आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य

      नाचविता ध्वज तुझा गुंतले शृखंलेत हात

      बद्ध करांनी तुज करिती अखेरचा प्रणिपात

कवीवर्य कुसमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध 'गर्जा जयजयकार ' या कवितेतीतील या ओळी आद्यक्रांतिवीर ४ नोव्हेंबर १८४५ यादिवशी जन्मलेल्या आणि १७ फेब्रुवारी १८८३ यादिवशी मृत्यू पावलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाला शब्दशः लागू पडतात. आपला अखेरचा श्वास भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एडन येथील कारागृहात घेताना त्यांनी भारतमातेला विनम्र भावाने प्रणाम केला ही गोष्ट अक्षरशः खरी आहे.


                          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

         धूर्त इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येऊन आपले बस्तान बसवले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. पारतंत्र्याच्या दीर्घ काळरात्रीची सुरुवात झाली. इंग्रजी राज्य आपल्यासोबत प्रामुख्याने इंग्रजी राज्य स्थिर राहावे यासाठी विविध आधुनिक सुधारणा घेऊन आले. भारतात प्रचलित असलेल्या दुष्ट रुढी परंपरा यांनादेखील या राज्याने हादरवून सोडले. काही परंपरा बंद पाडल्या गेल्या. समाजाचे अभिसरण नवीन वेगळ्या पद्धतीने सुरू झाले. परंतु इंग्रजी राजवट हा आपल्यावरील गुलामीचा घाला आहे. तो उलथवून टाकण्यासाठी १८५७ मध्ये एक संघटित प्रयत्न भारतात अनेक ठिकाणी झाला. पण हा प्रयत्न अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरला. इंग्रजी सत्ता जणू अढळ झाली. तिला सशस्त्र संघर्षाद्वारे आव्हान देण्याचे प्रयत्न एकाकी होते. परंतु वासुदेव बळवंत फडके यांचे वैशिष्ट्य असे की हा प्रयत्न त्यांनी व्यापक प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला. 

         वासुदेव बळवंत फडके यांच्या आयुष्यात हे विचार क्रमाक्रमाने विकसित होत गेल्याचे दिसते. आपल्या आईच्या अखेरपणाच्या आजारात रजा मिळाली नाही हे कारण ठिणगी पेटवणारे ठरले. या जुलुमाने त्यांच्यातील क्रांतीचा वन्ही चेतवला गेला. त्यामुळे इंग्रजी राज्य हे 'देवाचे वरदान' नसून ती एक सर्वंकष दमनकारी, लुटारू राज्यव्यवस्था आहे याचे त्यांना आकलन झाले. १८७० च्या दशकात पडलेल्या तीव्र दुष्काळातील इंग्रजी राजवटीचा जुलमी चेहरा हा वासुदेव बळवंत फडके यांनी अनुभवला. त्याविरुद्ध जनजागृती करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. इंग्रज व्यापाराद्वारे भारताची लूट करतात हे लक्षात घेऊन त्यांनी स्वदेशी मालाला प्रोत्साहन मिळावे यासाठीही प्रयत्न केले.

         वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य शिक्षणक्षेत्रातही होते. व्यक्ती समर्थ होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या दोन शिक्षकांच्या सोबतीने 'पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन'( आताची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) ही संस्था स्थापन केली. उमलत्या मनांवर संस्कार करण्याचे कार्य सुरू केले.  पुढे भावे आणि इंदापूरकर हे दोघेही शिक्षणासाठीच कार्यरत राहिले. पण वासुदेव बळवंत फडके मात्र क्रांतिकार्याच्या वाटेने गेले. 

       वासुदेव बळवंत फडके यांचा जीवनकाळ हा जातीभेदाचा अनुभव देणारा , स्त्रियांवरील विविध बंधने चालू ठेवणारा काळ होता. वासुदेव बळवंत फडके यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी या दोनही गोष्टींमध्ये क्रांतिकारक वृत्तीने आचरण केले. आपल्या पत्नी गोपिकाबाई यांना त्यांनी बंदूक चालवण्याचे शिक्षण दिले. क्रांतिकार्य करताना त्यांनी समाजातील वंचित वर्गातील लोकांना सोबत घेऊन लढा उभारला. ह्या लढ्याला सत्पुरुषांचे आशीर्वाद असावे या भावनेतून त्यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज यांची वेगवेगळ्या प्रसंगी भेट घेतली. या दोन्ही सत्पुरुषांनी 'काळ अनुकूल नाही. यश मिळणार नाही.' असे सांगितले. पण हृदयात प्रज्वलित झालेली स्वातंत्र्याच्या आकांक्षेची ज्वाला या वचनांनी विझली नाही की मंदावलीदेखील नाही. आपले प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले.‌ गोरगरीबांना फसवून त्यांचे धन लुबाडणाऱ्यांकडून त्यांनी क्रांतिकार्यासाठी धन जमवले. तर हैदराबादच्या निजामाच्या हद्दीत जाऊन शस्त्रे मिळवली. 

          इंग्रजांच्या राज्ययंत्रणेची विशालता, वासुदेव बळवंत फडके यांच्याजवळ असलेली तुटपुंजी सामुग्री हा विषम सामना होता. पण जिद्द मात्र विलक्षण होती. वासुदेव बळवंत फडके यांना पकडून देणाऱ्यांना इंग्रजांनी इनाम जाहीर केले. तर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजी गव्हर्नरला पकडून देणाऱ्याला इनाम जाहीर केले. जिद्द मोठी असली तरी या संग्रामात साधनसामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारावर कोण विजयी होणार हे तसे निश्चित होते‌. घडलेही तसेच. पण घात केला तो स्वकीयांनीच. वेश बदलून गाणगापुरात राहणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांची बातमी भारतीयांनीच इंग्रजांना पुरवली. फडके यांना अटक झाली. खटला चालवल्याचा देखावा करण्यात आला. दोषी ठरवण्यात आले. दूरवर एडनला रवानगी झाली. तिथूनही सुटण्याचा प्रयत्न फडके यांनी केला. पण तो अयशस्वी ठरला. या प्रयत्नात पाय मोडला. दुखापत झाली. अखेर जवळ आली हे ओळखून उपचार करणाऱ्या डॉ.‌बर्वे यांना वासुदेव बळवंत फडके यांनी "आपल्या मृतदेहावर सोबत आणलेली भारताची माती टाका म्हणजे मातृभूमीच्या कुशीत गेल्याचे समाधान लाभेल." असे सांगितले.

          वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतिकार्य अयशस्वी ठरले असले तरी त्या कार्याने पुढे अनेकांना क्रांतिकार्याची प्रेरणा दिली.

               सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते

               उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते

या ओळी खऱ्या ठरल्या.

 भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारकांचे योगदानही मोलाचे आहे. वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

उत्तराखंड सहलीतील अनुभव

गुजरात सहल