स्मरण विस्मरण

                      काही प्रसंग, घटना, गोष्टी घडतात त्यावेळी खूप महत्त्वाच्या वाटतात त्यावेळी त्या लक्षात राहतात. परंतु काही दिवसानंतर अशा गोष्टी विसरल्या जातात. घडताना महत्त्वाच्या वाटलेल्या प्रसंगांची नंतर कोणीतरी आठवण करून देते पण त्याची आठवण येतेच असे नाही. मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते पंकज कपूर यांची एक मुलाखत पाहत होतो. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीची तयारी करताना पंकज कपूर यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी चर्चा करून प्रश्न काढलेले होते. त्यात एक प्रश्न असा होता की , "बऱ्याच वर्षांपूर्वी पंकज कपूर यांनी बसमध्ये भिकाऱ्याचे सोंग वठवून सर्वांना चकित करून सोडले होते." हा प्रसंग मुलाखतकाराला पंकज कपूर यांच्या भावाने सांगितला होता. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर पंकज कपूर म्हणाले, " मला यातले काहीही आठवत नाही." मुलाखतकाराने भावाचे नाव घेऊन हा प्रसंग त्यांच्याकडून कळल्याचे सांगितले पण तरीदेखील पंकज कपूर यांना तो प्रसंग काही पाठवला नाही. मोघमपणे ते एवढंच म्हणाले की , "असं घडलेलं असू शकतं ."त्यांच्या उत्तरावरून त्यांना हा प्रसंग आठवला होता असे वाटले नाही.

       मलाही असेच एक दोन प्रसंग घडल्याचे काही जणांनी सांगितले पण ते मला आठवले नाहीत.

       कालानुक्रमे यातला पहिला प्रसंग साधारण मार्च १९९० मधला आहे. त्यावेळी मी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. अकरावी बारावीला मी पुण्यात स.प. महाविद्यालयात शिकत होतो. त्यावेळी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो. वसतिगृहातले ते दिवस आनंदाचे होते. मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा आनंद आणि अजून काहीतरी करून दाखवण्याची इच्छा अशा दोन्ही प्रकारच्या भावना या दोन्ही वर्षात मनात होत्या. साखरवाडी सारख्या छोट्या गावातून एकदम पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिकायला येणे हे एक स्थित्यंतर होते. माझ्याबरोबर राहणार्‍या बहुतेक सगळ्यांची हीच स्थिती होती. अकरावीला आम्ही तळमजल्यावर राहत होतो. अकरावीची परीक्षा संपल्यावर पुढच्या वर्षी आम्हाला वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोल्या देण्यात आल्या. त्यावर्षीच्या वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा पार पडली. परीक्षा संपल्यावर माझ्या बरोबरच्या काही जणांनी वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात मोडतोड केली होती. १७-१८ हे वय तसं अधलंमधलं. बंडखोर वृत्ती असते. वसतिगृहात काही गैरसोयीदेखील झाल्त्याया होत्या. त्याचा राग म्हणून अशी मोडतोड झाली असावी. ही मोडतोड झाली हे समजल्यावर  वसतिगृहप्रमुख देवकुळे सर सर्वांना खूप रागावले होते. काही दंडदेखील केला होता. याप्रसंगात मी सहभागी नव्हतो. पण वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा प्रसंग मोठा होता. पण हा प्रसंग मी साफ विसरून गेलो होतो. मध्यंतरी माझा वसतिगृहातील मित्र मकरंद शेंडे याने या प्रसंगाची आठवण करून दिली पण मला काहीही आठवले नाही.

              ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

          दुसरा प्रसंग १९९९-२००० यापैकी एका वर्षामधील आहे. जून १९९९- जून २००१ या काळात मी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणजे 'प्रचारक' म्हणून काम करत होतो. याच काळात महेंद्र वाघ हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रचारक म्हणून काम करत होता. संघाच्या कामासाठी मी धुळे जिल्ह्यात प्रवास करत असे तर महेंद्र शहादा तालुक्यात प्रवास करत असे. काही कामासाठी तो धुळे येथे आला होता. परत जाताना त्याला सोडायला म्हणून मी एसटी स्टँडवर गेलो होतो. निघताना त्याने कोणातरी कार्यकर्त्यांचा फोन क्रमांक मला विचारला. तेवढ्यात गाडी सुरू झाली. मग मी मोठ्याने ओरडून त्याला तो क्रमांक सांगितला. मध्यंतरी बोलताना महेंद्रने हा प्रसंग मला सांगितला. तेव्हा मला त्यातले काहीही आठवले नाही.

          आपल्या आयुष्यातील असे अनेक प्रसंग आपण विसरतो. जणू काही तो काळ आपण पुसून टाकलेला असतो. कोणीतरी तो आठवून द्यायचा प्रयत्न करतो. पण त्याचे स्मरण होत नाही. एखाद्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा पण काहीही उमटू नये अशी अवस्था होते. 'असं झालं होतं?' एवढं म्हणण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही. स्मरण विस्मरणाचा हा खेळ जणू पाण्यावर काढलेल्या अक्षरांसारखा क्षणभंगुर वाटतो.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची