महापुरुषांनी केलेली भीतीवर मात

          साधारणपणे माणसाच्या मनात काही भीती पिढ्यानपिढ्या घर करून राहिली आहे असे सांगितले जाते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या भीती समाविष्ट आहेत. त्यामध्ये आपण उंचावरून पडतो आहोत या प्रकारची एक भीती माणसाच्या मनात असते. या भीतीचा माणसाच्या उत्क्रांतीच्या क्रमाशी संबंध आहे असे सांगितले जाते. माणूस हा सृष्टीच्या क्रमात उत्क्रांत होत गेलेला प्राणी आहे. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे.  १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात हा सिद्धांत मांडण्यात आला. त्यानुसार माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे असे मानण्यात येते. माकडांचा निवास प्रामुख्याने झाडावर असतो.  याचबरोबर अनोळखी ठिकाणाची बऱ्याच जणांना भीती वाटते‌. तसेच मोठ्या जनसमुदायापुढे उभे राहून बोलण्याची भीती अनेकांच्या मनात घर करून असते. याला इंग्रजीमध्ये 'स्टेज फियर' असे म्हटले जाते तर मराठीमध्ये यालाच 'सभाधीटपणा नसणे' असे म्हटले जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती माणसाच्या मनात असतात.


       ( चार्ल्स डार्विन यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

             बरीच माणसे आपल्या भीतीसोबत तशीच जगतात. शक्यतो भीतीदायक प्रकारचा प्रसंग येणार नाही याची काळजी घेतात. परंतु काही जण विविध प्रकारे भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करीत असतात. भीती घालवण्याची पहिली पाहिली पायरी म्हणजे अशी भीती वाटते हे लक्षात घेऊन ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधणे. याबाबत दोन महान माणसांच्या चरित्राचा उल्लेख करता येईल असे वाटते. या दोन महान माणसांच्या जीवनात हे उपाय किती प्रभावी ठरली याची साक्ष त्यांच्या चरित्रातून मिळते.

  ( महात्मा गांधी यांचे बालपणीचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

           त्यातील पहिले आहेत ते महात्मा गांधी. त्यांनी 'माझे सत्याचे प्रयोग' या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांच्या जीवनातील १९२० पर्यंतच्या प्रसंगांचे वर्णन यामध्ये केले आहे. त्यात गांधीजींनी सांगितले आहे की लहानपणी ते अतिशय भित्रे होते. छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना भीती वाटत असायची. यावरती उपाय म्हणून त्यांच्या परिचयातील एका धाडसी समजल्या जाणाऱ्या मुलाची संगत त्यांनी धरली. भीती घालवण्याचे आपल्या समजूतीप्रमाणे मार्ग त्या मुलाने गाधीजींना दाखवले. त्यामध्ये बिडी ओढून पाहणे, मांसाहार करणे अशा प्रकारांचा समावेश होता. गांधींजींचे घर हे वैष्णव पंथीय होते. व्यसन, मांसाहार त्यांच्या घरात वर्ज्य मानले जात होते. या पार्श्वभूमीवर धाडसी होण्याचे प्रयोग लक्षात घेतले पाहिजेत. परंतु काही काळाने गांधीजींच्या लक्षात आले की याचा विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे या मुलाच्या संगतीतून ते बाहेर पडले. गांधीजींचा हा प्रयोग फसला. पुढे शिक्षणासाठी गांधीजी इंग्लंडला गेले. तेथे देखील आत्मविश्वास नसल्याचे, भीती वाटत असल्याचे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. गांधीजींच्या आयुष्यातील या पुढचा टप्पा हा दक्षिण आफ्रिकेत होता. दक्षिण आफ्रिकेतील इंग्रजांच्या वर्णभेदी राजवटीमुळे महात्माजींच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाला. ते सत्याग्रहाचे पुरस्कार करते झाले. गांधीजींचे विचार घडवण्यात 'अन् टू धिस लास्ट' 'गॉडज् किंग्डम इज विदीन यू' या पुस्तकांचा मोठा वाटा आहे. त्या जोडीला त्यांचे भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचे अध्ययन आणि स्वतःचे चिंतनदेखील महत्त्वाचे ठरले. निर्भीडपणे आपले विचार त्यांनी मांडले. काही वेळा शारीरिक हल्ल्याला देखील त्यांना तोंड द्यावे लागले. परंतु निर्भीड गांधीजींनी त्याला तोंड दिले. या निर्भिडपणामुळे त्यांचा प्रभाव लाखो लोकांच्या आयुष्यावर पडला. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली.

          

  ( योगी अरविंद यांच्यावरील टपाल तिकीट इंटरनेटवरून साभार )

           अजून एका महापुरुषाच्या आयुष्यात भीती घालवून घडविलेल्या परिवर्तनाचा अनुभव येतो. ते महापुरुष म्हणजे योगी अरविंद हे होत. सिव्हिल सर्जन असलेल्या डॉ कृष्णधन घोष यांच्या  पोटी अभिजन वर्गात जन्मलेल्या अरविंद यांचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. आपल्या मुलांवर बंगाली भाषा, संस्कृती, भारतीय विचार यांचा कोणताही परिणाम होऊ नये नव्हे नव्हे त्यांच्याशी त्यांचा संपर्क येऊ नये या हेतूने योगी अरविंद यांच्या वडिलांनी अतिशय लहानपणीच अरविंदांना त्यांच्या भावंडांबरोबर इंग्लंडला शिकायला ठेवले. या काळामध्ये आपण भित्रे होतो असे अरविंद यांनी नमूद केले आहे. अत्यंत बुद्धिमान असलेल्या अरविंदांनी शिक्षणात उल्लेखनीय प्रगती केली. परंतु काळाच्या ओघात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा विरोध त्यांच्या मनात दृढ होत गेला. आयसीएस ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे त्यांनी हेतुपुरस्सरपणे टाळले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानात नोकरी पत्करली. क्रांतिकारकांशीदेखील त्यांचा संबंध आला . या सगळ्या जीवन प्रवासात त्यांची भीती गळून पडली. आपल्या जीवनातील हे परिवर्तन पाहून त्यांनादेखील कधी आश्चर्य वाटले. पुढे योगसाधनेत जीवन घालवण्याचा साक्षात्कार त्यांना झाला.  त्यांनी पूर्णयोगाच्या साधनेद्वारे येथील जीवनाचे दिव्य जीवनात रूपांतरण करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. इंग्रजांच्या कुटील चालीमुळे अटक होण्याचा प्रसंग आल्यानंतर त्यांनी फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात गुप्तपणे स्थलांतर केले. दीर्घकाळ योगसाधना केली. योगी अरविंद यांचे विचार आजदेखील जगाला मार्ग दाखवीत आहेत.

 लहानपणी भित्रे असलेल्या या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात धडसीपणाचे बीज होते असे म्हटले पाहिजे त्याचबरोबर त्यांनी केलेले प्रयत्न हे देखील महत्त्वाचे आहेत . या दोन्ही महापुरुषांच्या जीवनातील हे परिवर्तन आपल्याला स्तिमित करून सोडते. या दोन्ही परिवर्तनामुळे जगाला दोन विभूतींच्या कार्याचे दर्शन झाले असे म्हणता येते.


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. नेहमीप्रमाणे सुंदर सादरीकरण आणि त्याला साजेस उदाहरण... तुमच्या लेखनातून नेहमीच माझ्या ज्ञानात भर पडते.. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी