गुरू कधी भेटतात?

२०१३ मध्ये एका महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कार्यक्रमानंतर एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की , "गुरु कधी भेटतात?" मी त्याला उत्तर दिले , "मला याबाबत फारशी माहिती नाही. परंतु जे वाचले आहे त्याप्रमाणे त्यानुसार योग्य वेळ झाली की गुरू भेटतात." गेले काही दिवस याच मुद्द्याचा विचार करत असतांना वेगवेगळी उदाहरणे लक्षात आली. ती उदाहरणे या लेखात दिली आहेत. ( संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) सतराव्या शतकामध्ये १६२८ मध्ये संत बहिणाबाई यांचा मराठवाड्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहानपणी त्यांचे लग्न गंगाधर पाठक यांच्याशी लावून देण्यात आले. बहिणाबाई यांना देखील अध्यात्माची गोडी होती. परिवारामध्ये वेदांचे अध्ययन होते परंतु भक्ती मार्गाची उपासना मान्य नव्हती. कोल्हापूर येथे हे कुटुंब राहायला गेले असताना तेथे जयराम स्वामी यांच्या कीर्तनांतून संत तुकाराम यांची वचने बहिणाबाईंच्या कानी पडली. आपल्याला संत तुकाराम या...