स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न
"सुधीर, यात दोष कुणाचा? मुलीचा ? पालकांचा? शिक्षकांचा? की समाजाचा?" विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासराव लपालकर यांनी मला विचारले आणि मी विचारात पडलो. प्रसंग २०१२ किंवा २०१३ मधला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक मोठा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यासाठी निवडलेल्या कला मंडळाच्या मुलीला स्वामी विवेकानंद यांचे उद्गार, "माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि बंधुंनो." एवढेच माहीत होते. हे सांगितल्यावर विश्वासरावांनी मला हा प्रश्न विचारला होता. प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन २०१३ या स्वामीजींच्या १५० व्या जयंतीवर्षांत पुण्यात इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने चरित्र कथनाचे जवळपास ५० कार्यक्रम आणि पथनाट्याचे जवळपास ३० कार्यक्रम आम्ही केले. या कार्यक्रमांचा आनंद आणि समाधान त्यात सहभागी झालेल्या आम्हा सर्वांना वाटले.
( वसतिगृहातील विद्यार्थी कार्यक्रम सादर करताना )
स्वामीजींचे चरित्र पोचवण्यासाठी इतर प्रकारांचाही आम्ही उपयोग केला. आमच्या म.ए.सो.महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २०१२ मध्ये श्री.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, २०१३ मध्ये श्री. दामोदर रामदासी यांचा एकपात्री प्रयोग आणि २०१४ मध्ये शाहीर आसाराम कसबे यांनी लिहिलेल्या पोवाड्याचे शाहीर बापू पवार यांनी केलेले गायन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. २०२५ मध्ये वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील 'भारत एक खोज' या मालिकेतील स्वामीजींच्या चरित्रावर आधारित असलेला भाग दाखवला.
असे वेगवेगळे प्रयोग करत असताना अजून कशा प्रकारे चरित्र सांगता येईल याचा मी विचार करत होतो. त्यावेळी अभिवाचनाद्वारे चरित्र सांगता येईल अशी कल्पना सुचली. गेल्या वर्षी सुचलेली ही कल्पना यावर्षी प्रत्यक्षात उतरली.
ही कल्पना मी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सांगितली. ६-७ विद्यार्थी आनंदाने तयार झाले. त्यांनी त्याची संहिता तयार केली. त्यावर चर्चा करून आम्ही ती संहिता निश्चित केली. यावर्षी स्वामीजींची जन्मतिथी पौष कृष्ण सप्तमी ही ९ जानेवारी २०२६ यादिवशी होती. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी मुलींसाठी ८ जानेवारीला तर मुलांसाठी ९ जानेवारीला म.ए.सो.गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हे अभिवाचन सादर केले गेले. या प्रभावी सादरीकरणाने मुलामुलींना स्वामीजींच्या जीवनाची थोडी माहिती मिळाली. आपले मित्रमैत्रिणी कार्यक्रम सादर करताहेत म्हणून अन्य विद्यार्थ्यांनी अभिवाचन उत्सुकतेने ऐकले. अभिवाचनात सहभागी विद्यार्थ्यांचे स्वामीजींच्या भाषणांचे पुस्तक देऊन कौतुक केले. त्यांना ते पुस्तक वाचायला सांगितले.
साधारण ८-१० दिवसांनंतर अभिवाचनात सहभागी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यात त्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाल्याचे जाणवले. स्वामीजींचे विचार समजून घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. गप्पांमध्ये सहभागी एका विद्यार्थ्याने सांगितले की, "मूर्तीपूजा हादेखील ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे हे मित्राला सांगताना स्वामीजींच्या चरित्रातील प्रसंगाचा उपयोग झाला." 'भारतात ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांची विपुलता आहे. सर्व मार्ग सत्य आहेत.' स्वामीजींचे हे विचार विद्यार्थ्यांना समजले.
म.ए.सो.संस्थेच्या वतीने मी भावे हायस्कूल येथे जात असतो. तिथेही अभिवाचनाचा उपक्रम मी सुचवला. मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे यांनी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती राजश्री खाडे मॅडम यांना ही जबाबदारी दिली. त्यांनी स्वतः गोष्टी लिहून काढल्या. आमच्या समक्ष चर्चेनंतर त्या निश्चित केल्या. इ. ५ ते इ. ९ वीतील निवडक विद्यार्थ्यांकडून त्यांनी तयारी करून घेतली. १२ जानेवारीला हा कार्यक्रम शाळेच्या गुरुवर्य प्र.ल.गावडे सभागृहात सादर झाला.
( कार्यक्रम पुढील दुव्यावर.
https://youtu.be/eJNusCEqCqI?si=HHv81ekoWGILIF8 )
अभिवाचनाबरोबर शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत स्वामीजींचा संदेश दिला. शाळेतही आपले मित्र कार्यक्रम सादर करताहेत म्हणून अन्य विद्यार्थ्यांनी अभिवाचन उत्सुकतेने ऐकले. या कार्यक्रमातही विद्यार्थी व खाडे मॅडम यांचे स्वामीजींची पुस्तके देऊन कौतुक करण्यात आले. खाडे मॅडम यांनी आपल्या मुलाला सांगून या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रमुद्रण करून घेतले. त्याचेही कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी शाळेत गेल्यावर सहभागी विद्यार्थी आणि खाडे मॅडम यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी स्वामीजींचे चरित्र वाचले होते. विद्यार्थ्यांना खाडे मॅडमनीदेखील पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक केले होते. त्याविषयी बोलताना एक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे म्हणाला, "खाडे मॅडम, आमच्यावर आईसारखे प्रेम करतात." खाडे मॅडमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी म्हणालो, "मॅडम, पगार तर सगळ्यांनाच मिळतो. पण शिक्षिका म्हणून ही तुमच्या कामाची पावती आहे."
स्वामीजींचे चरित्र सांगण्याच्या योजनेचे हे अनुभव मनाची उभारी वाढवणारे आणि संस्मरणीय आहेत.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

खूपच छान. अभिवाचन उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.🙏
ReplyDeleteखूप खूप छान, संस्कृती रक्षक उपक्रम.
ReplyDeleteअशाच कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.