मी जगत राहणार!

                              ( कथा )

    आशा काळोखे जिममध्ये शिरल्या. जिममध्ये गर्दी होती. त्यांनी  एक नजर सगळीकडे फिरवली. मग त्यांनी ट्रेडमिल असलेल्या बाजूकडे पहायलं. बहुतेक सगळ्या मशीनवर कोणीतरी व्यायाम करत होतं. पण एक मशीन मोकळं होतं. त्या सावकाश चालत मशीनपर्यंत पोचल्या. मशीनवर उभ्या राहिल्या आणि बटनं दाबून त्यांनी मशीन सुरू केलं आणि हळूहळू घालायला सुरुवात केली. आताशा फार ताठ उभं राहता येत नव्हतं. पण त्यांनी यावर एक उपाय अनुभवानं शोधून काढला होता. तो म्हणजे मशीनची वरची कड पक्की धरून ठेवायची. मशीनच्या हॅंडलला धरून उभं राहिलं की पाठीला बाक यायचा. मग त्यांनी हा उपाय शोधून काढला होता. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी ताठ उभं राहता यायचं आणि व्यायमही व्यवस्थित व्हायचा. 

                

           

              ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

             मशीनवर चालता चालता त्यांचं विचारचक्र सुरू होतं ' आज पुढं काय करायचं?'. खरं तर हा रोजचा प्रश्न होता. पण उत्तर मात्र फारसं बदलायचा नाही. विचार करता करता त्यांचं मन भूतकाळात गेलं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. उत्तमची त्यांना आठवण झाली आणि फोन कधी करायचा याचा त्या विचार करू लागल्या. उत्तम त्यांचा मुलगा. एकुलता एक. अतिशय हुशार. लहानपणापासूनच त्याची अभ्यासातली चमक दिसून यायची. हा काहीतरी वेगळं करून दाखवणार हे त्यांना आणि सुहासला नेहमी वाटायचं. सुहास म्हणजे त्यांचा नवरा. दोघं नवराबायको मिळून उत्तमच्या भविष्याचा विचार करायचे. त्याला लागेल ती पुस्तकं, अभ्यासाचं साहित्य, संदर्भ ग्रंथ सगळं काही ताबडतोब आणून द्यायचे. उत्तमही नेहमी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचा. सगळेचजण त्याचं कौतुक करायचे. साहजिकच म्हणायचे, "याच्या हुशारीचं चीज व्हायचं असेल तर त्यानं परदेशात जायला पाहिजे."

            झालंही तसंच. उत्तमलाही परदेशात जायचा ध्यास लागला. स्वतःच्या हुशारीवर त्याला अमेरिकेतल्या प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश मिळाला. मग काय पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर संशोधन अशी त्याच्या व्यासंगाची कमान उंचावतच गेली. ओघानंच अमेरिकेत राहणं आणि तिथंच स्थायिक होणं या गोष्टी होत गेल्या. व्यावसायिक क्षेत्रातही उत्तमच्या यशाची घोडदौड चालूच होती. बघता बघता तो अमेरिकेतलाही हुशार शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला.

       इकडं भारतात सुहास आणि आशा वयोमानानुसार आपापल्या नोकरीतून निवृत्त झाले. उत्तम अमिरिकेतच राहत असल्याने अमेरिकेचा प्रवास अनेक वेळा घडला. अमेरिकेतील सुबत्ता, सुखसोयी, तंत्रज्ञानाची प्रगती याचा सुखावणारा अनुभव त्यांनी अनेकवेळा घेतला. पण का कुणास ठाऊक त्यांना अमेरिकेत राहावे असं काही वाटलं‌ नाही. दोघंही भारतात आणि अमेरिकेत येऊन जाऊन असत. 

           जसजसं वय वाढत गेलं. तसतशा शरीरातील एक एक व्याधी डोकं वर काढू लागल्या. शहरातच राहत असल्याने मग निष्णात डॉक्टरांकडे उपचार , औषधं या गोष्टी सहज शक्य होत्या. पण जगात सगळ्याच गोष्टी अनिश्चित असतात. सगळ्यात बेभरवशाचं असतं ते माणसाचं आयुष्य!

        आशा काळोखे यांना याचाच अनुभव आला. एके दिवशी दोघं बाहेरून फिरून घरी परतले. " थोडं कसं तरी होतंय . सरबत कर." सुहास म्हणाला. त्या स्वयंपाकघरात गेल्या. सरबत घेऊन तीन‌चार मिनिटांत सरबत घेऊन येतात तर काय खुर्चीवर बसलेल्या सुहासची मान कलंडली होती आणि डोळे बंद होते. मनातली शंका खरी‌ ठरली. सुहास जागेवरच गेला होता. अंत्यसंस्कार काय करायचे. दोघांचाही देव, धर्म, रूढी, परंपरा कशावरही विश्वास नव्हता. एकदम तर्कशुद्ध, बुद्धिवादी‌ विचार. आशा काळोखे यांनी उत्तमला फोन लावला. उत्तमलाही अवेळी फोन आल्यावर अंदाज आलाच होता. तोच खरा ठरला. उत्तमला भारतात लगेच येणं शक्य नव्हतं. महिनाभरापूर्वीच तो येऊन गेला होता. त्यामुळे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयला द्यायचं दोघांनी‌ ठरवलं. महाविद्यालयाला फोन गेला आणि त्याचे कर्मचारी येऊन तासाभरातच मृतदेह घेऊन गेले.

              आशा काळोखे यांना अगदी‌ मिनिटामिनिटाचा तपशील कालपरवा घडल्यासारखा आठवत होता. पण त्यालाही आता सात आठ वर्षे होऊन गेली होती. उत्तम येऊन गेला पण आशा काळोखे इथंच राहिल्या. सुहास गेल्यावर त्यांनी आपली दिनचर्या ठरवून घेतली होती असं म्हणणं फारसं योग्य नव्हतं कारण आधीचीच दिनचर्या चालू होती. फक्त एकच फरक पडला होता तो म्हणजे सुहास असताना दोघं मिळून फिरायला जात. आता मात्र आशा काळोखे जिममध्ये व्यायामासाठी जाऊ लागल्या.

         नवरा बायको मुलगा यांचे विचार सारखेच होते. माणूस हा एक विशेष प्राणी आहे. प्राणीच पण बुद्धिमान. जन्म मरण ह्या गोष्टी निसर्गचक्राचाच एक भाग आहे. प्राण्यांमध्ये एखादा मेला तर उरलेल्यांचं जगणं थांबतं का. ते आधीसारखेच जगत राहतात. जोवर आयुष्य आहे तोवर जगत रहायचं. शक्य तितका आयुष्याचा आनंद घ्यायचा. 

         हे सगळे विचार पुन्हा येत गेले. त्यावेळात १५ मिनिटे झाली. ट्रेडमिल फिरायचं थांबलं.  थोडाफार आणखी व्यायाम करून आशा‌ काळोखे घरी परत आल्या. दरवाजा उघडून आत शिरल्या. नेहमीसाखंच समोरच्या पाटीवर त्यांचं लक्ष गेलं आणि क्षणभर डोळे स्थिरावले.  पाटीवर लिहिले होतं 'मी जगत राहणार.'

सुधीर गाडे पुणे 

( निरीक्षणावर आधारित. नावे , काही प्रसंग काल्पनिक)

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. 'मी जगत राहणार'--- मनाचा निर्धार पक्का केला की काहीच अशक्य नसते..
    सुंदर लेख🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची