चुकवलेला वेध

                                   (कथा)

      सॅबेस्टियन नेहमीप्रमाणे इंटरनेटवर सर्फिंग करत होता. हॅकिंगची माहिती त्याला बरेच दिवसांपासून होती. त्यामुळे तो ठिकठिकाणी हॅकिंग करुन पाहिजे ती माहिती मिळवत असे. सध्या त्यांचं लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जास्त होतं. आपल्या देशात काय चाललं आहे त्यापेक्षा शेजारच्या देशात काय चाललं आहे याकडं तो जरा जास्त लक्ष ठेवून होता. कारणही तसंच होतं. 'रिपब्लिक ऑफ बॉंगो' हा त्याचा देश जगातील इतर देशांच्या तुलनेत अगदी लहानसा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणाच्या अध्यात मध्यात नसलेला त्याचा देश स्वत:च्याच प्रश्नात इतका गुंतला होता की आजूबाजूला लक्ष देण्यासारखी परिस्थितीही नव्हती आणि फुरसतही नव्हती. पण....

              ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)

       पण हे वर्ष होतं २०४९ चं. तंत्रज्ञानाची, व्यापाराची आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची गुंतागुंत इतकी वाढली होती की पृथ्वीच्या पाठीवर कोणताही देश असा अलिप्त राहूच शकत नव्हता. काही ना काही भाग आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यावा लागेल अशी परिस्थिती होती. हे झालं पहिलं कारण.
        दुसरं कारण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि जवळचं होतं. जवळचं म्हणजे शब्दशः शेजारचं होतं. हे कारण म्हणजे 'युनायटेड स्टेटस ऑफ डॉमेरिका' हा देश रिपब्लिक ऑफ बॉंगोचा शेजारी होता. सॅबेस्टियनच्या देशाला रॉब म्हटलं जाई तर शेजारच्या देशाला युएसडी म्हटलं जाई. युएसडी हा एक अतिशय संपन्न आणि बलाढ्य देश होता. त्याच्याकडे तंत्रज्ञानातील नेतृत्व होते आणि पैशांची तर अजिबात कमतरता नव्हती. कारण पैसे कमी पडले की युएसडी त्यांना पाहिजे तेवढ्या नोटा छापून पैसे उभे करायची. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हा देश स्वत:ला जगाचा दादा समजायचा. नुसताच समजायचा असे नाही तर तसेच त्याचे वागणे होते. आंतरराष्ट्रीय नियम, कायदे, परंपरा याची कोणतीही फिकीर त्याला नव्हती. सदैव एकच ध्यास युएसडीची गरज भागली पाहिजे. मग त्यासाठी इतर देशांना कितीही किंमत मोजायला लागली तरी युएसडीला त्याने काहीही फरक पडत नसे. हा उर्मटपणा आणि अहंकार युएसडी पदोपदी दाखवून देत असे किंवा प्रसंगाने दुसऱ्या देशांच्या लक्षात येत असे.
          युएसडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची असलेली अंतराळ संशोधन संस्था 'द असोसिएशन ऑफ स्पेस अँड अस्ट्रोनॉमी' म्हणजेच 'तासा'. तासा ही अंतराळातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असे. अंतराळ संशोधन क्षेत्रातील वेगवेगळे टप्पे तासाने यशस्वीरीत्या पार पाडलेले होते. दरवेळी नवीन कामगिरी करून दाखवलेली होती.
             अशा या तासाच्या डेटाबेसमध्ये स्टॅबेस्टियनने खूप खटपट करून घुसखोरी केली होती. सुरुवातीला काही सेकंदांसाठी केली गेलेली ही घुसखोरी आता काही मिनिटांपर्यंत पोचली होती. स्टॅबेस्टियनच्या कौशल्यामुळे हा प्रकार गेले काही दिवस बिनबोभाटपणे चालू होता. स्टॅबेस्टियनला रोज थोडीथोडी माहिती मिळत होती. पण आज मात्र मिळालेल्या माहितीमुळे स्टॅबेस्टियन अगदी हादरून गेला होता. ती माहितीदेखील तशीच होती. तो अगदी सावरून बसला आणि काळजीपूर्वक वाचू लागला.
           गेले अनेक महिने 'तासा' एका उल्कापाषाणाचा मागावर होती. त्या उल्कापाषाणाची माहिती क्षणाक्षणाला 'तासा'जवळ जमा होत होती. आधी असं वाटलं होतं की हा उल्कापाषाण पृथ्वीच्या वातावरणात घुसणार नाही आणि काही उपद्रव होणार नाही. पण गेल्या काही दिवसातील माहितीमुळे हे नक्की झाले होते की हा उल्कापाषाण पृथ्वीच्या वातावरणात घुसणार आहे. युएसडीच्या दृष्टीने मोठा धक्का म्हणजे जवळपास शंभर मीटर व्यासाचा हा उल्कापाषाण युएसडीच्या एका शहरावर आदळणार होता. त्या आदळलेल्या पाषाणाच्या धक्क्याने युएसडी आणि रॉबच्या सीमेजवळील ते शहर पूर्णपणे नष्ट होणार होते‌.
          'तासा'चा अंदाज चुकल्यामुळे हा उल्कापाषाण आदळण्याच्या वेळेची माहिती नीट मिळाली नाही आणि हा उल्कापाषाण आदळायला आता काही तासच उरलेले होते. नागरिकांच्या घबराट पसरू नये म्हणून ही माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. पण वरच्या पातळीवर या उल्कापाषाणाच्या उत्पातापासून कसे वाचायचे याची चर्चा सुरू होती. शेवटी असा पर्याय निघाला होता की उल्कापाषाणावर क्षेपणास्त्र टाकून त्याला उद्ध्वस्त करायचे. पण या पर्यायात एक धोका होता तो म्हणजे या उल्कापाषाणाचे काही तुकडे 'रॉब'मध्ये पडून तिथे काही नुकसान व्हायची शक्यता होती. पण 'युएसडी' हा जगाचा आधारस्तंभ आणि लोकशाहीचा रखवालदार असल्याने 'नाईलाजाने' 'रॉब'च्या नुकसानाची 'किंमत' 'जगाच्या भल्यासाठी' मोजण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच्याच अंमलबजावणीची तयारी युद्धपातळीवर सुरू होती.
        सॅबेस्टियनच्यासाठी ही माहिती फारच धक्कादायक होती. सॅबेस्टियनचे शहर त्याच सीमेजवळ असल्याने त्याचेही नुकसान होणार होते. यावर काय करायचे या विचाराने तो सुन्न होऊन गेला. पण शेवटी त्याला उपाय सापडला क्षेपणास्त्र सोडण्याची वेळ काही सेकंदाने पुढे गेली तर क्षेपणास्त्र उल्कापाषाणाला धडकले नसते आणि तो 'युएसडी'च्या हद्दीतच पडला असता. क्षेपणास्त्राचे पुढे काय झाले असते याचा विचार सॅबेस्टियन करू लागला. त्याचे गणित केल्यावर त्याला लक्षात आले की ते क्षेपणास्त्र उल्कापाषाणाला धडकले न धडकता तसेच पुढे गेले तर शेवटी जाऊन ते शेजारच्या समुद्रात पडले असते. 'पण हे सगळे करावे की नाही? आपल्या देशाच्या लोकांना वाचवताना 'युएसडी'च्या लोकांचे जीव जाणार होते त्याचे काय?' याबद्दल तो बराच वेळ विचार करत राहिला. पण 'आपल्या देशबांधवांच्या जिवाची किंमत त्यांना नाही त्यामुळे आपणही त्याची फिकीर करण्याचे कारण नाही' असा निष्कर्ष सॅबेस्टियनने काढला आणि तो क्षेपणास्त्र सोडणाऱ्या यंत्रणेत घुसखोरी करण्याच्या तयारीला लागला.
        सॅबेस्टियनने सलग काही तास खटपट करून शेवटी त्याही यंत्रणेत घुसखोरी केली. संगणक प्रणालीतील काही आज्ञावलीचा वापर करून सॅबेस्टियनने क्षेपणास्त्र सोडण्याच्या आज्ञेला काही सेकंद उशीर करण्यात यश मिळवले. क्षेपणास्त्र उल्कापाषाणाला न धडकता समुद्रात जाऊन पडले. तो उल्कापाषाण जिथे पडणार होता तिथेच म्हणजे 'युएसडी'च्या शहरावर आदळला आणि एकच हाहा:कार उडाला. 'तासा'मधील शास्त्रज्ञ आणि 'युएसडी'चे वरिष्ठ अधिकारी हे कसे घडले याचा विचार करताना चक्रावून गेले.
सुधीर गाडे पुणे
(कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments