शिवनेरीवरील माझा भाग्ययोग

         उत्सव बहु थोर झाला, भाग्ययोग अनुभवला

"सुधीरजी, यावर्षी शिवनेरीवर तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला वक्ते म्हणून येणार ना?" काही दिवसांपूर्वीच आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांचा फोन आला. गेल्या वर्षीही त्यांनी निमंत्रण दिले होते पण काही अडचणींमुळे मला जायला जमले नव्हते. पण यावर्षी मात्र तो योग आला.

     श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे यांच्या वतीने गेल्या ४६ वर्षांपासून फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्याकाळी शिवजयंतीची तिथी वैशाख शुद्ध द्वितीया जास्त प्रचलित होती. पण त्यावेळी नव्याने उजेडात आलेल्या पराव्यांनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी मान्य झाली. ह्या उत्सवाची परंपरा सुरू झाली. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या अनेक महनीय व्यक्ती या उत्सवासाठी येऊन गेल्या आहेत. यावर्षी हा भाग्ययोग मला अनुवयला मिळाला. ग्राहक चळवळीचे पहिल्या पिढीतील कार्यकर्ते कै.बिंदुमाधव जोशी आणि कै. शाहीर हिंगे यांनी या उत्सवाची सुरुवात आपल्या सहकाऱ्यांसह केली होती. हीच परंपरा आजही जपली गेली आहे.

        शाहीर मावळे यांच्या योजनेनुसार त्यांच्या युवा शिष्य आणि सहकाऱ्यांसह आम्ही आदल्या दिवशीच जुन्नर येथे पोहचून मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी भल्या पहाटे उठून आवरून शिवनेरीवर शिवाईदेवीच्या मंदिरापाशी पोचलो. यावर्षीच्या प्रमुख पाहुण्या खासदार डॉ.सौ.मेधाताई कुलकर्णी अति पहाटे पुण्याहून निघून आमच्या आधीच मंदिरापाशी पोचल्या होत्या.

                     ( पालखी सोहळ्याची सुरुवात )

       उत्सवाच्या परंपरेनुसार बरोबर सात वाजता शिवाई देवीच्या मंदिरात पूजेसाठी सुरुवात झाली. काही वेळातच दुसरे पाहुणे गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी पोचले. सुरुवातीला शिवाई देवीची समंत्र अभिषेक आणि पूजा झाली. त्यानंतर शिवरायांच्या अर्धपुतळ्यालाही अभिषेक करण्यात आला. आरती, प्रसाद होऊन पूजा संपली. स्थानिक मंडळी आणि समितीच्या वतीने सर्वांचे स्वागतसत्कार करण्यात आले. 

       त्यानंतर सुरू झाली चांदीच्या पालखीत ठेवलेल्या शिवप्रतिमेची मिरवणूक. पाहुणे मंडळींनी पालखी उचलून थोडी पुढे नेल्यावर भोईव्रतधारी मंडळींनी पालखी घेतली. पारंपरिक हलगी, ताशा, तुतारी यांच्या निनादात आणि शिवरायांच्या जयघोषात पालखी शिवजन्मस्थानाकडे निघाली. वारकरी संप्रदायातील बाल टाळकरीमंडळींचे पथकदेखील सुरुवातीपासून मिरवणूक सहभागी झाले होते. शिवभक्तांची दाटी झाली होती. छ. शिवरायांच्या वेशभूषेतील शिवभक्तदेखील सहभागी होते. टाळ ,मृदुंग , घोषणा यांच्या निनादात पालखी हळूहळू मार्गस्थ झाली. थोड्या वेळाने महिला लेझीमवादकांचे पथकदेखील मिरवणुकीत सहभागी झाले आणि आणखी रंग चढला. काही शिवजयंतीच्या मिरवणुकीतच शिवभक्त कै. कुलकर्णीकाका यांचे निधन झाले होते. ज्या ठिकाणी ते कोसळले त्याठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहून अभंगगायन केले. शाहीर मावळे यांनी सुरेल अभंगगायनात सर्वांना सहभागी करून घेतले. 

थोड्या वेळात मिरवणूक जन्मस्थानाजवळ पोचली. तिथे बालपथकाने रिंगण धरले. अनेकांनी फुगड्यांचा फेरही धरला. त्या रिंगणातच दुसऱ्या बालथकाने लाठीकाठी, तलवार, पट्टा फिरवणे या मर्दांनी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. सरसर फिरणाऱ्या लाठीवर नजर ठरत नव्हती. पालखी जन्मस्थळापर्यंत पोचली. ओवाळणी करून पालखीचे स्वागत केले. 

जन्मस्थानातील पाळण्यात शिवमूर्ती ठेवली. महिलांनी सुरेल आवाजात पाळणागीते म्हटली. सुंठवडा वाटण्यात आला. 


    त्यानंतर बाहेरच्या बाजूला महिलांच्या लेझीमपथकाने शिवगीतावर आणि गोंधळगीतावर नृत्य सादर केले. विशेष बाब म्हणजे यात तरुण, मध्यम आणि प्रौढ अशा सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग होता.

        पुढचा टप्पा होता धर्मसभेचा. त्यापूर्वी बाल शिवराय आणि जिजामाता यांच्या पुतळ्यासमोरील स्तंभावर सोनेरी किनार असलेल्या भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. शिवभक्तांनी संकल्प घेतला.


     या उत्सवात दरवर्षी सज्जनगड आणि देहू येथून बाल शिवराय आणि जिजामाता यांच्या पुतळ्याला वस्त्र अर्पण करण्यात येते. याहीवर्षी दोन्ही ठिकाणांहून आलेल्या प्रतिनिधींनी वस्त्र अर्पण केले. पुतळ्यांना हार अर्पण करण्यात आले. 


यानंतर सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला शाहीर मावळे यांनी लिहिलेला पोवाडा त्यांच्या शिष्यांनी जोषपूर्ण पद्धतीने सादर केला. पाहुण्यांच्या स्वागतानंतर भाषणे सुरू झाली. सुरुवातीला स्वामी यांनी आपले कळकळीचे मनोगत व्यक्त केले. नंतर माझा क्रम होता. पण मेधाताईंनी " गाडेसरांचे बोलणे 'स्वीट डिशसारखे शेवटी ठेवा "असे सांगितले आणि त्यांनी आपले ज्वलंत विचार मांडले. नंतर माझ्या बोलण्यात राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, स्त्रियांचा सन्मान, युद्धांसाठी केलेला सह्याद्रीचा वापर, शिवाजी महाराजांचे अखिल भारतीय ध्येय, आता आपल्याला स्वराज्य मिळाले आता सुराज्य करणे, समर्थ भारत घडवणे ही प्रेरणा जपूया इत्यादी मुद्दे मांडले. त्यानंतर पाच महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चिंचवड येथून आलेल्या महिलामंडळाने नृत्य नाट्यरूपाने शिवचरित्र सादर केले आणि कार्यक्रम संपला.

   शिवनेरीला जाता येताना होनराज मावळे याच्यासोबतच्या गप्पा, हजार वेळा सिंहगड चढणारे श्री लक्ष्मीकांत सासवडे यांची ओळख तसेच श्री कैलास देवकर यांच्याशी गप्पा झाल्या. हा दिवस म्हणजे माझ्या दृष्टीने *उत्सव बहुत थोर झाला भाग्ययोग अनुभवला* असा ठरला! हा दिवस कायमच स्मरणात राहील. 

सोबत आजच्या दैनिक सकाळ मधील छायाचित्र

Comments

  1. हार्दिक अभिनंदन सर.

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी