सेवामूर्ती बुधरी ताती
दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य ज्येष्ठ संघकार्यकर्ते कै. नानाराव पालकर यांच्या या ओळी ज्यांनी गेली अनेक दशके आचरणात आणून स्वतःच्या जीवनाला साफल्य प्राप्त करून दिले आहे, अशा अखंड सेवारत असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, श्रीमती बुधरी ताती. साक्षात सेवामूर्ती असणाऱ्या श्रीमती बुधरी ताती यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी या लेखाचा प्रपंच ! ( महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा वर्ष २०२२ चा बाया कर्वे पुरस्कार स्वीकारताना श्रीमती बुधरी ताती ) भारताच्या छत्तीसगड राज्यातील दक्षिण बस्तरमधील गीदम ब्लॉकमधील हीरानार या गावी श्रीमती बुधरी ताती यांचा जन्म सन १९६९ मध्ये एका जनजाती परिवारात झाला. त्यांच्या घरात आध्यात्मिक वारसा वडिलांपासून चालत आला आहे बुधरी यांनाही आध्यात्मिकतेची आवड लहानपणापासून आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून गुमरगुंडा आश्रम दिव्य जीवनसंघाशी त्यांचा संबंध आला. या आश्रमातील स्वामी पूज्य सदाप्रेमानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. जनसेवेच्या कार्याची प...