छ. शिवराय: ध्येयरूप जीवन

           छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल किती बोलावे आणि किती लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांचे जीवन उत्तुंग होते. ध्येयाशी एकरूप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व भूतलावर होऊन गेले. अत्याचारी धर्मांध परकीय सत्ता उलथवून टाकून कल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभारण्याचे ध्येय शपथरूपाने अगदी बालवयातच शिवरायांनी आपलेसे केले होते. त्यांच्या जीवनातील सर्व योजना, कष्ट , पराक्रम , त्याग या ध्येयासाठीच होता. त्यामुळे हे जीवन ध्येयरूप होते असे म्हणता येते. याचे एक उदाहरण पाहूयात. 


                    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

       विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मुघलशाही,  गोवळकोंडाची कुतुबशाही, धूर्त व्यापारी इंग्रज, धर्मांध राजवट चालवणारे पोर्तुगीज या सगळ्यांच्या विरोधात महाराजांनी आपली समशेर उपसली.  देदीप्यमान यश मिळवले. परंतु जंजिऱ्याचा सिद्दी मात्र आपल्या अजिंक्य जंजिऱ्याच्या पाठबळावर आणि धूर्त तडजोडींमुळे महाराजांना जिंकता आला नाही. नेस्तनाबूत करता आला नाही. महाराजांची अनेक प्रयत्न यासाठी खर्ची पडले. परंतु यश आले नाही. आपल्या सैन्याच्या सहसाला आवाहन करताना महाराजांनी जंजिरा मिळवून देणाऱ्यास एक मन सोने व इतरही बक्षीसे देण्याचे जाहीर केले परंतु जंजिरा अजिंक्य राहिला जंजिऱ्याजवळचे दंडा राजपूरी मात्र महाराजांच्या ताब्यात होते तेथील किल्ल्यावरील लोक होळीच्या सणाच्या आनंदात मग्न होते अशावेळी सिद्धी याकूत सिद्धी खैरीयत या दोघांनीही एकाच वेळी समुद्रातून आणि जमिनीवरून दंडा राजपुरीवर हल्ला चढवला. अशा हल्ल्याची कोणतीही कल्पना नसलेली गडावरची शिबंदी ही बेसावध होती.  होळी पौर्णिमेच्या आनंदात मग्न असलेले लोक अगदीच सहज साध्य सावज होते. परंतु हल्ल्याचा पहिला जोर उलटल्यानंतर गडावरची शिबंदी एकत्र येऊन प्रतिकार करू लागली. लढाईला तोंड फुटले पण अचानक मोठा आघात झाला. गडावर साठवलेल्या दारूगोळ्याचा स्फोट झाला आणि गडावरील अनेक मावळे, सैनिक मरण पावले. लढाईचा रंग पालटला. स्फोट अगदी भयंकर होता.  त्या धक्क्याने सिद्दीचे सैनिक घाबरले. सिद्दी याकूत आणि सिद्दी खैरियत यांनी आपल्या सैन्याला एकत्र करून दंडा राजपुरी जिंकून घेतली.

      ह्या लढाईत स्फोट ज्यावेळी झाला त्यावेळी महाराज रायगडाजवळ एका गावी होते. हे ठिकाण दंडा राजपुरीपासून चाळीस मैलावर होते. अचानक झोपेतून ते जागे झाले आणि "दंडा राजपुरीवर काहीतरी संकट कोसळले असावे ." असे उद्गार त्यांनी काढले. जासुद हरकरे दौडत गेले. त्यांनी परत येऊन ही भयंकर वार्ता महाराजांना कळवली. हा दिवस १३-१४ फेब्रुवारी १६७१ असावा. संपर्काचे कोणतेही साधन नसताना महाराजांना ही अंत:प्रेरणा कशी झाली असावी हा एक मोठा प्रश्न आहे. तर्काने याचे स्पष्टीकरण देता येत नाही. परंतु महाराजांचे ध्येयरूप जीवन हेच त्याचे उत्तर आहे असे मला वाटते. जे जीवन ध्येयरूप होते ते जीवन आपल्या ध्येयाशी संबंधित अशा प्रसंगांची कल्पना करू शकते असे वाटते.

           महाराजांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाशी कोणाचीही बरोबरी होऊ शकत नाही परंतु यानिमित्ताने नंतर होऊन गेलेल्या दोन अध्यात्मिक महापुरुषांची आठवण होते. हे दोन्ही महापुरुष बुद्धिमान होते प्रभावी वक्ते होते आपल्या कार्याने वाणीने त्यांनी जगभर भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाचा अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला.

       त्यातील पहिले आहेत स्वामी विवेकानंद.' एक ध्येय ठरवा. त्या ध्येयाला तुमचे आयुष्य बनवा, त्याचा विचार करा, त्याचे स्वप्न पहा, त्या ध्येयासाठी जगा. तुमचा मेंदू, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक अवयव त्या ध्येयाने भरून टाका आणि अन्य सर्व कल्पना सोडून द्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.' असे स्वामीजींचे वचन आहे. स्वामीजींच्या या वचनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होत. प्रत्येक शब्द शिवरायांच्या चरित्रात तंतोतंत साकार झालेला दिसतो.

      दुसऱ्या आध्यात्मिक महापुरुषाची आठवण होते ते म्हणजे स्वामी रामतीर्थ. तुलसीराम रामचरित मानस लिहिणाऱ्या संत तुलसीदासांच्या कुळामध्ये जन्मलेले तीर्थराम गोस्वामी हे बुद्धिमान होते. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी महाविद्यालयात पर्शियन भाषेचे अध्ययन सुरू केले कोणीतरी त्यांना तुलसीदासांच्या परंपरेची आठवण करून दिली त्यानंतर ते संस्कृतचे अध्ययन करू लागले. स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने घरसंसार सोडून ते रामतीर्थ झाले. अद्वैत तत्त्वज्ञानाचा डंका त्यांनी भारताबाहेर वाजविला. स्वामी रामतीर्थ म्हणतात, " मी भारत, संपूर्ण भारत आहे. भारताची भूमी हे माझे शरीर आहे. कन्याकुमारी माझे चरण आहेत. हिमालय माझे मस्तक आहे. माझ्या केशसंभारातून श्री गंगाजी वाहतात. माझ्या मस्तकातून सिंधू आणि ब्रह्मपुत्र उगम पावतात. विंध्य पर्वत माझ्या कटीची मेखला आहे. कुरुमंडल माझा उजवा पाय तर मलाबार डावा पाय आहे. मी संपूर्ण भारत आहे.  पूर्व आणि पश्चिमेच्या दिशा याच्या भुजा आहेत. संपूर्ण मानवतेला कवेत घेण्यासाठी या भुजा मी पसरल्या आहेत. आहाहा, माझ्या शरीराचा ढाचा असा आहे. हा सरळ उभा आहे आणि अनंत आकाशाकडे दृष्टी लावलेला आहे. परंतु माझा खराखुरा आत्मा हा सर्व भारताचा आत्मा आहे. जेव्हा मी चालत असतो तेव्हा संपूर्ण भारत चालतो आहे असा मी अनुभव घेतो. जेव्हा मी बोलतो तेव्हा हा विश्वास असतो की भारत बोलतो आहे. जेव्हा मी श्वास घेतो तेव्हा हा भारत श्वास घेतो आहे याचा अनुभव येतो. मी भारत आहे. मी शंकर आहे. मी शिव आहे." स्वामी रामतीर्थ यांचे हे वचन मध्ययुगात ज्यांच्या आयुष्यात तंतोतंतपणे पाहायला मिळते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

छ. शिवाजी महाराजांच्या या ध्येयरूप एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्वास कोटी कोटी अभिवादन! 

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा... उत्तम लेखन केले सर🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

गुजरात सहल

उत्तराखंड सहलीतील अनुभव