आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी
मार्च १९८८ मध्ये मी १० वीची परीक्षा दिली. त्याचा निकाल जून १९८८ मध्ये बहुतेक १४ जूनला लागला. आता पुढे कुठे प्रवेश घ्यायचा याची चर्चा सुरू झाली. पुण्यात स.प.महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असे ठरले. पण यात दोन तीन दिवस गेले. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळाला नाही. पुण्यात तेव्हा ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये अर्ज केला आणि स.प. महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
वसतिगृहात राहायचे होते. तिथेही प्रवेश मिळाला. मग निघण्याची तयारी सुरू झाली. मला वसतिगृहावर सोडायला काका श्री बाळासाहेब गाडे आले होते. मला खोली क्रमांक १३ देण्यात आली. पहिल्या दिवशी काकादेखील मुक्कामी राहिले. ते दुसऱ्या दिवशी गेले. बहुतेक त्याच दिवशी थोड्या वेळाने बारावीत असलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने खोलीचे दार वाजवले. त्याने विचारले, " तुझं नाव काय? तुला १० वीला किती टक्के मिळालेत?" "सुधीर गाडे. ८६%" मी उत्तर दिले. " हा माझ्या करमाळा गावचा वीरेंद्र घोगरे. यालाही ८६% मिळालेत. तुम्ही एकत्र राहा. तुमचं जमेल!" या १२ वीतल्या मुलाचं नाव कळालं, "वैभव मेहता." अशा रीतीने माझं वसतिगृहात राहणं सुरू झालं. त्याच्या पुढच्या वर्षी चर्चा करून विजय साठे आणि मी खोली क्रमांक ४६ मध्ये राहिलो.
१९८७ -८८ मध्ये दूरदर्शनवर 'चुनौती' नावाची एक मालिका लागायची. त्यात महाविद्यालयात मुलांवर रॅगिंग कसं होतं असे काही प्रसंग होते. त्यामुळे महाविद्यालयात आल्यावर असं कधी कधी वाटायचं की आपल्यावरही रॅगिंग होईल की काय ? परंतु दोनदा वर्षात असा कोणताही अनुभव आला नाही
१९८८ ते १९९० ही अकरावी बारावीची दोन वर्षे स.प.वसतिगृहात ही राहिलो. या काळातल्या आठवणी आनंद देऊन जातात
वसतिगृहात सुरुवातीला राहायला आलो तेव्हा घरची सारखी आठवण यायची. स्वारगेटवरून रोज सायंकाळी सहा वाजता आमच्या साखरवाडी गावी जाणारी एसटी सुटायची. सुरुवातीला जवळपास महिनाभर रोज सायंकाळी पाचच्या सुमाराला असं वाटायचं की भरावी बॅग आणि निघावी. तीन तासांतच पोचू घरी. पण हा झगडा मनात चालू असला तरी मी वसतिगृहात राहायला आल्यावर पहिल्यांदा घरी गेलो ते गणपतीच्या दिवसांतच.
( २९/११/२०२५ स्नेहमेळावा )
पण हळूहळू सर्वांच्या ओळखी वाढत गेल्या आणि ही हुरहूर कमी झाली. वसतिगृहात मी चांगला रुळलो. या दोन वर्षांतील मेसचं जेवण, आधी जेवत असलेल्याच्या टेबलवर चावी ठेवून लावलेला नंबर,एके रविवारी पैज लावून खाल्लेले ५० गुलाबजाम, क्वचित बादशाहीत केलेले जेवण, रविवारी सायंकाळी मेस बंद म्हणून खाल्लेली कल्पना भेळ, सकाळी टॉवेल गुंडाळून आंघोळीसाठी शेजारच्या स्नानगृहात जाणे, बाथरूमच्या दारावर चावी ठेवून लावलेला नंबर, कॅंटिनचा चहा, अंबिका अमृततुल्यचा चहा, अनेक रात्री उशिरापर्यंत जागून केलेल्या चर्चा, क्वचित झालेले वादविवाद, आवारात खेळलेली रिंग, पुण्यात केलेली भटकंती, होस्टेल डेचे कार्यक्रम, खानदेशी विद्यार्थ्यांकडून पहिल्यांदाच ऐकलेली अहिराणी भाषा, क्वचित रेक्टर देवकुळे सरांचा खाल्लेला ओरडा, अनेक दिवस लिहिलेली डायरी, एकदा रात्री खोलीच्या खिडकीतून मैदानाकडे बघत गजराच्या घड्याळाला चावी देत असताना चाहूल न देता नितीन शाह शेजारी येऊन उभा राहिला त्यावेळी दचकून उडालेली घाबरगुंडी, यांसारख्या अनेक आठवणी अधूनमधून मनात पिंगा घालतात.
या काळातला एक वेगळा अनुभव म्हणजे मी आणि संतोष देशपांडे बालगंधर्व रंगमंदिरात 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा रात्रीचा प्रयोग पहायला गेलो होतो. त्या प्रयोगाला काही परदेशी माणसं आली होती. आपण जाऊन त्यांच्याशी बोलायचं का नाही अशी थोडावेळ आमची चर्चा झाली. पण आम्ही थोडं धाडस करून त्यांच्याशी तोडकंमोडक्या इंग्लिशमध्ये बोललो. हे त्यावेळी भारी वाटलं होतं.
या दोन वर्षांत मी स्वावलंबी झालो. घरापासून दूर राहण्याची मनाला सवय झाली. या काळातली मैत्री पुढेही टिकली. या सगळ्याचा पुढेही उपयोग झाला. गेली २१ वर्षे पुण्यात म.ए.सो. गरवारे महाविद्यालयाचा वसतिगृहप्रमुख म्हणून मी काम करतो. हे काम करत असताना या आठवणींना उजाळा मिळतो. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना मी समजू शकतो.
स.प.वसतिगृहातील ही दोन वर्षे मला नेहमीच आनंद देऊन जातात.
सुधीर गाडे पुणे
( २९/११/२०२५ च्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रकाशित 'सवंगडी' या स्मरणिकेत लिहिलेला लेख )
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )


समृद्ध आठवणींची शिदोरी... सुंदर लेखन
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteसुंदर लेखन केले आहे सर .....लेख वाचत असताना मला माझ्या पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या आठवणीला उजाळा मिळत गेला .....🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏
Deleteखूप छान सर.... प्रत्येकाच्या मनात कायम दरवळणारा आठवणीचा कप्पा..
ReplyDeleteहोय सर. धन्यवाद
ReplyDelete