उत्सवाची परंपरा पुढच्या पिढीकडे
आपल्या प्राचीन देशामध्ये सण, उत्सव यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. यात वेगवेगळ्या टप्प्यांवर नवनवीन उत्सवांंची भर पडत गेली आहे. उत्सव सुरू होण्याच्या पाठीमागे धार्मिक , खगोलीय किंवा पर्यावरणीय कारणे आहे हे लक्षात येते. यातील बरेचसे उत्सव हे समाज एकत्र येऊन सुरू होतात. काही उत्सव एखाद्या व्यक्तिच्या पुढाकाराने सुरू होतात. असे सुरू झालेले पुढे कसे चालत राहतात हे समजून घेणे उद्बोधक वाटते.
श्री. नारायण उर्फ उल्हास भिकाजी भाटेकाका पुण्यात पेरुगेटजवळ राहायचे. १९८६ मध्ये ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर इथं राहायला गेले. भाटेकाकांनी एसकेएफ या कंपनीत अनेक वर्षे नोकरी केली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त आहेत. त्या भक्तितून घरात दर बुधवारी सत्संग सुरू केला. हळूहळू या सत्संगाला भक्तांची गर्दी वाढत गेली. भाटेकाकांनी याला जोड दिली ती स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या उत्सवाची. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस हा स्वामींचा प्रकटदिन. या निमित्ताने आपल्या घरी हा उत्सव साजरा करायला भाटेकाकांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ह्या उत्सवाला लोकाश्रय लाभला. भाटेकाकांनी वयोमानानुसार बुधवारचा सत्संग काही महिन्यांपूर्वी बंद केला. पण उत्सवाची परंपरा चालू आहे. सकाळी घरात लघुरुद्र आणि स्वामींना अभिषेक होतो. दिवसभर भाविकांना दर्शन आणि प्रसादाचे निमंत्रण असते. भाटेकाकांचे चिरंजीव श्री. समीर आणि सौ. मानसी हेदेखील श्रद्धेने ह्या उत्सवाच्या आयोजनात सहभागी होत असतात.
( डॉ.धनश्री लेले यांचे प्रवचन २०२५, दोन्ही छायाचित्रे श्री. श्रीपाद इनामदार यांच्या सौजन्याने)
असाच दुसरा उत्सव रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीला होतो. पन्नास वर्षांपूर्वी १९७६ मध्ये कै. सुभाषराव इनामदार यांनी हा उत्सव सुरू केला. यशस्वी व्यावसायिक असणारे सुभाषराव संघाचे स्वयंसेवक होते. ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पाइपिंग या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो जणांना प्लंबिंगचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. सुभाषरावांनी सुरू केलेल्या उत्सवात रामजन्माची पूजा दुपारी घरी होते. सुभाषरावांनी याला सामाजिक जाणीवेतून प्रबोधनाची जोड दिली. रामनवमीच्या दिवशी सायंकाळी धार्मिक, सामाजिक विषयांवर व्याख्यान, प्रवचन यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन होत असते. पुण्यात नळस्टॉपजवळील पांडुरंग कॉलनीतील हा उत्सव आता परिसाराचा उत्सव झाला आहे. प्रबोधन ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. काही वर्षांपूर्वी सुभाषरावांचे निधन झाले. त्यानंतर ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्री. श्रीपाद आणि श्री. विजय आपल्या परिवाराच्या सर्व सदस्यांसह पार पाडतात. हे या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यावर्षीच्या उत्सवाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
( कावडीचा काही वर्षांपूर्वीचे छायाचित्र श्री. शेखर कुमठेकर यांच्या फेसबुक वॉलवरून)
तिसरा उत्सव हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीचा म्हणजे चैत्र पौर्णिमेचा. कै. लक्ष्मणराव आपटे यांनी साखरवाडीला १९३३-३४ मध्ये साखर कारखाना सुरू केला. आमचे आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे हे त्यांच्या आधीच्या पिढीचे गाव मु.बिबी, ता. फलटण जि. सातारा येथून साखर कारखाना सुरू झाल्यावर साखरवाडीत आले. तिथे किराणा मालाच्या व्यापारात त्यांचा चांगला जम बसला. साधुपुरुषांच्या संगतीची ओढ त्यांच्या मनात होती. त्या ओढीतूनच त्यांनी एकदा संत गाडगेबाबांना कीर्तनासाठी साखरवाडीत निमंत्रण दिले होते. दरवर्षी चैत्र महिन्यात सासवडजवळील खळद या गावाहून संत तेली भुतोजी महाराज यांनी सुमारे ३५० ४०० वर्षांपूर्वी सुरू केलेली कावड शिखर शिंगणापूरला जात असते. मुंगी घाटातून ही महाकाय कावड वर नेण्याचा प्रसंग थरारक असतो. ही कावड आणि सोबतची भक्तमंडळी परतताना चैत्र पौर्णिमेला साखरवाडीत मुक्कामाला असतात. या सगळ्यांना भोजन देण्याची परंपरा आमच्या आजोबांनी सुरू केली. भारतात भोजन देणं हे अन्नदान आहे असं मानलं जातं. हे पुण्याचं काम समजलं जातं. तसंच जेवणाऱ्यालाही कर्तव्यबोध करून देणारी 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ' ही शिकवणदेखील आहे. शिखर शिंगणापूरवरून परतणाऱ्या कावडीसोबतच्या भक्तमंडळींच्या भोजनाची हीच अन्नदानाची परंपरा आमच्या आजोबांनी वैयक्तिक पातळीवर सुरू केली. आजोबांनी सुरू केलेली ही परंपरा आता तिसऱ्या पिढीकडूनही जपली जात आहे.
या परंपरा जपणं हा पुढील पिढ्यांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा भाग आहे. हे उत्सव जपले जाणे हा आध्यत्मिक संचिताचा एक भाग आहे. तसेच समाजाच्या सांस्कृतिक, वैचारिक अभिसरणाचे आणि जडणघडणीचे माध्यमदेखील आहे. भारताची हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा यातून जपली जाते आहे.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )




Comments
Post a Comment