बापाची धडपड
(कथा)
"सॅली, कुठाय डॅड?" स्पृहाचा प्रश्न कानावर आदळला आणि अमोल दचकला. ऑफिसचं प्रेझेंटेशन करण्याच्या अगदी महत्त्वाच्या कामात तो पुरेपूर गुंतला होता. त्यामुळे ह्या प्रश्नाने त्याला ओढून मनानं घरात आणलं. " अग, तुला सांगितलं ना स्पृहा! तो भूर गेलाय." "नाही डॅड! ते काही नाही! तुम्ही भूर जाऊन सॅलीला घेऊनच या. मला काही माहित नाही!" असं म्हणून स्पृहा मोठ्याने भोकाड पसरून रडू लागली. आता काय करावं हेच अमोलला सुचेना. त्यानं पटकन लॅपटॉप बंद केला आणि स्पृहाचा हात हातात घेऊन तिला थोपटत सांगितलं, "अगं, तो भूर गेलाय. कसा आणू त्याला?" "आणा! आणा! आणा!" हातपाय आपटत स्पृहा किंचाळली. आता मात्र अमोल हतबुद्ध झाला. शेवटी कसंबसं तो म्हणाला, " आणतो बरं, बेटा." स्पृहा थोडी शांत झाली आणि तिथून निघून तिच्या खोलीत गेली.
(चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)दिग्मूढ झालेला अमोल विचार करू लागला. करियर सेट करण्याच्या धडपडीत त्याच्या लग्नाला थोडासा उशीर झाला होता. साक्षीसारखी सुविद्य, समंजस, सालस, गुणी बायको मिळाली. दोघेही आपापल्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होते. संसार खूप सुखाचा चालला होता. पण अपत्य काही होईना. सगळे प्रयत्न झाले. साक्षीचेही वय थोडे जास्तच होते. त्यामुळे अडचण येत आहे. नाही होय करता करता शेवटी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोंडस स्पृहा जन्माला आली. अमोल आणि साक्षीला वाटलं की आता स्वर्ग जणू दोन बोटंच उरलाय. पण नियतीचा खेळ वेगळाच होत.
स्पृहा दीड दोन वर्षांची झाली. काही तरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. असं म्हणता म्हणता निदान झालं की स्पृहा ही 'विशेष मुलगी' आहे. नवराबायकोच्या डोक्यावर तर डोंगरच कोसळला.
आपल्याच पोटी का? काय चुकले? अशा प्रश्नांनी दोघांचीही डोकी चक्रावून गेली. पण कशाचही उत्तर न मिळता शेवटी दोघांनीही वस्तुस्थिती स्वीकारली आणि पुढे काय करायचे यावर लक्ष केंद्रीत केले. पुढे वेगवेगळ्या कारणांमुळे दुसऱ्या अपत्याचा विचार सोडून द्यावा लागला. आता सर्व काही स्पृहासाठी अशा पद्धतीने त्यांनी आपल्या आयुष्याची मांडामांड केली.
बोलता बोलता कुणीतरी सुचवलं की घरात एखादा प्राणी पाळा. त्याचा लळा लागला की स्पृहालाही बरं वाटेल. सल्ला पटला. एक परदेशी प्रजातीची कुत्री ते घरी घेऊन आले. तिचं नाव लॉली ठेवले. लॉली आणि स्पृहा यांची हळूहळू गट्टी जमली. दोघीही एकमेकींना धरून राहू लागल्या. दोघींचीही नुसती धमाल चालायची. ते बघून अमोल आणि साक्षी जरासे सुखावले. दुःखाचा डोंगर काही सरला नव्हता पण आता त्याची सवय मात्र झाली होती.
अशीच काही वर्षे गेली आणि लॉलीच्या पोटी एक गोंडस पिल्लू जन्माला आलं. पण लॉली मात्र मरण पावली. या गोंडस पिलाचं नाव सॅली ठेवण्यात आलं. गोंडस सॅलीत एकच व्यंग होते ते म्हणजे तिला जन्मतः तीनच पाय होते. त्यामुळे अमोलला वाईट वाटत राही. 'विशेष मुलगी' असलेल्या स्पृहाच्या सोबतीला असलं पिल्लू नको असं त्याचं ठाम मत बनलं. नीट आखणी करून त्याने एके दिवशी रात्री सॅलीला पोत्यात घालून लांबवर नदीकिनारी सोडून दिलं.
या गोष्टीला आता चार पाच दिवस होऊन गेले होते. पण सॅलीला घरात दिसेनाशी झाल्यापासून स्पृहा सारखी तिचीच आठवण काढत होती. दोन चार दिवसांत स्पृहा तिला विसरून जाईल हा अमोलचा अंदाज खोटा ठरला. आता मात्र काहीही करून सॅलीला परत आणावेच लागेल हे अमोलच्या चांगलेच लक्षात आले.
हातातलं सर्व काम बाजूला ठेवून तो सॅलीला जिथं सोडून आला होता तिथंच परत गेला. हाका मारत सॅलीला शोधू लागला. एवढासा जीव कुठं जाईल. सापडेल लगेच अमोलचा हा अंदाज चुकीचा ठरला. तास दोन तो त्याच परिसरात फिरत शोध घेत राहीला. साक्षीचेही फोन सारखे येत होते.
शेवटी तीन साडेतीन तासांनी सॅली सापडलं. भेदरून गेली होती. अमोलनं तिला जवळ घेऊन थोपटलं. साक्षीला फोन करून लगेच कळवलं.
अमोल सॅलीला घेऊन घरी परतला. स्पृहानं तिला जवळ घेऊन घट्ट धरलं. सॅलीही तितक्याच आपुलकीने तिला बिलगली होती. हे बघणाऱ्या अमोल आणि साक्षीच्या डोळ्यात पाणी तरळलं. एक बापाची धडपड फळाला आली होती.
सुधीर गाडे पुणे
(कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments
Post a Comment