कर्तव्यपूर्ती

                                   कथा

            दिवस मावळतीला चालला होता. हळूहळू अंधार वाढत चालला होता आपल्या कुटीमध्ये बसलेल्या मेधानंदाना आता दिवा लावावा याची जाणीव झाली. परंतु मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून गेले होते. आज आपल्या हातून कर्तव्याची पूर्ती झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. यापूर्वी कधी न अनुभवलेले समाधान ते अनुभवीत होते. त्यामुळे अगदी निश्चल अवस्थेत ते बसून राहिले.


               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

     किती काळ गेला हे सांगता येत नव्हते. पण थोड्यावेळात कुटीच्या दरवाजात दिवा घेऊन वल्लरी आली. दिव्याच्या मंद तेजामध्ये तिचा चेहरा उजळला होता. दिवा घेऊन ती आतमध्ये प्रवेश करती झाली. याची जाणीवदेखील मेधानंद यांना झाली नाही. ती देखील अद्भुत दृश्य पहावे अशा भावनेने पाहू लागल. एकदम निश्चल बसलेल्या मेधानंद यांनी आपले नेत्र मिटले होते. प्रकाशाची जणू जादू होऊन त्यांचा चेहरा सोन्यापेक्षा लख्ख उजळलेला होता. रोज भेट होत असून देखील या प्रकारचे भाव यापूर्वी कधीही पाहिले नाही. असे तिच्या लक्षात आले. आपल्या हालचालीने अथवा नकळत झालेल्या आवाजाने या निस्तब्ध चित्राचा भंग होऊन त्यातील आनंद, समाधान लोप पावू नये या भावनेने वल्लरीदेखील बराच काळ शांत राहिली.

         अजून काही काळ गेला आणि मेधानंद यांनी आपले डोळे उघडले. समोर वल्लरीला पाहून ते अतीव आनंदाने म्हणाले, " वल्लरी, गुरुंची आज्ञेने आरंभलेले कार्य आज पूर्ण झाले. ग्रंथ सिद्ध झाला. " हे शब्द ऐकताच वल्लरीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पण क्षणार्धात तिचं काळीज हललं. पुढे उभे असलेल्या प्रसंगाच्या कल्पनेने तिचा चेहरा हळूहळू काळवंडला. पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, " खरंच आज आनंदाचा दिवस आहे. गुरुंची आज्ञा पूर्ण करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं. या कार्याच्या पूर्ततेसाठी सहाय्यक होण्याचं भाग्य माझ्या पदरी पडले. आपण दोघेही आज कृतार्थ झालो."  " होय वल्लरी खरं आहे तुझं. अनेक जन्मांचं पुण्य आपल्या गाठीला होतं म्हणूनच हे कार्य आपण पूर्ण करू शकलो. गुरु ज्ञानसागर यांचे चरित्र आणि त्यांच्या साधनामार्गाचं वर्णन करणारा हा ग्रंथ आज पूर्ण झाला. या ग्रंथाच्या वाचनाने अनेक साधक मोक्षमार्गावर पुढे जातील. त्यांच्या जीविताचे कल्याण होईल हे गुरुदेवांचे शब्द आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. " मेधानंदांच्या स्वरांमधून समाधान ओसंडून वाहत होतं. 

            त्याच समाधानी स्वरात मेधानंद पुढे बोलू लागले. " वल्लरी , हे लेखनकार्य पूर्ण होईपर्यंतच आपला सहवास होता. आता गुरुदेव ज्ञानसागर यांच्या आज्ञेनुसार आपले मार्ग वेगळे होणार आहेत. लक्षात आहे ना?" काही क्षण शांततेत गेले. अगदी जड आवाजात वल्लरी बोलू लागली, " होय, गुरुबंधू! गुरुंची आज्ञा माझ्या अंतःकरणावर कोरली गेली आहे. ग्रंथनिर्मिती ही तुमची इतिकर्तव्यता आहे. आता गुरुंच्या आज्ञेने तुम्हाला देहत्याग करावा लागणार आहे आणि मला मात्र ग्रंथप्रसारासाठी नागरजनांकडे परत जावं लागणार आहे."

            वल्लरीच्या स्वरांना दु:खाची झालर होती. भावनांनी भिजलेले तिचे शब्द मेधानंदांच्या कानावर पडले‌. तिच्या दु:खी स्वरांची मेधानंद यांना जाणीव झाली ‌. ते बोलू लागले, " माझे हे देहवसन गुरुंच्या कार्यार्थ धारण केले होते. आता कार्य पूर्ण झाले. तेव्हा या वसनाची आवश्यकता नाही. हे टाकून दिले पाहिजे. याने दु:खी होण्याचे कारण नाही. तू दु:खी होऊ नकोस. कर्तव्यमार्गावर आपल्या वाटा आता वेगळ्या होत आहेत. गुरुंच्या देहत्यागाला बराच काळ लोटला आहे. जनमानसातील त्यांच्या स्मृती क्षीण झाल्या आहेत. पण हा ग्रंथ त्या स्मृती चिरंतन ठेवील. तुला धैर्याने मार्गक्रमण करावे लागेल. कदाचित तुझी कार्यसिद्धी व्हायला बराच काळ लागेल. पण गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेव. कार्यात खंड पडू देऊ नको. विचलित होऊ नकोस. कार्यसिद्धी होणारच आहे. आजपासून सात दिवसांनी पौर्णिमा आहे. त्यादिवशी मी जलसमाधी घेऊन हा देह विसर्जित करून टाकणार आहे. गुरुंच्या आज्ञेनुसार तू मात्र नागरजनांकडे परत जा. गुरुंच्या आज्ञेनुसार तुझे कार्य सुरू ठेव. हीच आपल्या दोघांची कर्तव्यपूर्ती!"


सुधीर गाडे पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

उत्तराखंड सहलीतील अनुभव

गुजरात सहल