विशाल हृदयाचे स्वामी विवेकानंद

         "जोपर्यंत जगातील शेवटच्या व्यक्तिला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी कार्य करत राहीन."असा आपला निश्चय प्रकट करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे हृदय अतिशय विशाल होते जगामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान याविषयी त्यांच्या मनात अपार करुणाभाव होता. या सर्व गोष्टी संपून संपूर्ण प्राणीमात्र सुखी झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. "जगातील कट्टरतावाद, संकुचितपणा, धर्मांधता, सांप्रदायिकता यामुळे जगामध्ये वाहिले तेवढे रक्त पुष्कळ झाले. आता यापुढे यामुळे रक्तपात होणार नाही यासाठी सर्व धर्मपंथ संप्रदाय सत्य आहेत हे स्वीकारूया." ही प्राचीन वैदिक घोषणा यांनी पुन्हा एकदा उच्चारली आणि विश्वबंधुत्वाचे आवाहन केले. या बंधुत्वाने माणसाचे सहजीवन अर्थपूर्ण होऊ शकते याची त्यांना खात्री होती.  


                       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     स्वामीजींचे विचार हे जगाला सर्वकाळ मार्गदर्शक आहेत. आपल्या वाटते विचार व्यक्त करणारी स्वामीजी ही एक व्यक्ती आहे. परंतु स्वामीजींनी आपले गुरुबंधू रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, " मी एक अशरीरी वाणी आहे." याचा अर्थ जे सर्वकालिक सत्य आहे त्याचा उच्चार माझ्या शब्दांतून होतोय आहे असा घेतला पाहिजे. स्वामीजींची ही सार्वकालिक सत्यवाणी वेळोवेळी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्याच्या जीवनात श्रद्धा आणि आशा दृढ करणारी ठरली आहेत.

 यापैकी एक उदाहरण आहे ते देखील यांचे ई.ई.डिकिन्सन यांचे. ते परमहंस योगानंद यांचे शिष्य होते. महावतार बाबाजी यांचे शिष्य लाहिरी महाशय हे होत. लाहिरी महाशय यांचे शिष्य स्वामी युक्तेश्वर आणि स्वामीयुक्तेश्वर यांचे शिष्य परमहंस योगानंद अशी ही गुरु शिष्यांची परंपरा आहे. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आध्यात्मिकतेच्या प्रसारासाठी परमहंस योगानंद अमेरिकेमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याने ज्ञानाचा प्रसार केला. या कार्यात लाभलेले त्यापैकी एक शिष्य म्हणजे डिकिन्सन हे होय.

     परमहंस योगानंद १९२० मध्ये अमेरिकेमध्ये गेले. सतत १५ वर्षे त्यांनी आध्यात्मप्रसाराचे काम अमेरिकेत केले. १९३५ मध्ये ते भारतात काही काळासाठी परत आले. भारतातील भेटीगाठी यात्रा पूर्ण करून पुन्हा साधारण दोन वर्षांनी ते अमेरिकेत परत निघाले. परत जाताना त्यांनी आपल्या अमेरिकन शिष्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू घेतल्या. अमेरिकेत पोचल्यानंतर प्रत्येक शिष्याला बोलावून भेटवस्तू ज्याची त्याला दिली. डिकिन्सन यांना एक चांदीचे भांडे योगानंद यांनी भेट दिले. ही भेट स्वीकारल्यानंतर डिकिन्सन हे अंतर्मुख आले. असे का झाले याबाबत त्यांनी आपल्या लहानपणाची ४३ वर्षांपूर्वीची एक आठवण सांगितली. लहानपणी ५ वर्षांचे असताना भावाने मस्करी करून ढकलून दिले म्हणून एकदा ते पाण्यात बुडत होते. अचानक एक आकृती त्यांना दृश्यमान झाली. तिने प्रेरणा दिली. भावाच्या एका मित्राने जवळच्या एका वृक्षाची फांदी खाली झुकवली. तिला धरून ते पाण्याबाहेर आले. नंतर १२ वर्षांनी १८९३ मध्ये त्यांनी आईबरोबर जात असताना एका व्यक्तीला पाहिले. आपण बुडत असताना जो चेहरा पाहिला तीच ही व्यक्ती आहे हे लक्षात आल्याबरोबर ते आईला तसे सांगून त्या व्यक्तीपाठोपाठ एका सभागृहात शिरले. त्या व्यक्तीचे भाषण संपल्यावर दोघे त्यांच्याजवळ गेले. त्या व्यक्तीशी बोलल्यावर ती व्यक्ती म्हणाली, "मुला तू बुडु नये अशी माझी इच्छा होती." ही व्यक्ती स्वामी विवेकानंद होय.  जागतिक सर्वधर्म परिषदेच्या दरम्यान घडला.  डिकिन्सन यांनी स्वामीजींना विनंती केली की, " स्वामीजी कृपा करून आपण माझे गुरू व्हा." स्वामीजींनी हसून उत्तर दिले की,  "मी तुझा गुरु नाही. काही काळानंतर तुझे गुरु तुला भेटतील. ते तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतील. ते गुरु तुला एक चांदीचे भांडे भेट देतील." ही घटना डिकिन्सन यांनी योगानंद यांना सांगितली. पुढे ते म्हणाले की , "ज्यावेळी आपण मला चांदीचे भांडे भेट दिले त्यावेळी मला लक्षात आले की स्वामी विवेकानंद यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्या द्रष्ट्या माणसाची आठवण येऊन मला गहिवरून आले." 

        या आठवणी वरून स्वामी विवेकानंद यांचे विशाल हृदय दिसून येते. आपल्याच पंथाच्या मोठेपणाचा दुराभिमान ते बाळगत नव्हते. व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे त्याला गुरुपरंपरा लाभते हे लक्षात घेऊन त्यांनी डिकिन्सन यांना आपले शिष्य करून घेतले नाही तर त्यांच्यासाठी योग्य असणाऱ्या गुरुची वाट पाहण्यास सांगितले. तसे घडणार आहे याचे भाकीत केले ही विशालता स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. स्वामीजींना विनम्र अभिवादन!

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)



Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची