क्रिकेटच्या आवडीचा एक असाही फायदा

         भारतात साधारणपणे तीन विषयांवर सर्वात जास्त वेळा चर्चा होत असते. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. कोणत्या वेळी कोणत्या विषयावर जास्त चर्चा होईल हे त्या त्या वेळी असणाऱ्या परिस्थितीवर ठरते. एखादा चित्रपट गाजला की चित्रपट सृष्टीबाबतची चर्चा रंगते. निवडणुकांच्या वेळी राजकारणाची चर्चा रंगते आणि क्रिकेट सामन्यांच्या वेळी क्रिकेटची चर्चा रंगते. मग यातील हौशी लोक आपापली मते सांगतात. तसे जाणकार लोक आकडेवारी सांगतात. चर्चा रंगत जाते.

            आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला'लगान' सारखा चित्रपट तर काल्पनिक असूनही लोकांच्या मनाची पकड घेतो. भुवन या नायकाच्या बाजूने सर्वचजण उभे राहतात. इंग्रजांच्या खऱ्याखुऱ्या अत्याचारांची वर्णने काल्पनिक कथेतून केली गेली. चित्रपटातील भुवनच्या संघाचा विजय म्हणजे भारताचा विजय असे समाजमन तयार झाले. 

        एवढे सगळे असले तरी वस्तुस्थिती उरतेच की इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथेच हा खेळ बहरला. सध्यादेखील जगात फुटबॉल खेळणाऱ्या देशाच्या संख्येच्या तुलनेत अगदी कमी संख्येच्या देशात हा खेळ खेळला जातो. कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, २०-२० क्रिकेट अशी वेगवेगळी रूपे घेऊन हा खेळ जगभरात खेळला जात आहे. क्रिकेट रसिक या वेगवेगळ्या प्रकारांना प्रतिसाद देत आहेत.

      काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावर हिमालयाच्या शिखरावर बर्फामध्ये फावडे घेऊन क्रिकेट खेळणाऱ्या सैनिकांचा व्हिडिओ टाकला आहे. अगदी विपरीत परिस्थितीतदेखील हे सैनिक क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत आहेत.  याच सैन्यदलांच्या साधनसामग्रीसाठी क्रिकेटची आवड नकळतपणे कारणीभूत ठरली त्याचा हा एक किस्सा.

          १९५६ मध्ये भारताचे एअर चीफ मार्शल पी.सी.लाल हे लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी युरोपला गेले. त्यावेळी नॅट नावाचे छोटे विमान बनवणाऱ्या डिझायनर श्री. डब्ल्यू. ई. डब्ल्यू. पेटर यांच्याशी चर्चा झाली. पण चर्चेमध्ये त्यांनी ही विमाने विकायला नकार दिला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी क्रिकेटचा विषय निघाला आणि लाल यांनी नुकत्याच झालेल्या प्रेसिडेंट 11 आणि प्राईम मिनिस्टर 11 यांच्यातील क्रिकेटच्या सामन्याचे बहारदार वर्णन केले. जेवण संपले. दौराही संपला.


               ( नॅट विमानाचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

        काही दिवसानंतर लाल यांना फोन आला आणि नॅटची विक्री करण्यास तसेच भारताला ही विमाने उत्पादन करण्याचा परवाना देण्यास पेटर तयार असल्याचे समजले. करार झाला. नॅट विमाने मिळाली.

       काही काळानंतर पेटर आणि लाल यांच्यात मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. त्यावेळी याबाबत बोलताना पेटर म्हणाले, " तुम्ही कम्युनिस्ट आहात असे मला वाटत होते म्हणून मी नकार दिला होता. पण तुम्ही क्रिकेट खेळता हे समजले ( त्याची मी खात्री करून घेतली.) आणि तुम्ही कम्युनिस्ट नाहीत हे मला लक्षात  आले. त्यामुळे मी विमाने विकण्याचा निर्णय घेतला." हा काळ जगातील शीतयुद्धाचा होता. भांडवलशाही मानणारी अमेरिका आणि साम्यवादी रशिया या दोन गटात जगाची वाटणी झाली होती. भारताचे परराष्ट्र धोरण अलिप्ततावादाचे होते. पण भारत रशिया यांच्यातील सहकार्य, त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर असलेला समाजवादाचा पगडा या सगळ्यातून कदाचित पेटर यांचा गैरसमज झाला असावा. पण जेवणाच्या वेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांना आपल्या मताचा पुनर्विचार करावा वाटला.

        पेटर हे १९५० मध्ये फोलंड कंपनीचे प्रमुख झाले. त्यांनी छोट्या आकाराची , चटकन उंची गाठणारी नॅट विमाने तयार केली. तर अमेरिकेने रशियाच्या मिग विमानांन टक्कर देण्यासाठी विशाल आकाराची सेबरजेट ही विमाने उत्पादित केली. पाकिस्तानचे भूराजकीय महत्त्व वाटल्याने ही बलाढ्य विमाने अमेरिकेकडून त्यांना मिळाली. आपल्या सैन्यबळाचा, साधनसामुग्रीचा आणि चलाखीचा फाजील आत्मविश्वास असल्याने पाकिस्तानने १९६५ मध्ये भारतात घुसखोरी केली. त्याचे रूपांतर युद्धात झाले. या युद्धात भारताने सैन्याच्या सर्व दलांचा प्रभावी, एकत्रित उपयोग केला आणि पाकिस्तानला धडा शिकवला.


         ( सेबरजेट विमानाचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

        नॅट विमानांनी १९६५च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानकडे असलेल्या त्या वेळच्या अद्ययावत अमेरिकन सेबरजेट विमानांना निष्प्रभ केले. ट्रेव्हर आणि कीलर या दोन बंधूंनी नॅट विमानांच्या सहाय्याने सेबरजेट टिपली. दोघांनाही त्यासाठी वीरचक्र पुरस्कार मिळाला. दोघा भावांना एकाचवेळी वीरचक्र पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

   अशा रीतीने क्रिकेटच्या आवडीचा एका युद्धात विजयासाठी नकळतपणे उपयोग झाला.

( विमान खरेदीचा संदर्भ 'लालबहादूर शास्त्री : राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम'

लेखक पी.सी.श्रीवास्तव अनुवाद अशोक जैन )


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

उत्तराखंड सहलीतील अनुभव

गुजरात सहल