बहादुरीचे काम करणारे भारताचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री

 इतिहासात काळाचे असे अनेक क्षण येऊन गेले की ज्या क्षणी प्रश्न उपस्थित झाला की ही जबाबदारी कोण घेईल. त्या क्षणी जबाबदारी पार पाडायला कोणीतरी पुढे आले त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. ज्यांनी कर्तृत्वाने जबाबदारीला न्याय दिला त्यांचे गुणगान लोकांनी केले. ते इतिहासात नोंदले गेले. अशा कर्तृत्ववान लोकांच्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचे होय.


                    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

       स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विचार करताना हे निश्चितपणे लक्षात येते की स्वातंत्र्यानंतरची पहिली जवळपास पंधरा‌ वर्षे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या विचारांप्रमाणे भारताच्या आकारणीला दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अखेरच्या काळात विशेषतः १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धानंतर 'नेहरूंनंतर कोण?' हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला. यात काही नावे पुढे आली. त्यात लालबहादूर शास्त्री यांचे नाव होते. नेहरूंच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष कामराज यांनी कॉंग्रेसच्या खासदारांशी वैयक्तिक चर्चा करून पंतप्रधान कोण व्हावेत याच निर्णय घेतला. बहुसंख्य खासदारांनी शास्त्रीजी यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि लालबहादूर शास्त्रीजी पंतप्रधान झाले. खासदारांचा हा पाठिंबा एका रात्रीत मिळाला नव्हता तर त्यापूर्वी अनेक दशके शास्त्रीजी यांनी पक्षाचे काम अगदी पहिल्या पायरीपासून केले होते. आपल्या अंगच्या गुणांमुळे आणि कौशल्यांमुळे ते अधिक वरच्या स्तरावरच्या जबाबदाऱ्या घेत गेले. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात सुरू झालेली त्यांची जीवनयात्रा अखिल भारतीय स्तरावर पोचली आणि पंतप्रधानपदाच्या जबाबदारीने त्यावर कळस चढवला.
       लालबहादूर अगदी‌ दीड वर्षाचे असताना १९०६ मध्ये पिता शारदाप्रसाद यांच्या छत्राला पारखे झाले. लालबहादूर यांचे पालनपोषण माता रामदुलारीदेवी यांनी आपले वडील हजारीलाल यांच्या घरी केले. दुर्दैवाने हजारीलाल यांचाही लवकरच १९०८ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर लालबहादूर यांचे चुलत मातामह दरबारीलाल आणि चुलत मामा बिंदेश्वरीप्रसाद त्यांच्यावर मायेची सावली धरली. लहानपणापासून त्यांचे गुण कुटुंबियांना दिसत होते. दिलेल्या पैशात भरपूर आंबे मिळत असतानादेखील त्यातील गरजेपुरतेच आंबे घेणारे, आपल्या बिंदेश्वरीप्रसाद मामांनी 'मारणार नाही या अटीवर पकडून दिलेले कबतूर भोजनासाठी मारले गेले ' याचा सात्विक संताप व्यक्त करत अन्नत्याग करून मामांचे मनपरिवर्तन करणारे, आपल्या आडनावावरून जात ओळखली जाते हे लक्षात घेऊन जातीभेदांपलीकडे जाण्यासाठी इयत्ता सहावीत असतानाच आडनावाचा त्याग करणारे लालबहादूर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. १९४२ च्या आंदोलनात भाग घेण्यासाठी इंग्रजांनी चाललेल्या महाविद्यालयातील शिक्षण सोडून देऊन राष्ट्रीय चळवळीत सुरू झालेल्या महाविद्यालयातून शास्त्री ही पदवी मिळवली. ही पदवीच त्यांच्या नावाचा भाग होऊन बसली. गांधीजींनी दिलेले 'अस्वाद' व्रत आचरणात आणण्यासाठी ताटात वाढलेले सर्व अन्न एकत्र कालवून त्यात पाणी ओतून जेवण्याची सवय हा त्यांच्यातील सत्याग्रही व्यक्तिचा निग्रह होता. 'सर्व्हंटस् ऑफ इंडियन पीपल सोसायटी' या संस्थेचा सेवाभावी कार्यकर्ता म्हणून काम करताना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी काटकसरीने आपले प्रपंच चालवला. विवाहानंतर हीच दीक्षा पत्नी ललितादेवी यांनीदेखील अंगिकारली. पैशाची इतकी टंचाई होती की प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारांसाठी पैसे तर नव्हतेच पण इतकी वाईट होती की त्यांच्या पत्नी ललितादेवी यांना उसने पैसे घेऊन दुसऱ्या गावाहून रुग्णालयात पोचावे लागले.

        आर्थिक आघाडीवर ही विवंचना असली तरी त्यांची कामावरची निष्ठा, तळमळ, कुशल संघटक वृत्ती यांमुळे त्यांना अधिकाधिक वरच्या स्तरावरच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. त्यात एकवेळ तर अशी आली की ज्यांचे एकमेकांशी धोरणात्मक मतभेद होते असे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पुरुषोत्तमदास टंडन या दोघांचेही सहाय्यक म्हणून एकाचवेळी काम करावे लागले. नेहरू आणि टंडन दोघांनाही लालबहादूर यांच्या विचारशील व्यक्तिमत्वाची ओळख झाली आणि दोघांचाही विश्वास शास्त्रीजी यांनी संपादित केला. हा विश्वास इतका होता की नेहरू आणि टंडन यांना एकमेकांना पाठवण्याच्या पत्राचा मसुदा शास्त्रीजी यांच्याकडून करून हवा असे. एका अर्थाने ही तारेवरची कसरत होती. आपली नम्र वृत्ती, स्पष्ट विचार याआधारे ही कसरत लालबहादूर यांनी कौशल्याने केली.

         आपल्या कार्यशैलीची छाप उमटवल्यामुळे लालबहादूर यांना क्रमाक्रमाने उत्तर प्रदेश राज्य मंत्रीमंडळ आणि नंतर केंद्रीय मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पदाचा कोणताही बडेजाव न माजवता त्यांनी सामान्य माणसांच्या हालअपेष्टा कशा कमी होतील याचा विचार करत काम केले. मग त्यात उत्तर प्रदेशात सरकारी किफायतशीर वाहतूक व्यवस्था निर्माण करणे होते. केंद्रीय पातळीवर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेदेखील होते. मंत्री म्हणून काम करत असताना बरोबरच्या अधिकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध जपले. त्यांच्या वैयक्तिक सुखदु:खाची जाणीव ठेवली. शक्य ती मदत केली. रेल्वे मंत्री म्हणून काम करत असताना झालेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दाखवून देणारा ठरला.
            स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्ते मंत्री झाले. पण ते वयोवृद्ध झाल्याने मंत्रीमंडळात तुलनेने तरुणांना संधी देण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष कामराज यांनी घेतला. लालबहादूर शास्त्रीजी मंत्रीमंडळात असावेत हा नेहरू यांचा आग्रह होता. पण शास्त्रीजी यांनी अतिशय निरिच्छपणे पद सोडले. निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाचे संघटनात्मक काम सुरू केले. या कामातून त्यांचा देशभरातील कार्यकर्त्यांचा संपर्क वाढला.
               पंडित नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्रीजी पंतप्रधान झाले. पंडित नेहरूंची छाप असल्याने स्वाभाविकच त्यांच्याशी शास्त्रीजींची तुलना होई. हिंदी भाषेला तामिळनाडूत उफाळून आलेला विरोध, काश्मीरमधील दर्ग्यातील हरवलेला 'हजरत बल' या प्रसंगी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची कसोटी लागली. ती त्यांनी कुशलतेने उत्तीर्ण केली. भारत स्वतंत्र होता पण अद्यापही अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत स्वावलंबी झाला नव्हता. त्यामुळे अमेरिकेकडून पीएल४२० अंतर्गत निकृष्ट धान्य आयात करण्याची वेळ येत असे. याला शेतीतील उत्पादन वाढवणे ह्याविषयी उपाय योजना चालू होतीच. पण गांधीजींच्या या एकनिष्ठ अनुयायाने दर सोमवारी रात्री उपवास करून काही प्रमाणात अन्नबचत करण्याचे आवाहन केले. शास्त्रीजी हे 'बोले तैसा चाले ' या श्रेणीतील असल्याने लाखो भारतीयांनी त्याचे अनुसरण केले. देशसेवेसाठी उपवास पत्करला.

        पंतप्रधान म्हणून काम करत असताना शास्त्रीजींना टीकेचा सामना करावा लागला. विरोधी पक्षातील नेत्यांनी तर टीका केलीच. पण काही प्रसंगी स्वपक्षातील खासदारांच्या टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले. यातच पाकिस्तानने आपल्या ताकदीचा अवास्तव आत्मविश्वास बाळगत भारताला कमी लेखत घुसखोरीची योजना आखली. ही घुसखोरी उघड झाल्यावर त्याचे रूपांतर युद्धात झाले. 'अहिंसा' हे गांधीजींचे मूल्य असले तरी याप्रसंगी देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानविरोधात सर्वंकष युद्ध लढण्याचा धोरणात्मक निर्णय शास्त्रीजींनी घेतला. यात प्रतिआक्रमण करण्याचा निर्णय झाला. सैन्यदलांच्या एकत्रित कामगिरीने पाकिस्तानला जोरदार तडाखा बसला. आपली आगळीक भारी पडते हे लक्षात घेऊनही पाकिस्तानने सुरुवातीला नमते न घेण्याची भूमिका घेतली. पण शेवटी आंतरराष्ट्रीय दबाव, प्रत्यक्ष झालेले नुकसान याचा अंदाज घेऊन पाकिस्तानने युद्धबंदी स्वीकारली. या सगळ्यात शास्त्रीजींचा कणखर व्यक्तिमत्त्व झळाळून दिसले. देशबांधवाचा एकमुखी पाठिंबा त्यांनी मिळवला.

    शास्त्रीजींची कृषी आणि संरक्षण या दोन्ही बाबींचे महत्व अधोरेखित करणारी 'जय जवान| जय किसान||' ही घोषणा लोकप्रिय झाली. आता ती अजरामर झाली आहे.
      भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम म्हणून झालेला 'ताश्कंद करार' हा शास्त्रीजींच्या ठाम भूमिकेची, निर्णयक्षमतेची ओळख करून देणारा आहे. ताश्कंद येथे ११ जानेवारी १९६६ च्या पहाटे त्यांचा झालेला आकस्मिक मृत्यू देशाला दु:खसागरात बुडवून गेला. याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जातात. पण त्यापूर्वी शास्त्रीजींना दोन वेळा हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे. ताश्कंद करार ही एका अर्थाने शास्त्रीजींच्या जीवनातील सर्वोच्च कामगिरी होती. त्याचवेळी त्यांचा झालेला मृत्यू हा दुःखद आणि अविस्मरणीय आहे. भारतमातेच्या या थोर सुपुत्राला विनम्र अभिवादन!

सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. नेहमीप्रमाणे सुंदर लेखन🙏

    ReplyDelete
  2. लालबहादूर शास्त्रीजींची सुंदर माहिती या लेखांमधून पाहायला मिळते.... सुंदर लेखन सर 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची