जीविका आणि उपजीविका
एखादी व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काम करते त्याला उपजीविका असे म्हणण्याची पद्धत आहे. एकदा एकाने प्रश्न विचारला की , "ज्यावर आपला चरितार्थ चालतो त्याला त्या कामाला उपजीविका असे म्हटले जाते. तर जीविका कशाला म्हणायचे?" त्यावेळी एका जाणकाराने त्याला उत्तर दिले. उत्तरादाखल त्यांनी एक गोष्ट सांगितली. परीसाच्या शोधात भटकणाऱ्या एका माणसाची गोष्ट प्रसिद्ध आहे. एका सागर किनाऱ्यावर परिसाचा दगड सापडतो असे त्या माणसाला समजले म्हणून त्या माणसाने परिसाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या गळ्यात एक लोखंडी साखळी घातली. तो समुद्रकिनाऱ्यावर चालू लागला. किनाऱ्यावरील दगड घ्यायचा त्या दगडाने गळ्यातील साखळीला स्पर्श करायचा. जर साखळी सोन्याची झाली तर तो दगड परीस आहे असे सिद्ध होईल. त्या माणसाने या प्रकारे प्रत्येक दगड उचलून साखळीला लावायला सुरुवात केली. किनाऱ्यावरती मोजता येणार नाहीत इतके भरपूर दगड होते. किनारा खूप लांबलचक होता. त्यामुळे हळूहळू त्या माणसाला हे काम दीर्घकाळ करावे लागेल याचा अंदाज आला. माणसाचा एक स्वभाव आहे. माणसाच्या अंगवळणी एखादी गोष्ट पडली की ती तो प्रतिक्षिप्त क्रियेसारखी करत जातो. कालांतराने या परीस शोधणाऱ्या माणसाचे असेच झाले. दगड उचलून साखळीला लावायचा ही जणू प्रतिक्षिप्त क्रिया झाली. पण त्यात ती साखळी सोन्याची झाली की नाही हे लक्षात ठेवून बघण्याचा मात्र अंतर्भाव झाला नाही. अशीच काही वर्षे लोटली आणि त्या माणसाचे अचानक साखळीकडे लक्ष गेले. ती सोन्याची झाली होती. परंतु ती कधी सोन्याची झाली ही त्याला कळलेच नाही. या गोष्टीमध्ये त्या माणसाने परीसाचा शोध घेणे हे आपले ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण हे प्रयत्न चालू असतानाच्या काळात जगण्यासाठी त्याने अन्न मिळवण्याचा काही उद्योग केला असणारच. हा उद्योग म्हणजे त्याची उपजीविका आणि परीसाचा शोध घेणे ही जीविका होय. जाणकाराने सांगितलेला हा अर्थ विचार करण्यासारखा आहे.
या गोष्टीतून जीविका आणि उपजीविका याचा बोध होतो. अश्याच एका ध्येयवेढ्या माणसाच्या जीविकेची ही गोष्ट आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
सन १९०२ मध्ये राजर्षी शाहू महाराज हे इंग्लंडला राज्यारोहण समारंभासठी जात असतांना त्यांची ईडर संस्थानचे महाराज प्रतापसिंह यांच्याशी ओळख झाली. महाराज प्रतापसिंह हे आर्य समाजाचे होते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानणारा आर्य समाज शाहू महाराज यांना भावला आणि इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी कोल्हापूर मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. या मंडळींचे ध्येयवादी कार्य पाहून पुढे शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.
१९२२ मध्ये शाहू महाराज यांचे निधन झाले आणि काहीच दिवसानंतर आर्य समाजाचे अनुयायी असलेले डॉक्टर बाळकृष्ण हे पंजाबी गृहस्थ राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी बाळकृष्ण यांची नेमणूक केली होती. अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेले बाळकृष्ण हे अतिशय विद्वान गृहस्थ होते. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायक आयुष्याची तपशीलवार माहिती मिळाली असावी.
बाळकृष्ण यांनी १९२५ पासून संशोधन करून छत्रपती शिवरायांचे चरित्र लिहायला सुरुवात केली. तोपर्यंत जदुनाथ सरकार रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेले शिवचरित्रे प्रसिद्ध झालेली होती. बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील युरोपियन वखारींमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे शिवचरित्र लिहायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी परदेश दौरादेखील केला. त्यापूर्वीच्या शिवचरित्रांसाठी प्रामुख्याने फक्त इंग्रजी वखारींच्या पत्रव्यवहाराचा आधार घेतला होता. बाळकृष्ण यांनी प्रथमच डच वखारींच्या कागदपत्रांचा आधार घेतला आणि त्यातून शिवचरित्र लिहिण्याचे काम सुरू केले. याचबरोबर त्यांनी इंग्रज , फ्रेंच यांच्या कागदपत्रांचादेखील आधार घ्यायचे ठरवले.
बाळकृष्ण यांची आपल्या कामावरती आढळ अशी निष्ठा होती. परंतु दुर्दैवाने प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यांना दम्याचा पुष्कळ त्रास होत असे. दम्याची उबळ आल्यानंतर थोडा वेळ ते पालथे पडून राहत. ती उबळ संपल्यानंतर पुन्हा लिहिण्याचे काम सुरू करत. अशी जवळपास १४ वर्षे म्हणजे एक तपाची साधना करून बाळकृष्ण यांनी शिवचरित्र लिहिले. या काळात राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम करतच होते आपल्या विविध उपक्रमांनी त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या लौकिकात मोठी भर घातली.
बाळकृष्ण यांनी आपल्या शिवचरित्राचे शेवटचे पान लिहिले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. जणू काही जीवित कार्य करण्यापुरतेच त्यांचे आयुष्य होते. हे ध्येयासक्त आयुष्य जीवित कार्य संपल्याबरोबर लगेचच संपले. बाळकृष्ण यांसारख्या विद्वान ध्येयवेड्या व्यक्तींनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

उत्तम लेख सुधीर जी, जीविका म्हणजे ध्येयासक्त जीवन हे अगदी सहज उदाहरणे देऊन सांगितलेत
ReplyDeleteधन्यवाद सत्यजित
Delete