पांडुरंगाला राखी

                           कथा

          गोविंद नेहमीसारखा आनंदाने कार्यालयात शिरला. प्रत्यक्ष पांडुरंगांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे याचा त्याला फार आनंद झाला होता. तसे फार दिवस झाले नव्हते. नोकरी सुरू होऊन दोन तीनच महिने  झाले होते. पण पांडुरंग देवस्थानात नोकरी करायला मिळताना गोविंद थोडासा खट्टू झाला होता. गाभाऱ्याजवळ नोकरी असावी ही त्याची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे कामावर असताना 'सावळे सुंदर रूप मनोहर' असणाऱ्या विठ्ठलाचे सदोदित दर्शन घडत राहावे ही त्याची मनोमन इच्छा होती. पण हरकत नाही. देवाची सेवा तर घडतीय असं म्हणत त्यानं आपलं समाधान करून घेतलं होतं. कामावर आल्यानंतर आणि घरी परतताना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हा परिपाठ तो आचरू लागला.

             

                ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

       देवस्थानच्या कार्यालयात राहून पत्रव्यवहार पाहणे हे त्याच्या कामाचं स्वरूप होतं. तसंही आजकाल पत्र कोण पाठवतं म्हणा‌. त्यामुळे पत्रव्यवहार तसा कमी होता. सरकारी सूचना, अभिषेकाच्यासंबंधीचा पत्रव्यवहार, भक्तांच्या घरातील लग्नकार्याच्या पत्रिका अशीच पत्रे साधारण रोज असत. त्याला उत्तर द्यायची पद्धत ठरलेली होती. उत्तर पाठवण्याचा मजकूर ठरलेला असायचा. फक्त नाव, पत्ता, दिनांक एवढा तपशील व्यवस्थित लिहिला की झालं. त्यामुळे कामाचा तसा तगादा नव्हता. रुजू झाल्यानंतर अगदी आठ पंधरा दिवसांतच गोविंदला कामाचा आवाका आला. तो कामही अगदी मनापासूनच करायचा. पांडुरंगांची प्रत्यक्ष सेवाच ती! त्यात हयगय होणं त्याच्याकडून शक्य नव्हतं.

   त्यादिवशीदेखील गोविंद आनंदाने कामाला लागला होता. आषाढ नुकताच संपून गेला होता. आषाढी वारीची अलोट गर्दी आधीच ओसरली होती. पण भक्तांची रीघ चालूच होती. 'रामकृष्ण हरी पांडुरंग हरी' असं नामस्मरण करत त्यानं आजचं टपाल बघायला सुरुवात केली. नेहमीसारखीच पत्र होती. ती बघता बघता एक पाकिट हातात आलं.‌ थोडंसं फुगीर होतं. वरती पत्ता लिहिलेलं अक्षर अगदी शाळेत जाऊन नुकतंच लिहायला सुरुवात केलेल्या मुलानं लिहिल्यासारखं वाटत होतं.

      गोविंदने छोट्या कात्रीने काळजीपूर्वक पाकिट कापलं. बोटांनी आतला कागद बाहेर काढायला सुरुवात केली तर तांदळाचे दोनचार दाणे बाहेर पडले. गोविंदने अजूनच काळजीपूर्वक आतल्या गोष्टी बाहेर काढल्या. तर त्यात दोन छोट्या, पुड्या , एक चिठ्ठी आणि एक राखी बाहेर पडली. राखी बघून गोविंदला आश्चर्य वाटले. कारण आतापर्यंत देवासाठी राखी असलेले पत्र त्यानं पाहिलंच नव्हतं. दोन पुड्यांमध्ये चिमूट चिमूट हळदकुंकू होतं. थोडे तांदूळही होते.
           काय लिहिले असेल असा विचार करत गोविंदने चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली होती. " श्री पांडुरंगा,
शिरसाष्टांग नमस्कार!
      देवा इतक्या वर्षांत यंदाच वारी चुकली. माझ्या मोहनदादालाही तू बोलावून घेतलंस. आता तूच माझा भाऊ! ही राखी गोड मानून घे.

        तुझी बहीण,
     चंद्रभागा"

       चिठ्ठी वाचून गोविंद बुचकळ्यात पडला. पांडुरंगाला ज्ञानोबांनी माऊली म्हटलं, जनाबाईंनी सखा म्हटलं, भक्तांनी परमेश्वर म्हटलं हे त्याला माहीत होतं. पण भाऊ म्हटल्याचं त्यानं पहिल्यांदाच वाचलं होतं. आता काय करावं , कुणाला विचारावं असा त्याला प्रश्न पडला.
      या प्रश्नाचं उत्तर लगेच त्याच्या मनात उमटलं. माधवकाकांनाच विचारायला हवं. माधवकाका त्याच कार्यालयात काम करत होते. जवळपास तीस बत्तीस वर्षे ते तिथं काम करत होते. आता निवृत्तीकडे झुकलेले माधवकाका पांडुरंगाचे निस्सीम भक्त. दररोजचा हरीपाठ कधी चुकला नाही. ज्ञानेश्वरी, गाथा यांची पारायणं तर ते वरचेवर करीत. माधवकाकांच्या बोलण्यात मार्दव असे. वागण्यातही आदब असे. तेच सांगू शकतील असं गोविदला वाटलं.

        गोविंदने लगेच कार्यालयात सोबत काम करणाऱ्या माधवकाकांजवळ जाऊन त्यांना सगळं सांगितलं. "आता काय करायचं?" माधवकाका म्हणाले, "अरे गोविंद, पांडुरंग सगळीकडे आहे. या माऊलीनं भावाच्या रुपात त्याला बघितलं. म्हणतात ना 'जसा भाव तसा देव'. हेच खरं . आता ही राखी पौर्णिमेला पांडुरंगाच्या चरणी ठेवायला सांगू. तूच आता चंद्रभागाबाईंना पत्र लिही. राखी पोचली म्हणावं. प्रसादही पाठव!"

सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

गुजरात सहल

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी