मन
( १/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट) आपला आपल्या मनावर खूप ताबा आहे हा समज किती तकलादू असतो नाही. थोडं फार जरी मनाविरुद्ध घडलं तरी तोल जातो नि वेडेवाकडे शब्द तोंडातून बाहेर पडतात. अथवा बाहेर नाही पडले तरी ते आतल्या आत धुमसत राहतात. थोड्या वेळाने आपोआपच बाहेर पडतात जशी कोंडलेली वाफ आवाज करत बाहेर पडते. कधी कधी वाटत राहतं की नाही आपला तोल सुटणार नाही. पण शब्दाला शब्द वाढत जातो नि संयम, विवेक इ. गोष्टी कधी मागे पडतात हेच कळत नाही. सर्व शाब्दिक चकमक संपल्यानंतर राहते ती कडवट चव नि आपलं मन आपल्या ताब्यात आहे भ्रमाचा फुटलेला भोपळा! (७/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट) माणसाचं मन एक गंमतीशीर गोष्ट आहे. कुठल्याही प्रसंगाबद्दल, गोष्टीबद्दल मनात काही ठोकताळे बनवलेले असतात. त्याप्रमाणे सर्व काही होत असेल तर चांगलंच असतं. पण घडत नसेल तर मात्र मग मनाचं अस्तित्व प्रकर्षानं जाणवू लागतं नव्हे अस्वस्थ करू लागतं. आणि मनाची ही अस्वस्थता अशी बोट ठेवून दाखवतासुद्धा येत नाही नि तिच्याकडे दुर्लक्षसुद्धा करता येत नाही. मग मात्र विचारांच्या घुसळणीने डोकं बेजार होऊन जातं. कधी कधी इतकं की शारीर...