छ. शिवराय : सागरी दुर्ग आणि सलगी देणे
छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. या द्रष्ट्या महापुरुषाने परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला आणि भविष्याचा वेध घेऊन भूतकाळातील चुका, त्रुटी दुरुस्त करण्यासाठी परिश्रम केले. शिवरायांच्या पूर्वी ३०० वर्षे महाराष्ट्रात धर्मांध आक्रमकांची सत्ता होती. या धर्मांध आक्रमकांनी भूमीवर जम बसवला पण सागरी सत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले. भारताचा विचार केला तर मध्ययुगीन काळात क्रूर मोगली सत्तेचे वर्चस्व भारताच्या मोठ्या भूभागावर राहिले. परंतु त्यांनीदेखील सागरी सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला नाही. इतके दुर्लक्ष केले की मोगली बादशाहाला देखील मक्केला जाण्यासाठी युरोपियनांचा परवाना लागे. महाराजांची दूरदृष्टी अशी की त्यांनी सागरी सत्ता उभारण्याची कल्पना मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे पावले उचलली.
( सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरातील छ. शिवराय )
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
सागरी सत्तेचा एक भाग म्हणजे समुद्रावर असणारे दुर्ग होत. हिंदवी स्वराज्याचा विचार करता स्वराज्याच्या सागरी सीमांवर तीन वेगवेगळ्या परकीय आक्रमकानी आपला जम बसवला होता. सागरी दुर्गांच्या आधाराने ते आपला विस्तार व्यापार चालू ठेवत होते. याला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी सागरी दुर्गांचे निर्माण केले.
जंजिरा हा सिद्दी लोकांनी बळकावून तेथे आपली सत्ता स्थापन केली होती. माणसांच्या गुलामगिरीचा व्यापार करणारे हे सिद्दी महाराजांना सतत सलत होते. अनेक प्रयत्न करूनदेखील महाराजांना जंजिरा घेता आला नाही. त्यामुळे त्यांनी जंजिऱ्याच्या जवळ पद्मदुर्ग उभारला आणि जंजिऱ्याच्या सिद्दीला अटकाव केला.
अशीच परिस्थिती पोर्तुगीजांचीदेखील होती. गोव्यामध्ये स्थिरपद झालेली धर्मांध पोर्तुगीज सत्ता हिंदूंचा अनन्वित छळ करीत होती. तसेच व्यापाराच्या निमित्ताने शोषणदेखील करत होती. याला अटकाव करण्यासाठी महाराजांनी कुरटे बेटावर सिंधुदुर्ग उभारणी केली. महाराज आग्रा येथे कपटी औरंगजेबाच्या कैदेत डांबले गेले असतानादेखील या बेटाच्या उभारणीचे काम थांबू न देण्याची दक्षता राजमाता जिजाऊसाहेबांनी घेतली होती. याच सिंधुदुर्गावर छ. शिवाजी महाराजांचे मंदिर तसेच महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा हा अमूल्य ठेवा आहे.
ज्या युरोपियन सत्तेने भारतात सर्वात शेवटी जम बसवला ती म्हणजे इंग्रजांची सत्ता. इंग्रज हे केवळ व्यापारी नसून ते राजकारणात ढवळाढवळ करणारे आहेत आणि हिंदवी स्वराज्याला म्हणजेच भारताला त्यांच्यापासून धोका आहे हे ओळखणारा सर्वात पहिला मध्ययुगीन महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीनंतर इंग्रजांनी त्यांचे बस्तान मुंबईच्या बेटांवर बसवले. पण इंग्रजांची नियत जाणून महाराजांनी त्यांना अटकाव करण्यासाठी खांदेरी येथील बेटावर दुर्ग बांधण्याचे काम १६७९ मध्ये सुरू केले.
या प्रकारे महाराजांनी आपली सागरी सत्ता स्थिर करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी दुर्ग बांधले. वरील तीन दुर्गांशिवाय सुवर्णदुर्ग हादेखील महाराजांनी याच दृष्टिकोनातून बांधला आहे.
शिवाजी महाराजांच्या चरित्रातील समुद्री दुर्गांबाबत विचार करताना दोन घटना लक्षात येतात. त्यातील पहिली घटना सिंधुदुर्ग उभारणीच्या वेळची आहे. महाराजांच्या दूरदृष्टीला कुरटे बेटावर दुर्ग उभारता येईल हे अचूकपणे लक्षात आले. या महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करण्यासाठी म्हणून पूजा पाठ करायचा. यासाठी महाराजांनी गावातील ब्राह्मणांचा शोध घेतला. परंतु आदिलशाही सत्तेकडून होणाऱ्या जुलमाला घाबरून कोणीही पूजा करण्यासाठी तयार होईना. त्यावेळी महाराजांनी गावातील या जानभट अभ्यंकर आणि दादंभट उपाध्ये दोन ब्राह्मणांना बोलावून आणले त्यांना अभया दिले आणि त्यांच्या हस्ते बेटावर पूजा पार पाडली याच बेटावर शिवाजी महाराजांच्या हातापायांचे ठसे आणि मूर्ती अमूल्य ठेवा आहे पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी क्रूर औरंगजेबाने हिंदवी स्वराज्यात सर्वत्र छळवणूक त्या चार सुरू केले त्यावेळी सिंधुदुर्ग सोडून जाण्यासाठी योजना झाली परंतु या दोघांनी महाराजांना दिलेला शब्द पाळण्यासाठी तिथून जाण्याचे नाकारले.
सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा घेण्यासाठी महाराजांनी ऑगस्ट १६७६ मध्ये एक प्रयत्न करण्याचे ठरवले. जंजिऱ्याजवळ अष्टागर येथील कोळीवाड्यातील लायपाटलांनी रात्रीच्या अंधारात जाऊन जंजिऱ्याला शिड्या लावायच्या. मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी त्याचा आधार घेऊन छापा मारून जंजिरा हस्तगत करायचा अशी योजना होती. ठरल्याप्रमाणे लायपाटील जंजिऱ्याला शिड्या लावून मोरोपंतांची वाट पाहत राहिले. काही कारणांमुळे मोरोपंत सैन्यासह वेळेवर पोचले नाहीत. त्यामुळे पहाटेच्या सुमारास नाईलाजाने लाय पाटलांनी माघार घेतली. महाराजांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी लाय पाटलांचा गौरव केला आणि त्यांना सरपाटील असा किताब दिला. तसेच पालखीचा मान दिला. लायपाटील म्हणाले, " महाराज, मी समुद्रावरचा माणूस. मी पालखी घेऊन काय करू?" त्यावेळी महाराजांनी त्यांना एक गलबत बांधून देण्याची आज्ञा केली आणि त्या जहाजाला 'पालखी' असे नाव देण्यास सांगितले. नंतर एकांतात महाराज मोरोपंतांना म्हणाले, " पंत, कोताई केली कार्य राहून गेले." पंत खजील झाले.
समुद्री दुर्गांबाबतचे महाराजांचे हे प्रसंग वाचताना लक्षात येते की महाराजांनी परिसरातील स्थानिक व्यक्तींना विश्वासात घेऊन हिदवी स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण करण्याचे धोरण अवलंबिले. यातूनच 'शिवरायांचे सलगी देणे' लक्षात येते. छ. शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम महाराजांच्या प्रत्येक कार्यातून राष्ट्रप्रेम आणि धर्माबद्दल आस्था ही उल्लेखनीय बाब आहे🙏🙏
ReplyDeleteबरोबर आहे सर 🙏🏾🙏🏾
Deleteखूपच छान आणि प्रेरणादायी लेख आहे.🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏾
DeleteSoo beautifully and in apt words you have described. .
ReplyDelete