तंट्यामामा भिल्ल यांचे जीवन व कार्य
कोणत्याही सामान्य माणसाची इच्छा, ' आयुष्य साधे, सरळ थोड्याफार सुखात जावे' हीच असते. परंतु ज्या वेळेला परिस्थिती बिकट होते त्यावेळेला. हाच माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. कुणी लाचार होऊन परिस्थितीला शरण जातो. तर कोणी त्या परिस्थितीत स्वतःपुरता संघर्ष करून सुखी होतो. पण काहीजण परिस्थितीशी संघर्ष करून परिस्थिती बदलण्यासाठी धडपडतात. अशाच माणसांमध्ये तंट्यामामा भिल्ल यांचा समावेश केला पाहिजे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
१८४२ ते १८८९ असे ४७ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. सत्ता गाजवणारे इंग्रज तसे मूठभरच होते. परंतु दुर्दैवाने आपल्याच भारतीय लोकांनी त्यांना साथ दिली आणि इतर भारतीयांच्या होणाऱ्या शोषणात सहभाग घेतला. आजच्या मध्य प्रदेशातील 'निमाड' या वनक्षेत्रात याच प्रकारची परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या प्रथा परंपरा , गरिबांचे शोषण करणारे इंग्रज सरकार आणि या शोषणात इंग्रजांना साथ देणारे भारतीय सावकार, पोलीसातील भारतीय कर्मचारी या सगळ्यांनी मिळून जनजातींमध्ये जन्माला आलेल्या बांधवांचे जीवन अतिशय खडतर करून ठेवलेले होते.
तंट्यामामा भिल्ल यांच्या आजोबांनी काढलेले कर्ज फेडता आले नाही म्हणून त्यांचे वडील भाऊसिंग बिजासने यांना स्थलांतर करून पोखर या दुसऱ्या गावात जावे लागले. कधीकाळी जमीन मालक असलेल्याला शेतमजूर म्हणून काम करावे लागले. अशातच दुष्काळाचा इतका फटका बसला. पत्नी जीवनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्राण सोडला. मृत्यूपूर्वी आपल्या मुलाला, तंट्यामामाला, सांगितले की , "आपली मालकीची जमीन आपल्या बिरडा गावात आहे. तिथे जाऊन तू कष्ट करून आपली जमीन सोडवून घे."
वडिलांची ही शेवटची आज्ञा पाळण्यासाठी तंट्यामामा गावी परतले. जमीन गहाण ठेवून घेतलेल्या सावकाराने गोड गोड बोलून जमीन परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु हा केवळ कपटी कावा होता. यातूनच खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवले गेले. तुरुंगाची वारीदेखील घडली. पुन्हा दोनवेळा असेच प्रसंग घडल्यानंतर मात्र तंट्यामामांनी आपल्या बिजनिया या साथीदारासह खांडव्याच्या तुरुंगातून धाडसाने सुटका करून घेतली.
माणसात राहून अन्याय अत्याचार फसवणूक कपट याचाच अनुभव साध्या सरळ तंट्यामामाला आला होता. त्यामुळे जंगलात राहूनच पुढचे आयुष्य घालवायचे हा एकच पर्याय उरला होता. जंगलातील फळांवर , प्राण्यांवर किती दिवस भूक भागवणार? अगदी उपासमारीची वेळ आली. याच वेळी संधी चालून आल्यासारखे एका सावकाराच्या मुलाचे जंगलात आगमन झाले त्याला पकडून त्याच्या लबाड वडिलांकडून पैसे घेऊन त्याची सुटका केली. दुसऱ्या एका सावकाराच्या घरातील लग्नासाठी चाललेल्या मालगाडीवर धाड टाकून धान्याची व्यवस्था झाली. या घटनांतून यापुढे कसा मार्ग काढायचा याची दिशा जणू निश्चित झाली.
फसवणारे अनेक जण असले तरी माणुसकीच्या नात्याने सहृयतेने वागणारी मोजकी माणसेदेखील भेटत गेली. त्याच्यातील काही सावकारदेखील होते. त्यांनी पैशाची मदत केली. त्यातून शस्त्रे विकत आणली आणि सशस्त्र संघर्ष सुरू झाला. दारिद्र्य, अपमान अन्याय, उपासमार, अत्याचार या सगळ्यामुळे अंध:कारमय जीवन जगणाऱ्या जनजातीय बांधवांना जणू प्रकाशाचा नवीन स्रोत सापडला. या स्त्रोताकडे असेच अस्वस्थ असणारे, चवताळलेले, आपल्या भावंडांच्या भल्यासाठी काहीतरी करू इच्छिणारे तरुण हळूहळू आकर्षित होत गेले. तंट्यामामा यांच्या सहकाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
श्रीमंतांच्याकडून धन शस्त्राच्या आधारे धाक दाखवून घेऊन यायचे ही म्हटली तर दरोडेखोरी आहे. परंतु ज्यावेळी सर्वच बाजूंनी कोंडमारा होतो त्यावेळी 'मरता क्या न करता' अशा प्रकारची वृत्ती तयार होते. त्यातून माणूस अशा मार्गाला लागतो. तंट्यामामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचदेखील हेच झाले. ते केवळ वैयक्तिक अन्यायाच्या विरुद्ध लढत होते असे म्हणणे संपूर्णपणे चूक ठरेल. याचे कारण या सगळ्या दरोडेखोरीतून मिळालेल्या धनाचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखासाठी त्यांनी केला नाही. यातूनच गरजू माणसांना धान्याची , शेतीच्या अवजारांची, नांगरण्यासाठी बैल जोडीची , गाईगुरांची अशी वेगवेगळे प्रकारची मदत होऊ लागली. ही मदत विचारपूर्वक केली गेली होती. कारण अशा सगळ्या गरजांसाठी सावकाराकडून व्याजाने पैसे उचलणे म्हणजे गरिबीत शिरण्याचा सापळाच होता. या सापळ्यात आपली भावंडे अडकणार नाहीत याची घेतलेली ही दक्षता होती. यातून या लुटी मागचा विचार लक्षात येतो.
अजून एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे लग्नकार्याबाबतची. माणूस गरीब असो वा श्रीमंत , आपल्या मुलीचे लग्न आपल्या ऐपतीप्रमाणे शक्य तेवढ्या धामधुमीत करण्याचा प्रत्येक वधूपित्याचा प्रयत्न असतो. त्या काळात निमाड भागात होणाऱ्या अशा गरिबाघरच्या लग्नांमध्ये भरजरी कपड्यांची, प्रसंगी दागिन्यांची भेट वधूच्या या मानलेल्या मामाकडून न चुकता जात होती. अशा भेटीला त्या भागात 'मामेरा' म्हणतात. त्यामुळे सगळीकडे तंट्यामामा हेच नाव रूढ झाले.
तंट्यामामा यांचा संघर्ष एका पोलादी, धूर्त, सर्वत्र पसरलेल्या यंत्रणेशी होता. परंतु या संघर्षा मागचा उदात्त हेतू जवळपास सर्वांनाच समजला होता. त्यामुळे बहुतेक जण तंट्यामामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्य ती मदत करत होते. या मदतीमुळे पोलिसांच्या हालचालींची, त्यांच्या आगामी योजनांची कल्पना तंट्यामामा यांना मिळत होती. त्यामुळे कितीही कुशलपणे आखलेले हे सर्व बेत धुळीला मिळत होते. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे मारण्याची, हूल देण्याची पद्धतदेखील तंट्यामामा यांनी अवलंबली. हंसबरा या गावात पोलिसीवेश घेऊन छापा मारला. या पद्धतींमुळे स्थानिक पोलीस अपयशी ठरले. त्यामुळे राजधानीतून अधिकारी पाठवण्यात आले. नंतर नंतर तर 'तंट्या दल' या नावाचे स्वतंत्र पोलिस दल उभारण्यात आले.
रूढार्थाने शिक्षण न घेतलेल्या तंट्यामामा यांच्याकडे अंगभूत चतुराई मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे जेमतेम साडेपाच फूट उंची किरकोळ अंगकाठी असलेले तंट्यामामा हे पोलिसांच्या हाती सापडत नव्हते. बर गोष्टी एवढ्यावरतीच थांबल्या नव्हत्या तर आपल्याला पकडण्याचा विडा उचलून मुंबईवरून आलेल्या इंग्रज अधिकाऱ्याला आणि बिजनियाला पकडणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकारी शेर अली याला बेमालून वेशांतर करून वेगवेगळ्या प्रसंगी जंगलात भुलवून आणले. अगदी त्यांचा जीव जाण्याची पाळी आली. परंतु केवळ कपडे काढून उघड्यावर पाठवण्यामध्ये तंट्यामामा यांनी समाधान मानले. कपड्यांबरोबर अब्रूदेखील गेली. आपल्या वेशांतराची चुणूक तंट्यामामा यांनी अजून एका पोलीस अधिकाऱ्याला दाखविली. घाटाखेडीचे संस्थांनिक तख्तसिंग हे तंट्यामामा यांना सहानुभूती दाखवतात असे ठरवून त्यांना पंधाना येथील पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी नाभिकाच्या रूपात जाऊन तंट्या मामा यांनी त्या अधिकाऱ्याचे नाकच कापले.
तंट्यामामा यांनी उभारलेला हा संघर्षाचा लढा त्यांना काही वैयक्तिक सूड उगवण्याचे समाधानदेखील देऊन गेला. कपटाने तंट्यामामांवर खोटे गुन्हे दाखल करणारा हिंमत पाटील तंट्या मामा यांनी टाकलेल्या छाप्याच्यावेळी पळून जाताना तंट्यामामाच्या बिजनिया या साथीदाराच्या गोळीने जबर जखमी झाला आणि दुसऱ्या दिवशी मरण पावला. तंट्या मामा यांच्या पत्नीची मैत्रीण यशोदा आणि तंट्यामामा यांच्याबद्दल वावड्या उठवणाऱ्या महिलेचे नाक तंट्यामामांनी कापले आणि तिला धडा शिकवला. या दोघांच्याबद्दल घाणेरडी चर्चा करणाऱ्या लोकांच्या म्हशींचे कान कापले. अशी वैयक्तिक सूड भावनेचे प्रदर्शन करणारी काही मोजकी उदाहरणे वगळली तर तंट्यामामा यांचा एकूण संघर्ष हा जुलूम , अन्याय , शोषण यांच्या विरोधात होता असे निश्चितपणे म्हणता येईल. १८७८ ते १८८९ अशी जवळपास अकरा बारा वर्षे हा संघर्ष यशस्वीपणे चालू राहिला.
पण हिम्मत पाटील यांच्यावर गोळी झाडणारा साथीदार फितुरीने पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. पण तंट्यामामा हे पोलिसांना सापडत नव्हते. अशावेळी पोलिसांनी बक्षीसाचे आणि पोलिसातील नोकरीचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलला तो तंट्यामामा यांच्या मानलेल्या बहिणीचा नवरा बाणेर, खरगोन येथील गणपतसिंह राजपूत. राखी पौर्णिमेच्यानिमित्ताने घरी आलेल्या तंट्यामामांच्या येण्याची खबर त्याने पोलिसांना दिली आणि ११ ऑगस्ट १८८९ यादिवशी पोलिसांनी डाव साधला. वर्षानुवर्षे न पकडले गेलेले पण तंट्यामामा कैद झाले.
इंग्रजांनी न्यायदानाचे नाटक केले. ज्या हिमंत पाटील यांच्या खुनाच्या गुन्ह्याबद्दल आधीच तंट्यामामाच्या बिजनिया या साथीदाराला फाशी देण्यात आले होते त्याचबद्दल तंट्यामामा यांना फाशीची शिक्षा दिली. नागपूरमधील वकिलांनी याविरुद्ध याचिका दाखल केली. परंतु तिची वासलात लावण्यात आली. चार डिसेंबर १८८९ या दिवशी पण तंट्यामामा यांना फाशी देण्यात आले.
परिस्थितीने वळण दिलेले आयुष्य तंट्यामामा यांनी ज्या तेजस्वीपणे जगले ते आयुष्य अन्याय, अत्याचार याविरुद्ध संघर्षरत्न राहण्याची प्रेरणा देणारे आहे. केवळा एखाददुसऱ्यावरचा अन्याय दूर करून भागणार नाही तर एकूणच परिस्थिती बदलली पाहिजे, सामाजिक न्याय दिला गेला पाहिजे असा संदेश देणारे आहे. या जनजातीय वीराला त्रिवार प्रणाम!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा . त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

तंट्यामामा भिल्ल यांचे संघर्षमय जीवन कसे होते व संघर्षातून सामाजिक न्याय त्यांनी कसा दिला आहे या लेखांतून दिसते....खूप धन्यवाद सर
ReplyDeleteसर नमस्कार
Delete