सश्रद्ध शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सश्रद्धपण! ईश्वरी अस्तित्वावरती , त्याच्या सगुण साकार रूपांवर महाराजांची निरतिशय श्रद्धा होती. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) आपले कार्य हे ईश्वरी कार्य आहे याच्यावर महाराजांची अभंग श्रद्धा अगदी लहानपणापासून होती. १६४५ मध्ये दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांचे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे , "हे राज्य व्हावे असे श्रींचे मनात फार आहे. पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करून तो आम्हास यश देणार आहे." यावेळी शिवराय फक्त पंधरा वर्षांचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु इतक्या लहान वयातच त्यांना आपल्या ईश्वरी कार्याचा साक्षात्कार झाला होता आणि ईश्वरी कृपेने हे कार्य सिद्धीस जाणार आहे यावर त्यांची ठाम श्रद्धा होती हे सहजपणे समजते. अफजलखानाचे स्वराज्यावरील आक्रमण प्राणांतिक संकट होते. यावेळी वय, अनुभव, फौजफाटा, धनसंपत्ती या सर्वात शिवराय तुलनेने कमी होते हे लक...