पोषाख आणि सभ्यपणा

       १८६२ मध्ये सुरू झालेल्या एका क्लबमध्ये एका दिवसासाठी राहण्याचा नुकताच योग आला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या विश्रांतीसाठी सुरू केलेला हा क्लब आहे. पुढे हळूहळू काही उच्चभ्रू भारतीयदेखील याचे सभासद झाले. नंतर काहीजण अध्यक्ष झाले. १९४७ नंतर अर्थातच सर्व भारतीय राहिले. ब्रिटिश स्थापत्यकलेचा नमुना असलेला हा क्लब ब्रिटिश जीवनशैलीप्रमाणेच असणार हे उघडच आहे. पण मला विशेष वाटलं की कपड्यांचे नियम विशेषतः जेवताना घालायच्या कपड्यांचे नियम तिथे आजदेखील काटेकोरपणे पाळले जातात. बदल एकच आहे तो म्हणजे भारतीय पोषाख आणि कोल्हापुरी चप्पल जेवताना घालायला परवानगी आहे. पण हा वेष तिथे येणारे कुणी घालत असतील असं मला वाटलं नाही. शर्ट पँट घालून चप्पलवर जेवायला परवानगी नाही.


               (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)

          पोषाखाचे हे नियम असे का केले असतील असा विचार केल्यावर वाटलं की ब्रिटिश पद्धतीचा पोषाख करणे ही एक उच्चभ्रू सभ्यपणाची खूण मानली जात असे. त्याचीच परिणिती ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी सुरू केलेल्या क्लबच्या नियमात झालेली दिसते. त्यात पावलं थोडी उघडी असणं बसत नाही. 

          पोषाखाबद्दलचा हा आग्रह बघून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग आठवला. स्वामीजी अमेरिकेत गेल्यावर पदपथावरुन चालत असताना कोणीतरी टिप्पणी केली की , "या सभ्य गृहस्थाचा पोषाख गमतीदार आहे." त्याच्या सोबतची व्यक्ती म्हणाली, "पोषाख गमतीदार आहे हे बरोबर पण हा माणूस सभ्य आहे असे म्हणता येणार नाही." स्वामी विवेकानंद यांच्या कानावर ही वाक्ये पडल्यावर ते या दोन्ही व्यक्तींना म्हणाले, "माझ्या देशात माणसाच्या चारित्र्यावरुन त्याचा सभ्यपणा ठरतो. पण या देशात सभ्यपणा हा शिंपी ठरवतात असे दिसते." प्रसंग खरा की खोटा हे सोडून दिले तरी पाश्चात्यांनी पौर्वात्य लोकांना असंस्कृत, असभ्य मानल्याची अनेक उदाहरणे आणि पुरावे इतिहासात नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सभ्यपणा हा पोषाखावरुन ठरवला जात होता असं म्हणायला वाव आहे.

           भारतासारख्या खंडप्राय देशात हवमान, जीवनशैली यांची खूप विविधता आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच पोषाख करण्याच्या पद्धतीत खूप वेगवगळेपणा दिसून येतो. देशात सर्वत्र एकसारखा पोषाख नसून त्यात खूप विविधता आहे हे आपल्याला माहीत आहे. भारतीय पोषाखात साडी आणि धोतर हे दोन प्रकार सर्वात जास्त ठिकाणी आढळतात. याशिवाय अन्य पोषाखदेखील आहेत.

        याबाबतीत स्वामीजींच्या जीवनातील अजून एक लहानसा प्रसंग सांगता येईल. शंकर या लेखकाने 'अज्ञात विवेकानंद' या पुस्तकात हा प्रसंग लिहिला आहे. स्वामीजी एकदा‌ आपल्या सोबत्याला म्हणाले की जगात दोन प्रकारच्या संस्कृती आहेत एक आहे कापड गुंडाळून देह झाकणारी संस्कृती आणि दुसरी आहे कापड फाडून कपडे शिवून घालणारी संस्कृती. स्वामीजींचे हे निरीक्षण भारताच्या कुठल्याही पारंपरिक पोषाखाला चपखलपणे लागू होते हे आपल्याला सहज समजते.

         आपल्या देशात काही मंदिरांमध्ये पोषाखाचे कडक नियम आहेत. त्याबद्दल उलटसुलट चर्चा समाजातील काही वर्तुळात होते. पण सुरुवातीला वर्णन केलेल्या क्लबमधील कपड्यांच्या नियमांबाबत मात्र फारशी चर्चा होत नाही. ब्रिटिशांनी दीर्घकाळ आपल्याला गुलामगिरीत ठेवले होते त्याचा हा परिणाम असावा असे वाटते.

      कपडे बाह्य रंग रूप यावरून जे माणसाची परीक्षा करतात त्यांच्यासाठी गोष्ट बोधप्रद आहे असे वाटते. उद्दालक ऋषींची मुलगी सुजाता आणि उद्दालक ऋषींचे शिष्य कहोड या पतीपत्नींच्या पोटी अष्टावक्र यांचा जन्म झाला. अष्टावक्र हे अत्यंत विद्वान होते परंतु शरीराला ठिकठिकाणी बाक आल्यामुळे त्यांना अष्टावक्र असे म्हणत असत. राजा जनकाच्या सभेतील पंडित बंदी याच्याशी शास्त्रार्थ करताना पराभूत झाल्यामुळे कहोड यांना जलसमाधी घ्यावी लागली त्यांचे पालनभूषण आजोबा उद्धालक यांनी केले जेव्हा आपल्या पित्याच्या जलसमाधीची गोष्ट अष्टावक्र यांना कळली त्यावेळी ते विद्वान बंदी याच्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी  ऋषी अष्टावक्र राजा जनकाच्या दरबारात पोचले. त्यांचे वेडेवाकडे शरीर पाहून राज्यसभेतील विद्वान हसू लागले त्यांचे असणे पुढे हसे कमी झाल्यावर ऋषी अष्टावक्र म्हणाले की, " मला वाटले या राजसभेत विद्वान ,पंडित लोक उपस्थित असतील. परंतु येथे तर चर्मकाराप्रमाणे चामडे पाहून किंमत करणारे लोक उपस्थित आहेत." ऋषी अष्टावक्रांचे हे कठोर शब्द ऐकून राजसभेत हसणारी मंडळी खजील झाली. नंतर झालेल्या वादविवादात अष्टावक्र यांनी आपल्या तर्कशुद्ध मांडणीने विद्वान बंदीचा पराभव केला आणि आपल्या पित्याच्या वाटेला आलेला अपमान भरून काढला. ही गोष्ट ऐकली की संत चोखामेळा यांच्या अभंगातील ओळी आठवतात,                                    काय भुललासी वरलिया रंगा,                                                  ऊस जरी डोंगा परी रस नोहे डोंगा,                                            चोखा जरी डोंगा परी भाव नव्हे डोंगा


सुधीर गाडे, पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. माहितीपूर्ण लेख, वाचून ज्ञानात भर पडली🙏

    ReplyDelete
  2. डॉ विकास इनामदार यांनी लिहिलेले आहे.
    या विषयावरून एक अगदी वेगळा मुद्दा असा आहे. पोशाखाच्या सवयी देशाच्या प्रगतीशी निगडीत असतात. आफ्रिकेतील सुदान,सोमालिया, काँगो इत्यादी मागासलेल्या देशांमधील नागरिकांचे पोशाख चित्रविचित्र असतात तसेच केशरचना क्लिष्ट असते. भारतासारख्या प्रगतीशील देशात शहरी विभाग ( मुंबई, पुणे,दिल्ली )अणि ग्रामीण विभाग (शनी शिंगणापूर, कोकण , कछ ) यांमधील नागरिकांच्या पोशाखात फरक आढळतो. जर्मनी,फ्रान्स, सिंगापूर अशा प्रगत देशांमध्ये पोशाखात सुटसुटीतपणा आणि उपयुक्ततेकडे कल अधिक आढळतो. औद्योगिकरण,आर्थिक, वैज्ञानिक,शैक्षणिक, तांत्रिक,सामाजिक प्रगती यांचा प्रभाव पोशाख,पेहराव, वेशभूषा यांच्यावर पडून वैचारिक गोंधळ जातो.विचारात सुसूत्रता येते.त्याचा परिणाम एकूणच वर्तणुकीवर दिसून येतो. आपल्याकडे शाळांमध्ये नागरिकशास्त्र हा विषय 50 मार्कांचा ऑप्शन ला टाकण्याचा विषय आपण केला आहे. वस्तुत: एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी त्या विषयाची आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  3. डॉ नेहा देशपांडे यांनी लिहिले आहे.
    एकूणच बाह्यरूपावर बरीच गोष्टी अवलंबून आहेत समाजात प्राचीन काळापासून. मनुष्यस्वभाव !
    त्यात ब्रिटिशांच्या गुलामगिरीची भर पडली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

उत्तराखंड सहलीतील अनुभव

गुजरात सहल