमित्ताने माझ्या अशाच काही आठवणी या प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर येथील १९९७ ते १९९९ या काळातील आहेत. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे प्रचारक म्हणून मी तिथे काम करत होतो.


 काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते श्री. कुलभूषण बाळशेटे यांच्याशी काही निमित्ताने फोनवर बोलणे झाले त्यांना सर्व कार्यकर्ते दादा बाळशेटे म्हणून ओळखतात. फोनवर बोलताना मी त्यांना विचारले, " दादा, तुमच्या घरी अजून जिंदा तिलिस्मात नावाचे औषध आहे का?" ते म्हणाले, " हो. आहे सापडेल कुठेतरी." मग त्यांनी विचारले की, " याची चौकशी का करत आहात?" त्यावेळी मी त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. ही गोष्ट बहुधा १९९७ च्या थंडीच्या दिवसातील आहे. मी सिडको भागात काम करीत असताना दादा यांच्या घरी मुक्कामाला गेलो होतो. सर्दी झाली होती. नाक पूर्ण बंद झाले होते. बोलताना याचा उल्लेख निघाला. त्यावेळी दादा मला म्हणाले, " जिंदा तिलिस्मात याची वाफ घ्या." मी पहिल्यांदाच या औषधाचे नाव ऐकत होतो. दादांच्या सांगण्याप्रमाणे त्या औषधाची वाफ मी काही मिनिटे घेतली आणि दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या. परंतु हा परिणाम काही तासच टिकला. काही तासानंतर पुन्हा एकदा नाकपुड्या बंद झाल्या. अर्थातच नंतर काही वेगळे औषध घेऊन मी त्या सर्दीतून बरा झालो. परंतु इतक्या वर्षांनंतर दादा यांना फोन करताना अचानक हा प्रसंग मला आठवला. 

      त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मी छत्रपती संभाजी नगर येथील आणखी एक कार्यकर्ते श्री मुकुंदराव भाले यांना फोन केला. मुकुंदराव भाले यांचे काका कै. दत्ताजीराव भाले हे संघाचे प्रचारक होते. शब्दशः शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघाचे काम केले . १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या दोन वर्षांच्या काळात संघावर बंदी होती. या काळात दत्ताजीराव भूमीगत राहून काम करत होते . त्याच काळात त्यांचा मृत्यू झाला. याच दत्ताजीराव यांचा वारसा गृहस्थी जीवनात राहून मुकुंदराव भाले हे चालवतात. त्यांच्या मातोश्रींचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना फोन केला होता. परंतु फोन केल्यानंतर एक वेगळी आठवण उफाळून वर आली. त्या काळात मुकुंदराव यांच्याकडे एका नगराच्या कार्यवाहपदाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे एक हिरो होंडा मोटरसायकल होती. त्यांच्याबरोबर गाडीवर बसून मी कोठेतरी चाललो होतो. तेव्हा ते म्हणाले, "ही गाडी गेल्या सात वर्षांत एकदाही पंक्चर झाली नाही." मी विचारले , "कसे काय?" तेव्हा ते म्हणाले, " गेल्या सात वर्षांत एकदाही डांबरी रस्ता सोडून ही गाडी चालवली नाही." त्यांचे घर, कामाचे ठिकाण हे शहरातच असल्याने शहर सोडून बाहेर जाण्याचा प्रसंग कधी आला नाही. त्यामुळे अर्थातच गाडी डांबरी रस्त्यांवरूनच चालवली गेली. हा प्रसंग असाच आठवला.

              ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

       आणखी एक प्रसंग म्हटला तर गंभीर होता. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवणगीकर नावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. हे सर्व घर संघाचं होतं. एका बंगल्यात हे शिवणगीकर राहत असत. एके दिवशी मी भेटीसाठी म्हणून त्यांच्या घरी गेलो. घरातील कोणीतरी दार उघडले. मी बाहेरच्या खोलीत बसलो. दार उघडून ते पाणी आणण्यासाठी म्हणून आत गेले. या शिवणगीकर यांच्या घरात एक मोठा कुत्रा होता. मी घरात गेलो तेव्हा त्याला बांधून ठेवलेले नव्हते. पाणी आणण्यासाठी घरातील व्यक्ती आत स्वयंपाकघरात गेली. त्यावेळी तो कुत्रा जवळ आला. माझ्या अगदी जवळ येऊन तो हुंगून वास घेऊ लागला. आता काय करावे असा प्रश्न मला पडला. पण त्यापूर्वी मी कुठेतरी वाचले होते की अशा प्रसंगी आपण शांत राहायचे. आपल्यापासून काही धोका नाही हे कुत्र्याला लक्षात आले की तो चावत नाही. मी खुर्चीवर शांत बसून राहिलो. जवळपास अर्धा एक मिनिटांत आत स्वयंपाकघरात गेलेली व्यक्ती परत आली. तोपर्यंत तो कुत्रा मला हुंगून पाहत होता. मग घरातल्या त्या माणसाने त्या कुत्र्याला नेऊन बांधले. मीदेखील सुटकेचा हलकासा नि:श्वास सोडला.

           अशा या काही छोट्या आठवणी.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची