महामानवाची करूणा
'सर्वांभूती ईश्वराचा अंश आहे' असं सांगणाऱ्या संस्कृतीनेच माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले हा केवढा मोठा विरोधाभास! हा विरोधाभास दुःखद, अन्यायकारक आणि संतापजनकही आहे. परंतु चालत आलेल्या रुढीला मोडता कसा घालायचा म्हणून हा अन्याय सहन करणाऱ्यांनी देखील तो जवळपास निमुटपणे सहन केला. केवळ आर्जवं केली. संत चोखामेळा यांच्या अभंगात 'उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही याती हीन' अशा प्रकारची हतबलता केवळ व्यक्त केली. परंतु या अन्यायकारक परिस्थिती विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज म्हणून तर अपमानित जिणं पिढ्यानुपिढ्या वाट्याला आलं होतंच. परंतु बाबासाहेब दहा वर्षांचे असताना साताऱ्याहून कोरेगावला वडिलांना भेटायला जाताना जो शून्य माणुसकीचा अनुभव त्यांना आला त्याने त्यांचा अंगभूत स्वाभिमान खडबडून चेतवला. रूढींच्या जुलमी साखळदंडांनी पाय जखडलेले असतानादेखील 'श्रृंखला असू दे पायी मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही ' हे ध्येय मनात जागविले.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
या अन्यायाविरुद्ध मनात अंगार पेटला असतानादेखील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात अपरंपार करुणा भरलेली होती. अनेकांना याचा वेळोवेळी अनुभव आला या अपार करूनीचे प्रगटीकरण ज्यामध्ये घडले असे हे काही प्रसंग.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांनी नाईलाजाने १९४२ मध्ये भारतीयांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले. अन्य सहा भारतीय व्यक्तींबरोबर बाबासाहेबांचा देखील यामध्ये समावेश झाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कामगार, जल, ऊर्जा, खाणकाम अशी विविध खाती होती. आपल्या खात्यांचा कारभार स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली. सध्याच्या झारखंडमध्ये असलेल्या धनाबाद येथील खाणीला डिसेंबर १९४३ मध्ये बाबासाहेबांनी स्वतः भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या लक्षात आले की गरोदरपणामुळे जडावलेली एक महिला कामगार अतिशय कष्टाने खाणीतून बाहेर पडली. हे दृश्य पाहून बाबासाहेब विचलित झाले. पूर्वनियोजित नसताना त्यांनी खाणीमध्ये खाली उतरण्याचा निर्णय घेतला. स्वतः शेकडो फूट खाली खाणीमध्ये उतरले. जमिनीच्या पोटात गेल्यावर जीव कसा गुदमरतो याचा स्वतः अनुभव घेतला. याच भेटीदरम्यान महिला कामगारांशी बोलताना त्यांच्या लक्षात आले की एकाच कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते. या दोनही बाबींवर त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून तोड काढली. गरोदर असलेल्या महिलांना हक्काची प्रसूती रजा देण्याची तरतूद केली. 'समान काम समान वेतन' हा नियम लागू केला.
१९४३ मध्ये दामोदर नदीला महाभयंकर पूर आला. अनेक गावांमध्ये घरेदारे वाहून गेली. हजारो कुटुंबे उघड्यावर आली. या परिस्थितीविषयी त्या प्रांतामधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिले काँग्रेस विषयी असलेले आपले मतभेद बाजूला ठेवून माणसांची सेवा करण्यासाठी बाबासाहेब सरसावले. त्यांनी स्वतः अभ्यास केला. अमेरिकेमध्ये टेनेसी नदीवर असलेल्या योजनेप्रमाणे या ठिकाणीदेखील 'दामोदर नदी परियोजना' केली पाहिजे असा निष्कर्ष यांनी अभ्यासाअंती काढला. आपल्या अधिकारांचा वापर करून या उपाययोजनेला गती दिली. यातूनच पुढे ' केंद्रीय जल आयोगाची ' स्थापना झाली. त्या वेळच्या पंजाबमध्ये कार्यरत असणाऱ्या ए एन कोसला यांना प्रमुख पदाची धुरा देण्यात आली केवळ पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पुरा करण्यात आला बाबासाहेब आंबेडकर यांना या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून बोलावण्यात आले होते. माणसाच्या आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी बाबासाहेबांनी भरीव काम केले. नदी जोड प्रकल्पाची कल्पना सर्वात पहिल्यांदा त्यांनी याच काळात मांडली. या क्षेत्रात त्यांनी मूलभूत सूचना केल्या आहेत.
३ -४ डिसेंबर १९५६ ची गोष्ट. बाबासाहेब आपल्या दिल्लीतील निवासस्थानी होते. त्यांच्या मोटारीचा चालक काही दिवस आजारी होता बाबासाहेब स्वतः काठी टेकत टेकत हळू हळू चालत त्याला भेटायला गेले चालकाला आपला अंत जवळ आला आहे असे वाटत होते आपल्या नंतर आपल्या पत्नीचे कसे होणार याची चिंता त्यांनी त्याने बाबासाहेबांकडे बोलून दाखवली. बाबासाहेबांनी त्याला धीर दिला. त्याच्या औषधासाठी काही रक्कम देखील दिली. त्याची भेट घेऊन बाहेर पडताना कुणालाच कल्पना नव्हती की महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ५ डिसेंबर १९५६ च्या मध्यरात्री नंतर होणार होते.
शब्दशः अखेरच्या श्वासापर्यंत या महामानवाने दुःखितांबद्दल आपल्या मनात करुणा बाळगली. अन्यायकारक परिस्थितीशी लढत असतानादेखील अंतरीच्या करुणेचा अनुभव सांगणारे हे प्रसंग या महामानवाच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दर्शवतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments
Post a Comment