सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी
कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की:
'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.'
मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात, कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
जसं रामाचं नाव घेतल्यानंतर पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा संचय होतो, त्याच रामाच्या चरित्रामध्ये या पापाचा क्षय करण्यासाठी म्हणून काही कृती आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, अयोध्येमध्ये ते परत निघाले. आता अयोध्येच्या सिंहासनावरती प्रभू रामचंद्र विराजमान होणार आणि अयोध्येमध्ये त्यांच्या नावाचा राज्यकारभार, नव्हे नव्हे ते स्वतः राज्यकारभार सुरू करणार अशी स्थिती आली, त्यावेळेला त्यांनी आपला जो दूत होता हनुमंताला त्यांनी आज्ञा केली की तू अयोध्येत जाशील पण अयोध्येत जाण्यापूर्वी एका व्यक्तीला तू जरूर भेट, त्या व्यक्तीला सांग की माझं कुशल मंगल आहे आणि मी व्यवस्थित आहे, तू त्या व्यक्तीला जरूर सांग. कोण होती ती व्यक्ती? यावेळेला प्रभू रामचंद्राला आपल्या माता कौसल्येची आठवण आली नाही. आपल्या पादुका राज्यसिंहासनावरती ठेवून जो राज्य करतो त्या भरताची आठवण आली नाही. परंतु रामचंद्रांनी असं सांगितलं की तू जाताना पहिल्यांदा निषादराज गुहकाला भेट आणि त्याला सांग की श्रीराम हे कुशल आहेत. वनामध्ये राहणाऱ्या बंधूंच्या प्रती जो आत्मीयतेचा भाव रामचंद्रांनी स्वतःच्या आचरणातून प्रकट केलेला आहे, तो आपण सगळ्यांनी आचरणातून प्रकट करणं अतिशय आवश्यक आहे.
कुटुंबाचं सौख्य कशात आहे, तर ते प्रेमात आहे. साने गुरुजींनी असं म्हटलंय की 'प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी'. मला आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून विनंती करायची आहे की आपण त्याग करायला शिकलं पाहिजे. कशाचा आम्ही त्याग करायला पाहिजे? तर कळत-नकळत आजही आमच्या समाजामध्ये असं घडतं की समोरचा माणूस कोण आहे, तो अमुक जातीचा आहे म्हटल्यानंतर त्याचं स्थान कुठे आहे, अशी गणितं आमच्या समाजामध्ये कळत-नकळत आमच्या मनामध्ये निर्माण होतात. शहरांमध्ये असे वाटते की आमच्या मनामध्ये असं काही येत नाही. परंतु आज भारताची स्थिती अशी आहे की अमुक एका समाजातला नवरदेव घोड्यावरती बसला आणि घोड्यावरती बसून त्यांनी वरात म्हणून मिरवणूक काढली, तर त्याच्यावरती हल्ला होतो, त्याला हेल्मेट घालून त्या मिरवणुकीमध्ये घोड्यावरती जावं लागतं, ही आजही आपल्या भारतातील स्थिती आहे.
तामिळनाडू राज्यात काही वर्षांपूर्वी एक दुःखद घटना घडली. एका व्यक्तीच्या आजोबांचं निधन झालं. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही अमुक एका समाजातले आहात आणि त्यामुळे तुम्हाला जो गावातला मुख्य रस्ता आहे, त्याच्यावरून अंत्ययात्रा काढता येणार नाही. तुम्हाला बाहेरच्या मार्गाने जायला पाहिजे. चालत आलेली वहिवाट नाईलाजानं त्या माणसाने मान्य केली. पण नंतर त्यानं उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि 'मद्रास उच्च न्यायालयाने' त्याच्या बाजूने निकाल दिला की भारतामध्ये संचार स्वातंत्र्य असल्यामुळे, कोणीही कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरून जाऊ शकतं. या माणसाच्या बाजूने निकाल आला. त्यानंतर काहीच दिवसांनी त्याच्या आजीचं निधन झालं. पण निधन झाल्यानंतर मात्र परिस्थिती अशी आली की त्या माणसाला न्यायालयाचा आदेश असूनदेखील आपल्या आजीची अंत्ययात्रा त्या मुख्य रस्त्यावरून नेता आली नाही. उलट पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल, प्रश्न निर्माण होईल म्हणून याच्या नातेवाईक असलेल्या पाच-पन्नास लोकांना गाड्यांमध्ये घातलं आणि दुसरीकडे नेलं.
आपल्या समाजामध्ये जरा खरवडलं की माणसाची जात दिसते अशी परिस्थिती आज देखील काही ना काही प्रमाणात आहे हे आपण पहिल्यांदा मान्य करूयात. पहिल्यांदा आपण अशा भेदभाव करणाऱ्या विचारांचा त्याग केला पाहिजे. आपल्या मनामध्ये असे विचार येता कामा नयेत. कळत-नकळत बोलताना आपल्याकडून जातींच्या संदर्भात असलेले उल्लेख होतात आणि कुठल्या एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सर्व जातीला विशिष्ट मापानं मोजण्याची चूक बरेचजण करतात. आपण सगळ्यांनी एकच ओळख लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे 'हिंदू'.
दुसरी गोष्ट आपण सहज करू शकतो, ते म्हणजे आपल्याकडचे जे सण-समारंभ, उत्सव, घरातले मंगल प्रसंग असतात, त्याच्यामध्ये या एकत्र सरमिसळीचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. कोकणामधल्या एका छोट्या खेडेगावामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये पत्रिका वाटायची पद्धत आहे. आता पत्रिका वाटणं हा एक व्यवहाराचा देखील भाग आहे. आपले एकूण समाजाशी संबंध कसे आहेत, याच्या आधारावरती आपण पत्रिका वाटत असतो, कोणी कोणाला पत्रिका द्यायची वगैरे वगैरे. पण त्या गावात परिस्थिती अशी होती, कोकणातली परिस्थिती अशी की इथं पाच-पंधरा घरं, तिथं पाच-पंधरा घरं अशा वाड्या आहेत. त्या गावामध्ये आजपर्यंत असं चालत आलेलं होतं की अमुक एका वाडीवरती उरलेल्या वाड्यांच्या निमंत्रणं जायचीच नाहीत. त्या गावातल्या कार्यकर्त्याने ठरवलं की नाही, आमच्या गावामध्ये असं होणार नाही आणि मी त्या वाडीवरतीदेखील जाऊन निमंत्रण देणार. अतिशय दुःख वाटतं की ही घटना फार जुनी नाही, १०-१५ वर्षांपूर्वीची घटना आहे. बाकीच्या वाडीतल्या लोकांनी त्याला असं सांगितलं की , "तू जर अमुक वाडीतल्या लोकांना निमंत्रण दिलं तर आम्ही तुझ्या लग्नाला येणार नाही." आपण भांडू शकतो, जगाशी आपण भांडू शकतो, शत्रूशी आपण लढू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे, पण आपल्याच माणसांशी भांडणार कसं हो? 'आपलेच दात आणि आपलेच ओठ!' गाव एक आहे, वाड्या एक आहेत, त्या माणसाने काय केलं? त्यानं हात जोडून सगळ्यांना नम्रतेने विनंती केली की " माझ्या घरचा मंगल प्रसंग आहे. तुम्ही जसे माझे आहात तसे ते पण माझे आहेत. ते आणि आपण आपण सगळे एक आहोत. त्यामुळे मी अतिशय नम्रपणाने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या लग्नामध्ये सहभागी व्हा." त्या लग्नात काय झालं हा भाग जर सोडून दिला तर आज त्या गावातली १०-१५ वर्षांनंतरची परिस्थिती अशी आहे की आज मात्र ही सरमिसळ चांगल्या प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे अशा मंगल प्रसंगी आपण सर्वांची आठवण ठेवली पाहिजे.
अजून एक विलक्षण आठवण मातृशक्तीची मला या निमित्तानं सांगायचा मोह आवरत नाही. दिवाळीचे दिवस होते. हरियाणात एका ज्यांची आर्थिक सधनता आहे अशा घरामधील महिलेने आपल्या घरातल्या सगळ्या लोकांसाठी कपडे, खाऊ वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या. तिने आवर्जून आपल्या घरामध्ये जी कामवाली महिला होती तिच्यासाठी, तिच्या मुलांसाठी देखील फटाके, कपडे आणि मिठाई असं सगळं आणलं. मग तिला तिने दिली. तिलाही आनंद झाला की आपल्या मालकिणीच्या घरी दिवाळी होणार, आपल्या पण घरी दिवाळी होणार. संध्याकाळची वेळ झाली आणि मालकिणीच्या लक्षात आलं की काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय. हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती तातडीने तिने आपलं घर सोडलं आणि त्या कामवालीच्या वस्तीमध्ये ती गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर या कामवालीला देखील आश्चर्य वाटलं की,' आज मालकीणबाई आपल्या वस्तीमध्ये का आल्यात?' मालकीणबाई तिच्या घरी आल्या आणि त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि त्यांनी प्रेमाने तिला घट्ट मिठी मारली आणि त्यांनी तिला असं म्हणाल्या की ,"दुपारी हेच राहिलं होतं की प्रेमाने तुला आलिंगन द्यायचं राहिलं होतं."असं प्रेमाने आलिंगन आपण सगळ्या समाज घटकांना देऊ शकतो का? याचा आपण अतिशय मनापासून विचार केला पाहिजे.
दुर्दैवानं आज आपल्या समाजाची स्थिती अशी आहे की कोणत्या महापुरुषाची जयंती आहे, कोणत्या महापुरुषाचा उत्सव आहे असं म्हटल्यानंतर महापुरुषांची आपण एका अर्थानं वर्गवारी केली आहे. अमुक महापुरुष तमक्या जातीचा, तमुक महापुरुष या जातीचा, मग या जातीच्या कार्यक्रमात त्या जातीच्या लोकांनी जायचं नाही. सर्व महापुरुषांनी जो विचार केलाय तो संपूर्ण समाजाचा विचार केला आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये असं उत्पन्न होता कामा नये की 'अमक्या महापुरुषाची जयंती म्हणजे तमक्या समाजाने साजरी केली पाहिजे.' ही गोष्ट आपण मोडून काढली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आग्रहपूर्वक असं केलं पाहिजे की सर्व जयंती, पुण्यतिथी, उत्सवामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, मनापासून सहभागी झालं पाहिजे.
आज आणखीन एक आपल्याला गोष्ट करता येऊ शकते ती सहज गोष्ट करता येण्यासारखी अशी आहे की आज समाज म्हणून आपण दारिद्र्यरेषेच्या बरेच वरती आलो, दारिद्रय निर्मूलन करण्याच्या दिशेनं आपण खूप प्रगती केली. आपण पाच सहा महिन्यापूर्वीची आकडेवारी लक्षात घेऊ. आज या क्षणी भारतामध्ये ५ टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. या उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांची आठवण आमच्या मनामध्ये येते का? आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे. ही उपाशी पोटी झोपणारी माणसं आयुष्याचा संघर्ष करत असतात. समाजातील आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा सगळ्यांनी विचार असा केला पाहिजे की काही ना काही तरी मदतीचा हात आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं गरजूंना देऊ. त्यांना परावलंबी होण्याच्या दृष्टीनं मदत करू नये. त्यांना पायावरती उभा राहण्यासाठी, त्याला एखादा उद्योग करण्यासाठी, एखादा व्यवसाय करण्यासाठी, कदाचित त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याची सोय होण्यासाठी म्हणून आपण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी म्हणून त्याला जरूर मदत करूयात.
अजून एका नाजूक मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष मला वेधायचंय. ते म्हणजे कुणी कुणाशी विवाह करावा हा एक प्रथा आणि रूढीचा भाग आपण सोडून दिला तरी समाजामध्ये काही प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसतात. दुर्दैवानं साधारणपणे असं म्हणता येईल की अशा विवाहांकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो साधारणपणे नकारात्मक आहे. नम्रतेची विनंती अशी की अशा ठिकाणी जर आंतरजातीय विवाह होत असतील तर आपण त्यांना धीर दिला पाहिजे. 'सकल हिंदू हा अवघा बंधू' असं केवळ न म्हणता प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा हा योग आहे. अनेक महान व्यक्तींनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं आहे. मुद्दाम तुम्ही कोणाला भरीला पाडू नका, पण होत असेल तर त्याला आडवं येऊ नका, त्याच्या पाठीशी उभं राहा. हे करण्यामध्ये मनाची फार मोठी हिम्मत लागेल, मनाचं धैर्य लागेल, ते आपण सगळ्यांनी दाखवावं.
सामाजिक भेदभावाची समस्या ही इतकी जुनी आणि गुंतागुंतीची आहे की ती कधी संपेल हे निश्चित सांगता येणार नाही. पण या लेखात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करत राहिलो तर परिस्थिती लवकर बदलेल असे वाटते. हा धीराचा रस्ता आपण निश्चयपूर्वक चालत राहूया हे नम्र आवाहन!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

सामाजिक समरसता मुळातूनच समजावून घेणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. लेख खूपच छान आहे.
ReplyDelete