समर्थ भारत : जवळ तरीही दूर
गेल्या काही दिवसातील अनेक बातम्यांनी मनावरती ओरखडे उमटवले. काही बातम्यांनी तर मनावरती घाव घातले. खरोखरंच आपण एक देश समाज म्हणून समर्थ होण्याच्या किती जवळ आहोत अथवा किती लांब आहोत याची जणू माहिती या बातम्यांनी दिली.
(कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)
यातील पहिली बातमी ही पुणे शहराजवळच्या शिरूर या महामार्गावरील गावामधील आहे. या बातमीनुसार वंचित समाजातील एका जोडप्यातील महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. काय करावे हे न कळून दोघेही सुन्नपणे तसेच बसून राहिले. काही संवेदनशील लोकांनी गावातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. ते पती-पत्नीदेखील तत्परतेने तिथे हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय उपचार केले. या बातमीत सर्व संबंधितांची तत्परता अभिनंदनीय आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. परंतु त्याच वेळी या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या देशात सरकारी रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात हे या जोडप्याला माहीत नव्हते का? माहित असले तर त्यांनी तिथे जाऊन उपचार घेण्याची खटपट केली का? अशी खटपट केली असेल तर त्यांचा अनुभव कसा होता? या अनुभवानंतर ते असाहाय झाले म्हणून प्रसूती रस्त्यावर झाली का? या कुटुंबाच्या नातेवाईकांपैकी अनुभवी स्त्रीने त्यांना मदत केली नाही का? असे अनेक प्रश्न विचारता येतील परंतु त्या प्रश्नांमुळे वस्तुस्थिती बदलत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेतील त्रुटी कमतरता यावर विचार करायला भाग पाडते.
दुसरी बातमी ओडिशा या राज्यातील आहे वंचित समाजातील एका महिलेने आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या भावाला तिच्या खात्यातील सर्व पैसे काढायला सांगितले. दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर भाऊ बँकेत पोहोचला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचा दाखला अथवा पुरावा मागितला. या माणसाला तो देता आला नाही म्हणून शेवटी त्याने अंत्यसंस्कार केलेले प्रेत बाहेर काढले. त्याचा नुसता सांगाडा उरला होता. तो सांगाडा खांद्यावर घेऊन तो माणूस चालत बँकेपर्यंत पोचला. यानंतर बँकेला उपरती झाल्यामुळे त्या माणसाचे पैसे बँकेने दिले. या घटनेने देखील अनेक प्रश्नांचे वारूळ मनामध्ये उठवले. बँकेला आवश्यक तो पुरावा कसा द्यायचा हे त्या माणसाला बँकेतील कर्मचाऱ्यांनी नीटपणे समजावले का? नीटपणे समजावले असेल तर त्या माणसाला असा पुरावा का मिळाला नाही? त्या माणसाच्या गावातील अन्य कोणी व्यक्तीने त्याला याबाबत मदत केली नाही का? बँकेने मृत्यू दाखला न मागता पैसे द्यायला हवे होते का? सांगाडा बघितल्यानंतर बँकेचे नियम बदलले का किंवा ते कसे लागू केले? हे प्रश्न देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आता आपण समर्थ भारत घडवण्याचे उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहोत. हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल अडचणी कोणत्या आहेत याचे दर्शन घडवणाऱ्या या बातम्या आहेत. भारतातील निरक्षरता आणि गरिबी या दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. यापैकी गरिबी चा २०२२-२३ चा एक अहवाल असे सांगतो की भारतामध्ये ५.२५% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. हे साधारणपणे साडेसात कोटी लोक होतात. गेल्या काही दशकात दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने आपण भरीव प्रगती केली असली तरी देखील गरीबीचे संपूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. यातूनच निरक्षरता आणि गरिबी यांचा परस्पर संबंध अधोरेखित होतो. गरिबीमुळे निरक्षरता की निरक्षरतेमुळे गरिबी हे एक दुष्टचक्र आहे. ते भेदण्याचा प्रयत्न एक देश म्हणून आपण करत आहोत. साक्षरतेच्या दिशेने देखील भरीव प्रगती गेल्या काही दिवसात होते आहे. परंतु शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट अजूनही आपण गाठू शकलो नाही.
या बातम्यांच्या निमित्ताने आपल्या यंत्रणांमध्ये त्रुटी देखील समोर येतात निरक्षर गरीब माणसे यंत्रणांपर्यंत पोचू शकत नाहीत किंवा पोहोचलेली नाहीत. तर अशा परिस्थितीत यंत्रणांनी पुढाकार घेऊन अशा माणसांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था उत्पन्न केली पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था ही गरजेच्या प्रमाणात पुरेपूर उपयोगी पडत नाही. तिची कार्यक्षमता कमी पडते आहे ही कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग यानिमित्ताने आठवला. स्वामीजींच्या एका बालमित्राने स्वामीजींना सुचवले की हुशार विद्यार्थी निवडून त्यांना प्रशिक्षण देऊन आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत करावी. उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेले विद्यार्थी आपलेच देशबांधव असल्यामुळे ते इतरांची सेवा करतील. स्वामीजी म्हणाले की , "हुशार विद्यार्थी अधिकारी होतील हे निश्चित सांगता येईल. पण सेवाभाव त्यांच्या ठायी नसेल तर ते सेवा करणार नाही. सेवाभाव कसा उत्पन्न करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे."
याचबरोबर यंत्रणेमध्ये सहभागी व्यक्तींची मानसिकता हा देखील आपल्या विचाराचा आणि कृतीचा विषय असला पाहिजे. स्वतंत्र देशांमधील यंत्रणा या नागरिकांच्या सेवेसाठी आहेत हा भाव यंत्रणेमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या मनामध्ये असला पाहिजे. हा भाव ज्या प्रमाणात ज्या ठिकाणी यंत्रणेमध्ये आहे त्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे जीवनमान बदलते आहे हा अनुभव आपल्या सर्वांना येतो. यात जी काही कमतरता असेल ती भरून काढणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लोकांमध्ये सेवाभाव, कर्तव्यदक्षता या गुणांची निर्मिती करण्यासाठी काय करावे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा सुटा किंवा एकटा नसून आपण सर्व समाज म्हणून किती संस्कारक्षम , कार्यतत्पर, प्रामाणिक आहोत या एका मोठ्या मुद्याशी तो निगडित आहे. याबाबतीत समाज घटकांनी एकमेकांकडून कडे बोट दाखवून दोषारोपण केल्याने तो सुटणारा नाही एकाच वेळी सर्व समाजाने आपले आचरण उंचावणे आवश्यक आहे. यासाठी अनेक व्यक्ती संस्था संघटना आपापल्या परीने कार्यरत आहेत परंतु तरी देखील आपला समाज स्तर उंचावण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठायचा आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

"समर्थ भारत"--- डोळ्यात अंजन टाकणारे लेख.. सुंदर सादरीकरण🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏🏾
Delete